Home महाराष्ट्र रमाबाई ची ‘ रमाई ‘ होण्याचा हृदयस्पर्शी प्रसंग

रमाबाई ची ‘ रमाई ‘ होण्याचा हृदयस्पर्शी प्रसंग

12

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत दिनांक ४ एप्रिल १९०६ रोजी रमाबाई यांचा विवाह झाला . विवाहाच्या आधी त्यांचे नाव भागीरथी असल्याचे सांगितले जाते . विवाहा नंतर बाबासाहेबांचे वडील त्यांना रमी म्हणून आवाज देत असत तर बाबासाहेब त्यांना प्रेमाने रामू म्हणत असत . रमाबाई यांचा जन्म दाभोळ जवळील वणंद या अतिशय लहान ( त्या वेळेस या गावाची लोकसंख्या २०० च्या आत असेल ) अश्या गावी झाला . वडील भिकू धोत्रे हे मासळीने भरलेले टोपले बाजारात पोहचविण्याचे काम करत असत . आई रुक्मिणी मोलमजुरी करत असत. घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती . मात्र एवढीही गरिबीची नव्हती की त्यांना दिवस दिवसभर उपाशी राहावे लागेल . रमाबाई लहान असतानाच त्यांचे आई – वडील वारले त्यामुळे काका वलंगकर व मामा गोविंद पुरकर हे भायखळा येथे घेऊन येतात . भाजी मार्केटला ते काम करीत असल्याने तिथल्या चाळीत राहत होते , तिथंच ४ एप्रिल १९०६ रोजी रमाबाईचा विवाह भीमराव आंबेडकर अर्थात बाबासाहेबांसोबत होतो . 

       त्यांच्या वैवाहिक जीवनात १९१३ पासून अनेक आर्थिक अडचणी येत राहिल्या , त्यात १९२६ पर्यंत त्यांच्या तीन मुलांचे व एका मुलीचे निधन होते त्यामुळे त्या अधिकच दुःखी होतात , त्यात बाबासाहेब शिक्षणा करिता परदेशात असतात . त्यात त्या अधिक धर्मभोळ्या त्यामुळे उपास अधिक करत असत . अधिकचे उपवास , एकांतपणा व अन्य काही कारणांनी त्यांची तब्येत दिवसेंदिवस खराब राहत असे . ४ ऑक्टोबर १९३० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेला जात असता बेळगाव येथील प्रसिद्ध समाजसेवक , बाबासाहेबांचे अत्यंत घनिष्ठ सहकारी जे १९३७ च्या निवडणुकीत बाबासाहेबांच्या पक्षातर्फे आमदार म्हणून निवडून येतात ते बळवंतराव वराळे हे बाबासाहेबांना सांगतात की , तुम्ही लंडनला जात आहात , रमाबाई घरी एकट्याच राहतील , त्यात त्यांची तब्येत खराब आहे तेंव्हा हवापालट म्हणून मी रमाबाई व मुलगा यशवंत यांना बेळगावला घेऊन जाऊ का ? तेंव्हा बाबासाहेब म्हणतात रामूला विचारा त्या जर हो म्हणतील तर घेऊन जा .

     रमाबाई , मुलगा यशवंत वराळे यांचे सोबत बेळगावला जातात . वराळे मास्तरांच्या कुटुंबाला रमाबाईंच्या येण्याने खूप आनंद होतो . बळवंतराव बेळगावला मुलांचे वसतिगृह चालवत असतात . मुलांच्या खेळण्याचा , हसण्याचा , बागडण्याचा आवाज रमाबाईंच्या कानावर पडत असतो त्यामुळे , वराळे कुटुंबाच्या सहवासामुळे तसेच तिथल्या हवामानामुळे त्यांना काहीसे बरे वाटत असते . मात्र नोव्हेंबर १९३० च्या दरम्यान मुलांचा आवाज येणे बंद होते . तीन दिवसांनी त्या वराळे मास्तरांना विचारतात ” काहो वराळे गेल्या तीन दिवसांपासून मुलांचा आवाज ऐकायला येत नाही, काय मुलांना सुट्या लागून ते घरी गेलेत की काय ? ” . तेंव्हा वराळे मास्तर म्हणतात बाई तुम्हाला कसे सांगावे की , मुलांच्या पोटात तीन दिवसांपासून अन्न नाही व अजून आठ दिवस त्यांना अन्न मिळणार नाही कारण शासनाची मदत मिळायला अजून किमान आठ दिवस तरी लागतील .

      हे ऐकून रमाबाई क्षणाचाही विलंब न करता उठतात , त्यांच्या पेटीतून दागिन्यांचा डबा काढतात , त्यातून सोन्याच्या बांगड्या काढून वराळे मास्तरांच्या हातात देतात व सांगतात मास्तर आताच्या आता बाजारात जा , या बांगड्या विका किंवा गहाण ठेवा पण त्या मुलांना खाण्या करिता आधी काहीतरी घेऊन या ! 

    वराळे मास्तर सराफाकडं जातात , त्या बांगळ्या गहाण ठेवतात , आलेल्या पैशातून ते मुलांकरिता अन्न घेतात . वसतिगृहात येऊन मुलांना जेवायला देतात . मुलं म्हणतात काहो मास्तर तुम्हीतर म्हणत होते की , आठ दिवस तुम्हाला जेवायला मिळणार नाही , मग आता कासेकाय अन्न आणले ?. तेंव्हा वराळे मास्तर म्हणतात मुलांनो आधी जेवण करून घ्या , मग मी तुम्हाला सर्व सांगतो . मुलांचे जेवण झाल्या नंतर वराळे मास्तर मुलांना घडलेला किस्सा सांगतात व मुलांना घेऊन ते रमाबाईंच्या भेटी करिता जातात . रमाबाई सोबत भेट घेतांना ते मुलांना रमाबाई बद्दल माहिती देतात . तेंव्हा मुलं म्हणतात रमाबाई तुम्ही कोण आहात हे आम्हाला माहीत नाही मात्र आजपासून तुम्ही आमच्या आई आहात . आम्ही तुम्हाला ‘ रमाई ‘ म्हणत जाऊ . आणि इथून रमाबाई या रमाई म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या . मुलं त्यांना अंगणात येण्याविषयी विनंती करतात . रमाई मुलांसोबत बाहेर येतात . मुलं त्यांना मध्यभागी बसवतात व रिंगण करून गाणं म्हणतात . 

      या प्रसंगा वरून रमाबाई अर्थात रमाई या केवळ पैशांनीच श्रीमंत नव्हत्या तर मनाने सुद्धा श्रीमंत होत्या असे दिसून येते . डबाभर सोन्याच्या दागिन्यांच्या मालकीण ला मात्र आंबेडकरी साहित्यात आयुष्यभर शेण – गौऱ्या विकणारीच दाखविण्यात आलेनआहे . रमाई यांच्या अख्या आयुष्यात दुःख , दारिद्र्यच आलेले आहे असे दाखऊन त्यांचे व पर्यायाने बाबासाहेबांचे अवमूल्यन करण्यात आले आहे . १९१३ ते १९२० या कालावधीत त्यांना अत्यंत गरिबीत दिवस काढावे लागले नाही असे नाही मात्र उर्वरित कालावधीत त्यांच्या जवळ मुबलक पैसा राहिलेला आहे . १९२० ते १९३५ या कालावधीत बाबासाहेब एक प्राध्यापक , बॅरिस्टर , प्राचार्य , आमदार अस्पृश्य समाजाचे राष्ट्रीय नेते राहिलेले आहेत . वकिली व्यवसायात त्यांना मोठी रक्कम मिळत असे , कारण ते एक नामांकित वकील म्हणून ओळखले जात होते . या विषयी खूप सारी माहिती आंबेडकरी साहित्यात आलेली आहे हे नव्या पिढीने लक्ष्यात घ्यावे . नव लेखक , कवी आदींनी रमाईचे सुख , चळवळीतील त्यांचे योगदान मांडण्याचा प्रयत्न करावा हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

✒️लेखक:-जयसिंग वाघ(जळगाव)मो:-९८८१९२८८८१