ज्ञानदाताई अजून चार आसवं जपून ठेव !

    420
    Advertisements

    ✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

    सध्या भारतातली पत्रकारिता आणि पत्रकारांच्याबाबत सामान्य माणसाच्या मनात अतिशय संतप्त भावना आहेत. ज्या भारतीय पत्रकारितेला विचारांचा आणि लढाऊपणाचा वारसा आहे ती भारतातली पत्रकारिता आज बिकट अवस्थेत आहे. सत्ताधिशांची बटीक झाली आहे. तिचा स्व, सत्व आणि स्वाभिमान भांडवलदारांच्या पायावर पडला आहे. समाजमनात पत्रकार आणि पत्रकारितेबद्दल प्रचंड चिड आहे. लोक पत्रकारांची येथेच्छा टिंगल करत आहेत. पत्रकारांच्या थिल्लर, उथळ आणि ओंगळ प्रवृत्तीने यावर शिक्कामोर्तब केले जात आहे. त्यामुळे कुणीही लुंगा-सुंगा उठतो आणि पत्रकारांच्यावर कसेही बोलतो. मधल्या काळात भाजपाचा बावन्नखुळे असाच बरळला. त्याने पत्रकारांची औकाद काढली. त्यात चुकीचं काय नव्हत पण पत्रकारितेला ही अवकळा पत्रकारांनीच आणली आहे. त्यामुळेच कुणीही खुळं उठत आणि आपली लायकी नसताना पत्रकारांची लायकी काढतं.

    भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात पत्रकारितेला इतकं दारिद्र्य कधीच आले नव्हते. महिना शंभर-दोनशे मानधनावर काम करणा-या पत्रकारांनी पत्रकारिता श्रीमंत केली. तिचा दर्जा उंचावला. तिचा स्वाभिमान, तिचे सत्व जपले. आता पत्रकारितेला ग्लॅमर आले. ग्रामिण पत्रकारांना नाही पण मुख्य धारेतल्या पत्रकारांना चांगले पॅकेज मिळते, चांगला पगार मिळतो. पुर्वीसारखी परवड राहिली नाही. त्यांची परस्थिती सुधारली पण पत्रकारितेचा दर्जा मात्र कमालीचा खालावला आहे. पत्रकारिता दारिद्र्यरेषेच्या खाली आली आहे. पत्रकारितेला वारांगनेचे स्वरूप आले आहे. चौका-चौकात थांबून खानाखुणा करणारी वारांगना या पत्रकारांच्यापेक्षा अधिक पवित्र आणि प्रामाणिक वाटू लागली आहे. इतकी अवकळा आणि दारिद्र्य पत्रकारितेच्या वाट्याला आले आहे. ही बाब नक्कीच चिंताजनक आहे. गाय पट्य्यात तर पत्रकारितेच्या नावाने कशी कशी ‘गाय’ घालतात ते भयंकर आहे.

    पत्रकारिता सोडून द्यावी असे वाटते इतपत पत्रकारितेच्या नावाने थिल्लरपणा सुरू आहे. अनेकवेळा भारत पाकिस्तानची चकमक दाखवताना टिव्ही चँनेलचे अँकर सैनिकाचे ड्रेस घालून येतात, हातात रायफली घेवून बातम्या सांगतात. अजून बरेच काही प्रकार आहेत. पत्रकारांचे नवनवे एकपात्री प्रयोग आणि नौटंकी पाहताना लाज वाटते. कशाचे इव्हेंट करावेत ? कशाला प्राधान्य द्यावे ? कशाला महत्व द्यावे ? याचा सारासार विचारही माध्यमात उरला नाही याची खंत वाटते. अशा अनेक नौटंकीबाजांची सध्या पत्रकारितेच्या कामाठीपु-यात जोरदार चलती आहे. त्यावर किती बोलावं आणि काय बोलाव ? हा प्रश्न पडतो.

    नुकतेच एबीपी माझाच्या अँकर ज्ञानदा कदम यांनी अयोध्येत रिपोर्टींग करताना अश्रू ढाळले आहेत. राम लल्ला गेले अनेक वर्षे तंब्बूत होते याचे त्यांना अतीव दु:ख व आता ते मंदिरात येतायत याचा आनंद अशा दुहेरी भावनांनी ओतपोत भरलेली आसवं त्यांनी ढाळली आहेत. रिपोर्टींग करताना त्यांना कॅमे-यासमोर आसवं अनावर झाली. त्या भावूक झाल्या. या निमित्ताने त्यांची भावुकता आणि संवेदनशीलता त्यांनी दाखवून दिली आहे. त्यांच्या या रडू रडू रिपोर्टींगची येथेच्छ टिंगल सोशल मिडीयात सुरू आहे. खरतेर ज्ञानदा कदम यांच्या भावनांचा मला आदर आहे. त्याबद्दल मला काहीच बोलायचे नाही. त्यांनी रडायचे नाटक केले असेल, ढोंग केले असेल असे म्हणणार नाही पण याच ज्ञानदा कदम यांची संवेदना या पुर्वी गोठली होती काय ? गेल्या आठ-नऊ वर्षात काळजाचे पाणी पाणी व्हावे, काळजाचा थरकाप व्हावा अशा कित्येक घटना घडल्या. माणूसपण कुंठीत व्हावे अशी स्थिती निर्माण झाली.

    मणिपूरचे अत्याचार आठवले तर आत्ताही अंगावर काटा येतो. तिथे महिलांच्यावर केलेले अत्याचार, त्यांच्या स्त्रीत्वाची केलेली विटंबना, त्यांची काढलेली नग्न धिंड, जातीवादी जनावरांनी त्या महिलांच्या अवयवांशी केलेला खिलवाड पाहिल्यावर रक्त उसळून उठते, खवळून उठते. हे सगळ घडत असताना ज्ञानदाच्या डोळ्यात पाणी का आलं नाही ? त्याचा ज्ञानदाला राग का आला नाही ? तिच्यातील स्त्री का पेटून उठली नाही ? किंवा तिने त्यावेळी हंबरडा का फोडला नाही ? राम लल्ला तंबूत होते याचे दु:ख झालेल्या ज्ञानदाला जीवंत माणसाचे मुडदे पाडले जातात याचे दु:ख होत नाही काय ? उन्नाव, कठूआच्या घटना तिला अस्वस्थ करत नाहीत काय ? या बाबत ज्ञानदा काय सांगशील ? तेव्हा तुझ्यातील स्त्रीत्व, तुझ्यातील माणूसपण, तुझ्यातल्या संवेदना कोठे लुप्त झाल्या होत्या ? या बाबत काय सांगशील ज्ञानदा ?

    आज पत्रकारितेची अवस्था पाहिल्यावर भावूक व्हायचे सोडाच पण हंबरडा फोडून रडावे वाटते. या स्थितीबाबत ज्ञानदाला काय वाटतं ? महाराष्ट्रातील राजकारण गटारापेक्षा घाण झालेले आहे. असे राजकारण पाहून ज्ञानदाचे डोळे का पाणावत नाहीत ? राज्यातल्या शेतक-याच्या आत्महत्या पाहून ज्ञानदाच्या डोळ्यातून आसवं का येत नाहीत ? अयोध्येत ढाळलेल्या या आसवांच्यामागे कदाचित ज्ञानदाचा उत्तूंग भक्तीभाव असेलही. ती रामलल्लाची निस्सिम भक्त असेलही पण जीवंत माणसांचे हालहाल होत असताना चकार शब्द न काढणा-या व मुर्ती तंबूत राहिली म्हणून आसवं ढाळणा-या व्यक्तीच्या ह्रदयात भाव जीवंत असेल असं कसं म्हणायचं ? माणसं मरत असताना, अत्याचाराने गुदमरली जात असताना तुमचा ‘भाव’ जागचा हालत नाही, हाललेला दिसत नाही मग त्याला भक्तीचा अंकूर कसा फुटणार ?

    ज्ञानदा अयोध्येतून आसवं ढाळत तशीच महाराष्ट्राच्या गावगाड्यात ये. अयोध्येत रडून सगळीच आसवं संपवू नकोस. चार आसवं जपून ठेव. तिथेच सगळे डोळे मोकळे करू नकोस. किमान डोळ्याच्या कडा ओलावतील इतकं पाणी तरी शिल्लक ठेव. कारण महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात काळजाला भगं पडतील इतकं दु:ख आणि दैन्य अजून शिल्लक आहे. देशाच्या राहू दे महाराष्ट्राच्या गावगाड्यात ये आणि तिथलं सामान्य लोकांचं जीणं बघ. शेतक-यांची, शेतमजुरांची स्थिती बघ. गडचिरोलीचे प्रश्न सोड, प्रगतशील पश्चिम महाराष्ट्रात गणल्या जाणा-या मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातील व शंभू देसाई यांच्या मतदारसंघातील वनवासवाडीला जा. तिथे नऊ महिने पुर्ण झालेल्या बाया झोळीत घालून डोंगरावरून बाळंतपणासाठी खाली आणल्या जातात. त्या झोळीतच बाळंतपणांच्या वेदनांनी किंकाळ्या फोडणा-या या बायांच्या अतीव वेदना कधीतर बघ.

    त्यांच्या रक्ताने माखलेल्या झोळ्या आणि झोळी पकडणा-यांच्या अंगरख्यावर पडलेल्या त्या आया-मायांच्या रक्ताचे डाग बघ. कधीतर गावकुसाबाहेर असणा-या डोंबा-यांच्या, गोसाव्यांच्या, पारध्यांच्या पालावर जा. त्यांचे जीवनमान जवळून बघ. राम लल्ला फक्त सत्तर वर्षे तंबूत होता पण ज्ञानदाताई ही हाडामासाची करोडो माणसं गेली दहा हजार वर्षे झाली अजून माणसातच आली नाहीत. त्यांना या जगात माणूस म्हणून गिणलंच जात नाही. त्यांचे प्रश्नही तुमच्या कार्पोरेट टेबलावर यायला तयार नसतात. बघ जमलं तर यांच्यासाठीही चार आसवं ढाळशील का ?