राष्ट्रसेवा दलाच्या ‘फ्रायडे फ्लेम’मध्ये डॉ. अमर्त्य सेन करणार संबोधित

    60

    ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चिमूर(दि.3जून):-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रसेवा दलाने गेल्या ७ मे पासून सुरू केलेल्या ‘फ्रायडे फ्लेम’ ऑनलाइन अभियानाच्या समारोपात येत्या शुक्रवारी (४ जून) रोजी रात्री ८ वाजता नोबेल परितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. अमर्त्य सेन भारतीयांशी फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधणार आहेत. यात ते ‘आधीच आर्थिक संकट, त्यात जैविक आणि वैचारिक कोरोनाचे संकट, या संकटांचा सामना कसा करायचा?’, या विषयावर डॉ. अमर्त्य सेन बोलणार आहेत. तर या कार्यक्रमात महात्मा गांधीजींचे नातू प्रा. राजमोहन गांधी हे अध्यक्ष असणार आहेत.

    दि. ४ जुन हा राष्ट्रसेवा दलाचा स्थापना दिन ‘निर्धार दिन’ म्हणून साजरा केला जातो. सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष व जागतिक किर्तीचे भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या खास निमंत्रणावरून हे दोन्ही दिग्गज देशाला संबोधित करणार आहेत. देशभरातील सेवादल व समविचारी चळवळीतील कार्यकर्ते, लेखक, कलावंत आणि पत्रकार या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे सेवादलाचे राष्ट्रीय महासचिव अतुल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. याआधी मालिका साराभाई, नंदिता दास, इंदिरा जयसिंग, कन्हैया कुमार, अशोक वाजपेयी, रावसाहेब कसबे, सईदा हमीद, निखिल वागळे, डॉ. झहीर काझी, नितिन वैद्य, एअर मार्शल मातेश्वरन, ओरदेता मेंडोसा, कपिल पाटील आदींनी आजवरच्या ‘फ्रायडे फ्लेम’मध्ये हजेरी लावली होती.

    लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा आणि बंधूता या संविधानिक मुल्यांशी कटिबद्धता राखत राष्ट्रसेवा दल काम करत आहे. कोविडमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या प्रती सहवेदना आणि फॅसिझम विरोधात लोकशाही निर्धार व्यक्त करण्यासाठी ४ जून रोजी देशभरातील कार्यकर्त्यांनी एक दिवसाचा उपवास करावा, असे आवाहन डॉ. गणेश देवी यांनी केले आहे. यासाठी आतापर्यंत ११ हजार कार्यकर्त्यांनी नोंदणी केली आहे,अशी माहिती राष्ट्र सेवा दलाचे सुरेश डांगे, इम्रान कुरेशी, नफिसा शेख,सीमा भसारकर, विलास फलके, मोतीराम कुळमेथे, नंदकिशोर शेरकी, दिलीप झाडे,राबिन करमरकर आदींनी दिली आहे.