मनुस्मृती दहन झाले तरी,…..मनुची मानसिकता आजही जीवंत आहे..

    158
    Advertisements

    विषमता, जातीयता, अन्याय, अत्याचार, निर्दयता, उच्च, निचता, प्रतिगामी, वर्णवर्चस्ववादी, सनातनी अशा अनेक निंदनीय, भ्रामक गोष्टींचे प्रतिक असलेल्या विकृत मानसिकतेच्या मनुस्मृती ग्रंथाला युगप्रवर्तक, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड मुक्कामी २५ डिसेंबर १९२७ रोजी मूठमाती दिली, तिचे जाहिर दहन केले. त्यावेळची एकूण सामाजिक परिस्थिती अत्यंत भयानक, अमानुष होती. प्राचीन काळात रचलेला रोगट मनुस्मृती ग्रंथ सनातनी व्यवस्थेला सर्वज्ञ मंगलमय तसेच परिपुर्ण होता, तर शुद्रातीशुद्रांना व स्त्रीयांना त्यातील नियम बंधनकारक अन् मारक होते. कुप्रसिद्ध मनुस्मृतीने शुद्र व अश्पृश्यांची घोर अवहेलना केली होती. मनुस्मृती ग्रंथ मानव जातीला कलंक अन् माणसात भेदभाव निर्माण करणारा होता. माणूस म्हणून माणसाला माणुसकी नाकारणारा, समाजद्रोही मनुस्मृती ग्रंथ मानव जातीसाठी पवित्र कसा असू शकतो ? तरी सुध्दा, धर्मनिरपेक्ष भारत देशात आजही जाती, धर्माच्या नावावर लोकांना भावनिक बनविले जात आहे. मनुस्मृतीचे दहन झाले तरी, मनुची मानसिकता आजही जीवंत आहे.

    म्हणून, मनुवादी मानसिक जातीयतेतून जोपर्यंत आपल्या भारत देशात जातीय अन्याय अत्याचार, विषमता जीवंत आहेत, तोपर्यंत मनुस्मृतीचा निषेध, दहन करणे हे प्रत्येक भारतीयांचे आद्य कर्तव्यचं ठरणार आहे. कारण, काही लोकांना चातुर्वण्य, विषमतावादी, मनुवादी व्यवस्था अभिप्रेत आहे असेच दिसून येत आहे. म्हणून, ज्यांना मनुस्मृती अभिप्रेत आहे त्यांनी आपल्या घरात फक्त एक महिना मनुस्मृतीची अमलबजावणी करुन पाहावी.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांतीभूमी महाड येथे मनुस्मृती दहन केली त्या संदर्भात स्वराज्य पत्रकाच्या संपाकांनी बाबासाहेबांना एक पत्र लिहिले होते. त्या पत्राला बाबासाहेब सडेतोड उत्तर देतांना म्हणतात, ‘आम्ही जे मनुस्मृतीचे वाचन केले आहे त्यावरुन आमची अशी खात्री झाली आहे की, त्या ग्रंथात शुद्र जातींची निंदा करणारी, त्यांची उपमर्द करणारी; कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्या विषयी समाजात अनादर वाढवणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत. त्यात धर्माची धारणा नसून, असमतेची मात्र धुळवड घातली आहे. स्वयंनिर्णयाचे तत्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावाद्यास असला ग्रंथ कधीचं मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही एवढेचं दर्शविण्याकरिता महाड येथे त्याची होळी करण्यात आली.’ (पृष्ठ १५८ : २ – रिडल्स इन हिंदुइझम : खंड ४)

    मनुने स्त्रीयांनाही स्वातंत्र्य नाकारुन, त्यांना भोगवस्तू म्हणून आत्यंतिक हीन, अपमानित करुन ठेवले आहे.
    “अस्वतन्त्रा: स्त्रिय: कार्या: पुरुषै: स्वैदिंवानिशम् |
    विषयेषु च सज्जन्त्य: संस्थाप्या आत्मनो वशे” (९:२)
    “पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने |
    रक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातंन्त्रमहंति” (९:३)

    म्हणजेच, जवळच्या आप्त पुरुषांने स्त्रीयांना आपल्या ताब्यात ठेवावे. त्यांना इतर विषयांची चटक लागू देऊ नये. त्यांच्यावर रात्रंदिवस नजर ठेवावी आणि स्त्रीच्या लहानपणी तिला तिच्या वडिलांनी सांभाळावे. तरुणपणी तिला तिच्या पतींने संरक्षण द्यावे तर तिच्या म्हातारपणी तिला तिच्या मुलांनी सांभाळावे. स्त्री अशी सतत पराधीन आहे. ती स्वातंत्र्यास पात्र नाही. अजूनही अनेक दुटप्पी, खोडसाळ, भेदभाव विषमतावादी सडकी वचने ओतप्रोत भरलेली आहेत त्यांचीही चिरफाड केली पाहिजे.

    मनुस्मृती जाळण्यामागे, एक ग्रंथ जाळणे एवढाचं बाबासाहेबांचा उद्देश नव्हता तर, लोकांच्या मनात खोलवर रुतलेली सामाजिक विषमता, उच्चनिचतेचे संस्कार जाळायचे होते. कारण, लोकांची सडकी मानसिकता एवढी दळभद्री बनली होती की, मनुस्मृती त्या संस्कारापासून लोकांना मुक्तचं होऊ देत नव्हती. स्वातंत्र, समता, बंधुता अन् माणूस माणसासारखा असतो असे त्यांना वाटत नव्हते. कारण, एक तर मनुस्मृतीला विचार स्वातंत्र्य मान्य नव्हते. त्यामुळे समतेच्या विचाराला विरोध आहे. ब्रम्हदेवाच्या मुखातून ब्राम्हण, बाहूतून क्षत्रिय, मांडीतून वैश्य अन् पायातून शुद्रांची उत्पत्ती झाली ही पक्षपाती निर्मिती कोणाला पटेल का ? वेगवेगळ्या अवयवातून चार वर्णांची उत्पत्ती झाली तर, माणसात वेगळेपण न राहता ती सर्व एक सारखीच कशी असू शकतील हा प्रश्न उपस्थित राहतो. एवढेच नाही तर त्यांच्या कामाचीही विभागणी करुन दिली आहे.

    ब्राम्हणांची कामे – शिकणे, शिकविणे, सजन, याजन, दान घेणे वा देणे. क्षत्रियाची कामे – प्रजा रक्षण, दान देणे, यज्ञ, अध्ययन व विषयासक्त नसणे. वैश्यांची कामे – पशुपालन, दान, यज्ञ करणे, अध्ययन, व्यापार, सावकारी व शेती. तर ब्राम्हण, क्षत्रिय अन् वैश्य या तिन्ही वर्णांची कोणताही दुजाभाव न करता सेवा करणे हे देवांने नेमून दिलेले शुद्राचे काम. म्हणजे, समाजात चारही वर्ण जन्माने ठरतात अन् या चारही वर्णांमध्ये ब्राम्हणांना सर्वश्रेष्ठ दर्जा दिलेला आहे. अन् अशा भंपक, पक्षपाती विचारांची मांडणी करणाऱ्या ग्रंथाला सर्वज्ञ मानणे म्हणजे बिनडोकपणा नव्हे तर मूर्खपणाचं लक्षणं म्हणाव लागेल. त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार चिकित्सक बनता आले तर, कालबाह्य गोष्टी कुरवाळत बसण्याची वेळ कधीचं येणार नाही हे लक्षात घेतल पाहिजे.

    भारत देशात सामाजिक विषमतेची विषवल्ली रोवणार्‍या मनुस्मृतीचे विखारी, संसर्गजन्य रोपटे मुळासकट उपटून, २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाव्दारे देशाची एकता, अखंडता अन् राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे महान करुन, समतावादी, मानवतावादी संवैधानिक प्रशासनाचा पाया रचणार्‍या तसेच माणसाला माणूस म्हणून जगण्याचे समृद्ध सर्वाधिकार देणाऱ्या राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्रतापूर्वक अभिवादन !

    ✒️मिलिंद कांबळे(चिंचवलकर)मो:-९८९२४८५३४९