आमदार कसा पाहिजे?, पैसा देणारा कि काम करणारा?…पैशाने माजलेले पुन्हा निवडणूक लढवणार आहेत!

2577

 

विधानसभा निवडणुक जवळ आली आहे. जे लोक आधी आमदार होते, त्यांनी चिकार माल कमवला. काहींनी तर रस्ते न बनवता निधी हजम केला. काहींनी तर आसाम मधे पळून जाण्यासाठी पन्नास खोके घेतले. काहींनी तर पाणीपुरवठा योजना मंजूर करून जुनीच चालवली. पैसा हजम केला. इतकी हरामाची कमाई असल्यावर पैशांचा माज तर येणारच! असे माजलेले आमदार पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. यांना पुन्हा निवडून दिले तर अंगावर घेणार का? हे आता मतदारांच्या हाती आहे. आपण उच्च कुळातील जात सांगतो. राज्य कर्ती जमात सांगतो. मोठ मोठे राजे महाराजे, साधू संत, महंतांशी नाते सांगतो. तर मग आता या चोरांकडून पैसा घेऊन मत विकणार का? कि दारू मटण घेऊन मत देणार? आत्ताच या चोरांनी, हरामखोरांनी गरीबांच्या माय बहिणीला साड्या, भांडे वाटले आहेत. पुढे काय करतील, हे कोणी सज्जन माणसाला विचारले पाहिजे. का हो!माझी बायको त्या आमदार कडून साडी आणि भांडे घेऊन आली. हा आमचा सन्मान आहे कि अपमान? हा स्वाभिमान आहे कि विटंबना?
काही पहिलवान नगरसेवक होते. महापौर होते.उपमहापौर होते. घर बांधकाम मंजूरी, कम्प्लीशन सर्टिफिकेट साठी खूप लुटमार केली आहे. आपल्या वार्डात, प्रभागात रस्ते मंजूर करून घेतले आणि आपल्याच पतीला, मुलाला, जावईला ठेका दिला. बायको नगरसेवक आणि नवरा ठेकेदार. रस्त्याची गुणवत्ता कोण तपासणार? चोरही आपला आणि पोलिस ही आपलाच. काही रस्ते तर फक्त चार महिन्यांत उखडले. जे तीस वर्षे टिकले पाहिजे होते. काहींनी तर रस्ते बनवले नाहीत. गोलमाल करून निधी हजम केला. असे लोक आता दोनशे कोटींचे मालक झाले आहेत. तर मग पैशांचा माज तर येणारच! म्हणून निवडणुकीत पैसा फेकणार. मते विकत घेणार. पुढे हाच धंदा लार्ज स्केल वर करणार! भाचा आता मामाची बरोबरी करू लागला आहे. असा आमदार निवडून दिला तर राज्याचा सत्यानाश अटळ आहे.
काही लोकांनी व्यापार, उद्योग मार्गाने पैसे कमवले. ते वेगळे स्कील असते. ते सुद्धा आता उमेदवारीचे तिकीट विकत घेऊन उमेदवारी करणार आहेत. जर पक्ष नेता असे पैसे घेऊन कोणालाही उमेदवारी देत असेल तर तो सर्वात मोठा चोर!महाचोर! चोरांचा सरदार ! महाराष्ट्र मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री साठी वीस कोटीचा दर होता. राज्य मंत्री साठी दहा कोटीचा दर होता. घेणारा तर महाचोर आहेच, पण देणारा काय शोभेसाठी किंवा सेवेसाठी इतके पैसे मोजणार का? आमदाराला पांच वर्षात तीनशे कोटी मिळाले. तर मग मंत्री ला किती मिळाले असतील? दोन हजार कोटी. यातून दोनशे कोटी भुगा पडतो. तितका भुगा खाऊन कंगाल टपरीवाला मालामाल होऊ शकतो. असा माणूस पुन्हा उमेदवारी करीत असेल तर कोंबडी, बकरी, गाय, म्हैस सारखेच माणसे बाया विकत घेतो. घे पैसा, बस गाडीत, कर मतदान! ही स्कीम जोमात चालू आहे. एकाही पक्ष नेत्याला यांची खेद खंत नाही. तर लाज कशाला वाटेल?
हा इतका भ्रष्टाचाराचा हाहाकार माजलेला आहे. आणि आपण मतदार फक्त चुईंगम सारखे डोळे चोळत आहोत. जाऊ दे रे! राजकारण नासलेले आहे,सडलेले आहे. बिघडलेले आहे. मी म्हणतो, नाही रे येड्या! तूच गोंधळलेला आहे. तूच श्रीमंत चोराला नेता समजतो. पैसे घेतो आणि आरतीला बोलवतो. गणपती सोबत चोरांची आरती करतो. तू कधी कधी विचारच करीत नाही कि, हा माणूस मंडळाला देणगी का देतो?, बायकोला साडी का देतो?बहिणीला भांडी का देतो? मुलांना दारू का देतो? मला मटण जेवण का देतो? कोठून आणत असेल हा पैसा?याचा कधी विचार केला का? मी सांगतो, हा पैसा तुमच्याच रस्ते गटारी सफाई, पाणीपुरवठा, आरोग्य, शाळा, बांधकाम रेती राशन मधून चोरलेला असतो. तुम्ही फुकटची दारू प्याल्यामुळे धुंदीत असतात. कसे कळणार?, बायको साडी आणि भांडी घेऊन खूष असल्यामुळे खुशीत असते. तिला तरी कसे कळणार? पण मला कळते म्हणून मी सांगतो‌. मी शुद्धीवर आहे म्हणून लिहीतो, बोलतो. मी वाट पाहातो, तुम्ही पण कधीतरी शुद्धीवर येणारच! चोराला मत नाही विकणार!
अरे येड्या माणसा, आमदार हा विकास काम करण्यासाठी असतोच, शिवाय प्रशासकीय कामात मदत करण्यासाठी लागतोच. त्याशिवाय हे लाचखोर नोकर कागद पुढे सरकवत नाहीत. म्हणून यांना बुद्धीमान उच्चशिक्षित ज्ञानी दमदार आमदार दम देतो तेंव्हा हे नोकर काम करतात. नाहीतर तुम्ही चकरा मारत बसा. ते सांगतात, साहेब मीटींग मधे आहेत. कलेक्टर सोबत मिटींग आहे. साहेब रजेवर आहेत. साहेबाची बदली झाली. आता नवीन मॅडम आली आहे. ३६५ दिवसातून ३०० दिवस मिटींग, रजा, बदली यात जातात. जेंव्हा सापडतो खुर्चीवर तेंव्हा म्हणतो, तुमचे प्रकरण जुने झाले आहे. आता नवीन करा. म्हणजे पुन्हा हेल्या वाणी हेलपाटा. बैलावाणी गरगर घाणा. अशा नाठाड, कामचोर, लाचखोर नोकरांकडून प्रशासकीय काम करून घेण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त बुद्धिमान उच्चशिक्षित ज्ञानी आणि शहाणा आमदार पाहिजे. खरी गरज येथे आहे, आमदारांची. निधी तर मिळतोच. मुख्यमंत्री काय देईल, त्याचा बाप देईल, अर्थमंत्री काय देईल, त्याचा बाप देईल. आम्हीच आहोत कर देऊन निधी जमवून देणारे बाप. पण त्यासाठी तुमचा आमदार तितका दमदार पाहिजे. नाहीतर, साहेब, कायबी करा, पण मला निधी द्या. वाटल्यास तुमचे आणि अर्थमंत्री चे कमीशन काढून घ्या. असे नकोच. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीच्या कानफटीत लावून निधी घेतला पाहिजे. कारण तो निधी त्यांच्या मालकीची जमीन विकून देत नाही. तो निधी आमच्या करातून जमा होतो. हे तुम्हाला कळले पाहिजे. त्यासाठी कोणाची साडी, भांडी, दारू मटण पैसे घेऊन मिंधा नको .
चोरांचे पैसे, दारू, मटण, साडी, भांडी या लालसेने मत विकू नका.जर विकले तर तुम्ही जागृत माणसे नाहीत. शहरातील, जिल्ह्यातील, राज्यातील माणसांना आम्ही राजकीय, शासकीय, प्रशासकीय जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. जर कोणी जागृत झाला असेल तर त्यांनी इतरांना जागृत केले पाहिजे.

जे अतीत, पतीत, झोपेत,
तया जाऊन उठवावे!
जे दलित, पिडित,वंचित
तया जाऊन उठवावे!

 

शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
९२७०९६३१२२