आश्रमशाळेतील शिक्षकांच्या वेतनाबाबत हयगय खपवून घेणार नाही : आमदार सुधाकर अडबाले

33

 

 

गडचिरोली : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा उपक्रम “समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा” अंतर्गत सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत समस्‍या निवारण सभा २५ सप्टेंबर रोजी प्रकल्‍प कार्यालय सभागृह, गडचिरोली येथे पार पडली. या समस्या निवारण सभेत गडचिरोली प्रकल्पातील शिक्षकांचे वेतन अनियमित होत असल्याचे निदर्शनास येताच आमदार अडबाले यांनी अधिकारी – कर्मचाऱ्यांची कान उघडणी केली. गडचिरोली प्रकल्पातील सर्व आश्रमशाळा मुख्याध्यापकांची बैठक घेऊन वेतन देयके २० तारखेच्या आत सादर करण्याबाबत सूचना द्या आणि वेतनाबाबत हयगय खपवून घेणार नाही, अशी तंबी अधिकाऱ्यांना दिली.

सभेत जीपीएफ व डीसीपीएस च्या पावत्या तात्काळ देणे, एकस्तर वेतनश्रेणी लागू करणे, सेवा पुस्तिका पडताळणी करणे, कर्मचाऱ्यांचे वेतन एक तारखेला अदा करणे, सेवानिवृत्ती प्रकरणे तात्काळ मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव निकाली काढणे, वैद्यकीय प्रतिकृती प्रस्ताव देयके निकाली काढणे, कार्यरत कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा वेतन, वैद्यकीय रजा, प्रसुती रजा व इतर रजा प्रलंबित कर्मचाऱ्यांची माहिती देणे, प्रकल्पातील मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ देणे, कर्मचाऱ्यांची मूळ सेवा पुस्तिका तयार करून त्यांना दुय्यम प्रत अद्यावत करून देणे तसेच इतर सामूहिक व वैयक्तिक समस्यावर चर्चा करून सदर समस्या तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश प्रकल्प अधिकाऱ्यांना आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी दिले. सभेला गडचिरोली प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विमाशी संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नैताम, जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, कार्याध्यक्ष नरेंद्र भोयर, सतीश पवार, दिलीप गडपल्लीवार, आदिवासी संस्कृती संघटनेचे विभागीय अध्यक्ष भोजराज फुंडे, यादवराव धानोरकर, विकास जनबंधू, मनोज निंबार्ते, सूरज हेमके, सहारे सर, नामदेव नागापुरे, अजय पुल्लुरवार तसेच आश्रमशाळा समस्याग्रस्त शिक्षक – कर्मचारी उपस्थित होते.