लाच घेतांना भिऊ नकोस…….मी तुझ्या पाठीशी आहे !

    68
    Advertisements

    लोकांचे मत हेच लोकशाही चे खरे मुळ आहे.पण पन्नास टक्के लोक तेच विकून टाकतात.त्यामुळे लोकशाही ची खोकेशाही झाली आहे.मतविक्रीला कोणाचाही विरोध नाही.ना खरेदी करणाऱ्यांचा ,ना विक्री करणाऱ्यांचा.आता तेच मत विक्रेते पुन्हा विचारतात,आमचे अधिकार कुठे आहेत?आमचा वाटा कुठे आहे?आमचे आरक्षण कुठे आहे?वस्तू विकतात तसे मत विकले गेले कि मत विक्रेता नंतर पाच वर्षं कोणते अधिकार मागतो? कोण देणार अधिकार? कोण देणार सत्तेतील वाटा?कोण देणार आरक्षण? ज्यांनी मत विकत घेतले त्यांनी तरी का द्यावे?कसे द्यावे? कशी शक्यता आहे? त्यांनी तर पैसे मोजून मत घेतले आहे. फुकट मत दिले असते तर चांगला विचार केला असता. दुकानदारांकडून सायकल घेतल्यावर त्या दुकानदाराचा पायडल वर सुद्धा अधिकार राहातं नाही.तसा मतदारांच्या अधिकार तरी कसा राहिल?तसा अधिकार,तसा वाटा,तसा विकास विसरावा लागेल.

    आमच्या जळगाव शहरातील रस्ते मागील दहा वर्षात बनवले नाहीत.आता नगरपालिका निवडणुक जवळ येऊन ठेपली . म्हणून बनवत आहेत.आमदार निधीतून.ते सुद्धा फक्त पन्नास टक्के रस्ते बनवत आहेत.पन्नास टक्के आमदार, नगरसेवक, महापौर, अभियंता खाऊन जातील.रस्ते कंडेम बनवत आहेत.डांबर कमी.वरून फक्त लिपापोती.ठेका नुतनीकरण चा आणि काम फक्त सर्फेसींगचे. आजूबाजूला तीन फूट रस्ते सोडून.हे असे रस्ते पुन्हा दोनच वर्षांत उखडतील.

    या बोगस रस्ते कामबाबत आम्ही लोकांना जागृत करीत आहोत.लोक रस्त्यांची तक्रार करतात पण पुढे येत नाहीत.म्हणे आपण आमदार विरोधात पुढे आलो, नगरसेवक विरोधात पुढे आलो , महापौर विरोधात पुढे आलो तर पुढील निवडणुकीत मतांचे पैसे मिळणार नाहीत .गणपती,नवरात्री ला आमदार कडून, नगरसेवक कडून, महापौर कडून देणगी मिळणार नाही. ही भीती जळगाव च्या लोकांमधे आहे. अनेक लोक सांगतात, आमदार चे आणि आमचे चांगले संबंध आहेत. तर मग रस्त्यांसाठी का बिघडवून घ्यायचे.नगरसेवक, महापौर यांचेशी आमचे चांगले संबंध आहेत.तर रस्त्यांसाठी का बिघडवून घ्यायचे?कामचोर आणि कमीशन खोर लोकांशी प्रेमसंबंध, हितसंबंध, नातेसंबंध, जातसंबंध जपणाऱ्या लोकांनी चांगले रस्त्यांची अपेक्षा करू नये. बिचारा आमदार आणि नगरसेवक कमीशनखोर किंवा कामचोर कि असेना, तो रोख पैसेही देतील आणि चांगले रस्ते ही बनवतील कसे?परवडत नाही त्यांना.राजकारण हा सुद्धा धंदा आहे त्यांचा. जर त्यांनी निधीचा शंभर टक्के वापर करून पुर्ण आणि चांगले रस्ते बनवले तर त्यांना मक्तेदार घर शेती विकून कमीशन देईल का?

    आमदाराला, नगरसेवकाला , महापौराला अशी हरामाची कमाई जर मिळाली नाही तर तो शेत घर दुकान विकून मतांचे पैसे देईल का?गणपती किंवा नवरात्री ला तो घर शेती दुकान विकून पैसे देईल का?त्याने कमीशन न खाता मतांचे व उत्सवाचे पैसे दिले तर तो कंगाल होईल. तो कर्जबाजारी होईल. तो आत्महत्या करील.हा त्यांच्यावर अन्याय नाही का?चोर असला तरी त्याने घस खाऊन धंदा का करावा? म्हणून जळगाव चे नागरिक आमदार विरोधात, नगरसेवक विरोधात, महापौर विरोधात बोलत नाहीत. खड्डा दिसला कि ते झाडे लावतात. पुजा करतात. अगरबत्ती लावतात. पण म्हणत नाहीत कि आमचा आमदार कमीशनखोर आहे, आमचा नगरसेवक कमीशनखोर आहे, आमचा महापौर कमीशनखोर आहे. तितके निती धैर्य नागरिकांमधे शिल्लक उरले नाही. विकले ते निवडणुकीत. विकले ते उत्सवात.

    असे मत विकणारे माणसे मैदानात येत नाहीत.ते कोपऱ्यातच कण्हतात, रडतात. आमदाराच्या नावाने बोटे मोडतात.जळगाव मधील मतदार हे आमदार आणि नगरसेवक कडून मतांचे रोख पैसे घेऊन टाकतात. अक्षरश: मागतात. का हो मामा, तुमचा माणूस आला नाही अजून. मामा ही तितकेच प्रेमाने उत्तर देतात. पाठवतो. म्हणजे मागणाऱ्याला ही लाज नाही आणि देणाऱ्याला ही काहीच वाटत नाही.त्यामुळे आमदार, नगरसेवक रस्त्यांची गटारींची आरोग्याची कामे करीत नाहीत.त्यामुळे इतर प्रामाणिक मतदार त्यांचे दुष्परिणाम भोगतात.

    जळगाव मधे सुरेश जैन पाच वेळा आमदार होते. आता सुरेश भोळे दोन वेळा आमदार आहेत. दोघांना अनुभव आहे कि, येथे जळगाव चे लोक फुकट मत देत नाहीत. म्हणून ज्यांच्याकडे पैसा आहे तोच येथे आमदार निवडून येतो. ज्याच्याकडे पैसा आहे, तोच नगरसेवक निवडून येतो. इतकेच नव्हे, ज्यांच्याकडे नगरसेवक विकत घेण्याची औकात आहे तोच महापौर बनतो. राजकारणाचे पुर्णपुणे व्यापारीकरण केलेले आहे. एक काळ सुरेश जैन यांचा होता. विकास करता करता तेच अपहाराचे आरोपी ठरले. मागील दहा वर्षे त्यांनी वनवास भोगला. अक्षरश:जिवनाचे मातेरे केले.ढोल वाजवत, गुलाल उडवत नाचणाऱ्यांना हे कसे कळणार? सुरेश जैन यांनीही या नाचणाऱ्यांच्या राक्षसी प्रेमाला भुलून जाऊ नये. अति उत्साहात येऊन चुकीचे पाऊल टाकू नये. जो जेलमध्ये फरशीवर झोपतो, त्यालाच ते कळते. कैदी जेलमध्ये झोपतो कसा? जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे! या ढोलताशावर नाचणारे, गुलाल उधळणाऱ्यांना एक महिना धुळे जेलच्या फरशीवर झोपण्याची संधी द्या, तेंव्हा कळेल कि दादांनी किती वाईट अनुभव घेतला असेल. दादांचे आता तरी डोळे उघडले पाहिजे, म्हणून सांगतो.

    सुरेश जैन यांच्या गैरहजेरीत हेच नाचणारे हस्तक २०१४मधे मतदारांपर्यंत पोहचले नाहीत. वरच्या खिशातून काढले आणि खालच्या खिशात घातले. सुरेश भोळेंचे मात्र बरोबर पोहचले. नेहमीच्या सवयीप्रमाणे मतदारांनी घेतल्या पैशाला जागले. बेईमानीके धंदेमे इमानदारी दाखवली.ज्याचे पैसे घेतले त्यालाच मत दिले.
    जळगाव मनपातील शिवसेना मिस्रीत खानदेश विकास आघाडी होती. जळगांव नगरपालिका म्हणजे फुले मार्केट मधील किरकोळ विक्री चे दुकानच. पैसे द्या आणि काम करून घ्या. यावर सुरेश जैंनांना आक्षेप नव्हता. म्हणून जळगाव मधील मतदारांनी गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका भाजपला सोपवली. किरकोळ दुकानदारी करणारी नगरपालिका होलसेल दुकान बनवले. काहीच फरक पडला नाही.उलट नगरसेवक आणि नोकरांमधे कोडगेपणा वाढला.नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांची सत्ता आली कि,हे देशभक्त प्रामाणिक कारभार करतील अशी अपेक्षा फोल ठरली.कांग्रेसच्या सत्तेत लाजत मुरडत लाच घेणारे नोकर आता बिनधास्त , बिनदिक्कत लांच घेऊ लागले.अपहाराच्या नोटा लपतछपत घेणारे नगरसेवक आता नोटा मोजून घेऊ लागले.नरेंद्र मोदी कितीही उंची उंची मारत असले तरी मी खात्रीने सांगतो कि सरकारी भ्रष्टाचार हा सरकारमान्य झाला.भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्यांवर आयपीसी कलम ३५३ चा गुन्हा नोंदवण्याचे मोदींचे मिशन ठरले.त्यावर कडी म्हणजे मोदींनी आयपीसी कलम ३५३ अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा फेब्रुवारी २०१९मधे पांच वर्षांची केली.त्यामुळे अधिकारी, पोलिस आणि कोर्टाने भ्रष्टाचाराला संरक्षण दिले.” चोरी करतांना भिऊ नकोस,मी तुझ्या पाठीशी आहे.”

    भ्रष्टाचार विरोध नावाच्या संस्था, संघटना वर सरकारने आक्षेप घेतला.म्हणे भ्रष्टाचार करणे हा सरकारी नोकर आणि सरकार पक्षाचा पदसिद्ध अधिकार आहे.या आधिकाराचा विरोध कोणीही नागरिकांनी करू नये.म्हणून शहाण्या लोकांनीही भ्रष्टाचार विरोधी संस्था ऐवजी भ्रष्टाचार समर्थक संस्था, भ्रष्टाचार संवर्धक संस्था रजिस्टर करून घेतल्या.याचे श्रेय माननिय ,सन्माननीय प्रधानमंत्री ( बडा प्रधान) नरेंद्र मोदींना द्यावे लागेल.

    कांग्रेस चा भ्रष्टाचार लोकांना जास्त वाटला.म्हणून आण्णा हजारेंनी लोकपाल ची मागणी केली.दिल्लीत जंतरमंतर वर उपोषण करतांना कांग्रेस ने अण्णांना अटक करून जेलमध्ये टाकले.म्हणे हा आधुनिक गांधी आम्हाला भ्रष्टाचार करू देत नाही.लोकांना याची चीड आली.आणि कांग्रेस भुईसपाट केली.पण भाजप सत्तेवर येऊनही आण्णा हजारेंचे भ्रष्टाचार विरोधाचे मिशन यशस्वी झाले नाही. अण्णांना अतिव याचे दुःख झाले.पश्चाताप होत आहे. पण आता त्यांच्यात विरोधाचे त्राण उरले नाही.राष्ट्रवादी आणि शिवसेना हे भ्रष्टाचार विरोधी नाहीतच.त्यांनी कधीही भ्रष्टाचाराचा विरोध केलाच नाही. त्यामुळे जळगाव शहरातील नागरिक आता पर्याय शोधत आहेत.कोणीतरी प्रामाणिक लोकांनी नगरपालिका ताब्यात घेतली पाहिजे.शक्य आहे.पण मताचे पैसे मागितले नाही किंवा दिले तरी घेतले नाही तरच हे शक्य आहे.मताचे पैसे ही द्या आणि प्रामाणिक ही कारभार करा,असे तर कोणालाही शक्य नाही.सराईत चोर कामावर ठेवला आणि तो चोरी करणारच नाही,असे शक्य नाही.

    ✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच
    जळगाव.