घाटकुळ येथे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन आयोजित

    49
    Advertisements

    ?संमेलनाध्यक्ष पदी डॉ. नामदेव कोकोडे तर स्वागताध्यक्षपदी विनोद देशमुख यांची निवड

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    चंद्रपूर(दि.15ऑक्टोबर):- राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे १८ वे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन आदर्श गाव घाटकुळ (ता. पोंभुर्णा जि. चंद्रपूर ) येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर दोन दिवसीय संमेलन दि. १२ व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी होत असून या संबंधीची महत्त्वाची सभा घाटकुळ येथे नुकतीच संपन्न झाली. सदर संमेलनाचे आयोजन सर्व ग्रामस्थ, सर्व स्थानिक मंडळ आणि श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत असून राष्ट्रसंत साहित्य दिंडी, उद्घाटन समारंभ, विशिष्ट सेवा पुरस्कार वितरण, परिसंवाद, सप्तखंजेरी युवा कीर्तनकार इंजि. उदयपाल महाराज वणीकर यांचे राष्ट्रीय कीर्तन, सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यानपाठ, निसर्गोपचार व योग प्राणायाम मार्गदर्शन, अनुभव कथन, कवी संमेलन आणि समारोप असे संमेलनाचे एकंदरीत स्वरूप असणार आहे. समितीच्या नियोजन बैठकीत संमेलनाध्यक्षपदी राष्ट्रसंताच्या विचारांचे पाईक माजी प्राचार्य डॉ. नामदेव कोकोडे (ब्रम्हपुरी) यांची निवड करण्यात आली तर स्वागताध्यक्षपदी घाटकुळ येथील सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती विनोदभाऊ देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

    संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झालेले डॉ.नामदेव कोकोडे हे एन.एच. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य असून त्यांनी आजवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनुरूप केलेले शैक्षणिक, विद्यापीठ स्तरावरील कार्य उल्लेखनीय आहे. कर्मयोगी पूज्य गीताचार्य श्रीतुकाराम दादा यांनी सुरू केलेल्या भूवैकुंठ अड्याळ टेकडी च्या सेवाकार्यात त्यांनी योगदान दिलेले आहे. युवा वर्गांना शैक्षणिक मार्गदर्शन, संशोधनपर लेखन आणि जनप्रबोधन या माध्यमातून ते श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यास जुळलेले आहे.

    निवड झाल्याबद्दल दोन्ही मान्यवरांचे परिषदेचे सरचिटणीस ऍड. राजेंद्र जेनेकर, श्रीकांत धोटे, कवी अरूण झगडकर, डॉ. श्रावण बानासुरे, विलास उगे, रामकृष्ण चनकापुरे, सुनिल नाथे, देवराव कोंडेकर, प्राचार्य पत्रे, घाटकुळ चे सरपंच सुप्रिमजी गद्देकर, पोलिस पाटील अशोक पाल, जनहित युवा संघटना चे अध्यक्ष मुकूंदाजी हासे, मराठा युवक मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल धदंरे, संपुर्ण ग्राम पंचायत सदस्यांनी अभिनंदन केले आहे.