रेल्वे चालक विनोद जांगिड हे देखील हिरोच

    62
    Advertisements

    मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकावर दि.17 एप्रील 2021 रोजी कार्यरत असलेल्या देवदुतामुळे एक लहानगा बचावल्याची घटना आपण सर्वांनी प्रसारमाध्यमांद्वारे ऐकली/पाहिली.
    आपल्या अंधमातेचा हात धरून फलाटावरुन चालत जात असलेला एका चिमुरडा तोल जाऊन फलाटावरुन रुळावर पडला.त्याचवेळी एक भरधाव एक्स्प्रेस समोरुन येत असल्यामुळे घाबरून इकडे तिकडे चाचपडत मुलाला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ती अंधमाता आरडाओरडा करत होती. तेव्हां क्षणाचाही विलंब आणि जीवाची पर्वा न करता त्यावेळी सेवारत असलेला रेल्वे पॉईंट्समन मयुर शेळकेने धाडसाने त्या लहानग्याचा जीव वाचवल्याची घटना काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकावर घडली त्याची सर्वत्र प्रसारित झालेली ही बातमी होती. मयूर शेळकेच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.आणि ते योग्यच आहे.

    परंतु भावनेच्या भरात काही गोष्टींकडे नकळत दुर्लक्ष होऊन जाते.अशाच एक गोष्टीची नोंद घेणे आज गरजेचे आहे.या जीवरक्षक धाडसी घटनेतील अजून एक महत्वाचा घटक म्हणजे त्यावेळी समोरुन येणा-या एक्स्प्रेसचे लोको पायलट (चालक)विनोद जांगिड हे आहेत. या अत्यंत जोखीमीच्या क्षणात मयुर शेळके इतकेच किंबहुना अधिक मोल प्रसंगावधान राखलेल्या त्या चालकाचे आहे.विनोद जांगिड हे 17 एप्रिल रोजी पुण्याहून मुंबईकडे उद्यान एक्स्प्रेस घेऊन येत होते. यावेळी गाडी वांगणी रेल्वे स्थानकात येत असताना रेल्वे रुळावर एक लहान मुलगा पडलेला आहे. तसंच एक तरुण (मयुर शेळके) लहान मुलाच्या दिशेने धावत येताना त्यांना दिसला. त्यामुळे त्यांनी आपात्कालीन ब्रेक लावले.

    गाडीचा वेग काहीसा मंदावला. तेवढ्याच क्षणात चपळाईने मयूरने त्या मुलाला फलाटावर ढकलून आपलाही जीव वाचवला. या घटनेनंतर मयुरचं सर्वत्र कौतुक झालं, मात्र विनोद जांगिड यांच्या प्रसंगावधान आणि चातुर्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही.
    पुढे जाऊन काही सेकंदात विनोद जांगिड यांनी गाडी पूर्णपणे थांबवली सुद्धा. आपात्कालीन ब्रेकच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न करुन एक नव्हे तर दोन जीव वाचविण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावली असतानाही विनोद जांगिड यांनी कुठलाही बडेजाव दाखवला नाही. या घटनेनंतर मयुरचं सर्वत्र कौतुक होत असले तरी विनोद जांगिड यांच्याकडे सर्वांचंच दुर्लक्ष झालं आहे हे मात्र नक्की.तरीही मनाचा मोठेपणा दाखवत हा चालक म्हणतो की, यावेळी आपण आपात्कालीन ब्रेक मारले, हे जरी खरं असलं तरीही मयुरने दाखवलेलं धाडस हे आजच्या काळात वाखाणण्याजोगे आहे, असं म्हणत विनोद जांगिड यांनी मयुर शेळकेचं कौतुक केलं.

    असा अंगावर शहारे आणणारा प्रसंग असताना, प्रसंगावधान राखून विनोद जांगिड यांनी लावलेल्या आपात्कालीन ब्रेकमुळे गाडीचा वेग ताशी 105 किमीवरुन ताशी 80 किमीपर्यंत खाली आला असल्याचे समजते. आणि वेग मंदावल्यामुळेच मयुर शेळके यांना अधिक अवधि मिळाला.म्हणून या घटनेतील उद्यान एक्स्प्रेसचे लोको पायलट(चालक) विनोद जांगिड यांचे प्रसंगावधानही मयुर इतकेच मोलाचे आहे. रेल्वे मंत्रालयाने रेल्वे सप्ताहाचे औचित्य साधून उद्यान एक्स्प्रेसचे चालक विनोद जांगिड यांचाही यथोचित विशेष सन्मान करावा.त्यावेळी त्यांनी आपात्कालीन ब्रेक मारले नसते तर ?अंगावर शहारे आणणारा हा प्रश्न आहे.

    गाडी चालवत असताना रुळावर चालण्याचा पहिला हक्क चालकाचा असतो.कुठल्याही प्रसंगात त्याला आपला मार्ग बदलतात येत नाही.अनेकदा काही माणसं किंवा जनावरं अपघाताने रेल्वेमार्गावर येतात, तर काही जण आत्महत्येसाठीच आलेलं असतात. शक्यतो चालक समोरच्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.तरीही एखाद्या वेळी एखादं जनावर अथवा माणूस गाडीच्या धडकेत मेला तर त्यांनाही माणुसकीच्या भावनेतून दुःख होणे स्वाभाविक आहे.अशा आकस्मिकरित्या उद्भवलेल्या प्रसंगात एक जीव वाचवणे चालकाला शक्यच नसते.कारण एक जीव वाचविण्याच्या प्रयत्नात हजारोंच्या जीविताला धोका पोहोचविणे औचित्याचा धरुन होत नाही.

    आज रेल्वेमध्ये दिवसेंदिवस कर्मचा-यांची कमतरता भासत आहे.त्यातही चालक आणि सहायकांची पदं वेळेवर भरली जात नसल्याने अनेकांना अधिक कामाच्या तणावामुळे त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे.त्याचबरोबर सुरक्षित प्रवासाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
    अशा पार्श्वभूमीवर लोको पायलट (चालक)विनोद जांगिड सह सगळेच चालक हे आज हिरो आहेत.इतकंंच !

    ✒️लेखक:-विठ्ठलराव वठारे(उपाध्यक्ष
    पॉवर ऑफ मिडिया फाऊंडेशन महाराष्ट्र)
    joshaba1001@gmail.com