समाजाच्या पलीकडे जाऊन धर्मनिरपेक्ष कुटुंबाचा क्रांतदर्शी विचार महात्मा फुलेंनी दिला : गणपत धुमाळे जळगाव येथे सत्यशोधक समाज स्थापना दिना निमित्त विविध कार्यक्रम !… विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी : विजय लुल्हे (जिल्हा समन्वयक सत्यशोधक समाज संघ )

40
Advertisements

 

प्रतिनिधी – पी डी पाटील सर

जळगांव – ‘ समाजाच्या पलीकडे जाऊन धर्मनिरपेक्ष कुटुंबाचा क्रांतीदर्शी विचार महात्मा फुले यांनी दिला.आजकालची शिक्षण पद्धती ही कॉपी-पेस्ट प्रमाणे झाली आहे.युरोपियन राज्यघटना व भारतीय राज्यघटनेतील मूलभूत फरक सोदाहरण सांगून धर्मसत्तेच्या नियमबाह्य घटनांवर पायबंद घालण्याचा महत्वाचा लोकसत्ताक अधिकार डॉ.बाबासाहेबांनी संविधानाने द्रष्टेपणाने दिला आहे.अल्पसंख्यांकांना कायदेशीर अधिकार व सुरक्षा प्रदान केली आहे. ‘ असे प्रतिपादन
गणपत धुमाळे ( सहाय्यक प्राध्यापक , एस.एस. मणियार महाविद्यालय जळगाव ) यांनी केले.महात्मा जोतिराव फुले स्थापित सत्यशोधक समाजाच्या १५१ व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या व्याख्याना प्रसंगी दि .२४ सप्टेंबर २०२४ रोजी विद्यार्थी सहाय्यक समिती जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करतांना धुमाळे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरवादी ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर ( माजी शिक्षण उपसंचालक प्राथमिक विभाग ) असून प्रमुख अतिथी ॲड.विजय राजपूत ( मानवमुक्ती मिशन एरंडोल तालुकाध्यक्ष ), ॲड. शुभम तायडे , चित्रकार सुनिल दाभाडे ( अध्यक्ष, द्वारकाई प्रतिष्ठान, जळगाव ) , संयोजक विजय लुल्हे ( जिल्हा समन्वयक , सत्यशोधक समाज संघ जळगाव ) विचारपीठावर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांचे हस्ते क्रांतीसूर्य फुले यांच्या अर्धपुतळ्याचे व कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. प्रमुख अतिथींचे स्वागत शाल व महात्मा फुल्यांवर लिखित पुस्तके देऊन सत्यशोधक समाज संघातर्फे हृद्य स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थी सहाय्यक समितीतर्फे सत्यशोधक कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांची प्रतिमा उपस्थित मान्यवरांना देऊन अनौपचारिक सत्कार करण्यात आला .
ॲड. विजय राजपूत यांनी मार्गदर्शनपर भाषणात जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द केले नसून ते फक्त निष्क्रीय केले आहे. याचा सर्वसामान्यांना कोणताच फायदा नसून फक्त उद्योगपतींना छुपा फायदा मिळवून देण्यामागील कुटील षडयंत्र सांगितले. प्रत्येकाने केवळ सत्यशोधन करून न थांबता कृतीशील धर्मनिरपेक्ष सत्यशोधक झाले पाहिजे असे आवाहन राजपूत यांनी केले. सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक विजय लुल्हे यांनी अभिवाचन संकल्पना स्पष्ट करून रोज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या चरित्र ग्रंथाचे अखंड वाचन विद्यार्थ्यांनी करून रोज महापुरुष , समाज सुधारक तसेच क्रांतिवीरांचे प्रेरणादायी सुविचार लेखन केले पाहिजे असे आवाहन केले.
समारोपाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनपर भाषणात माजी शिक्षण उपसंचालक शशिकांत हिंगोणेकर म्हणाले की ,’ आजही परिवर्तनाचा विचार देशात रूजू दिला जात नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे महात्मा फुले यांना वैचारिक पाईक मिळाले असते तर सार्वजनिक सत्यधर्म हाच देशाचा मुख्य धर्म राहिला असता.लोकमान्य टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी नव्हे तर ब्राह्मणशाहीच्या स्वराज्यासाठी चळवळ केली होती.भारतीय संविधान देशाचा मानबिंदू अर्थात राष्ट्रिय ग्रंथ असल्याने प्रत्येकाने वाचून घरोघरी संग्रही ठेवला पाहिजे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर पवार यांनी केले. कार्यक्रमास सत्यशोधक रविंद्र तितरे , योगेशे कोलते , दिपक राजपूत , सुरेश सपकाळ व अशोक सोनवणे यांचे अमूल्य मार्गदर्शन मिळाले.यांचे कार्यक्रमास डॉ.अजय झोपे , जगदिश राठोड, लोकेश पाटील, मयूर भोई, लोकेश पाटील, श्रीकांत पडळकर सहकार्य केले.