भारतातील गांव शहर: स्वच्छतेची उमदी लहर (स्वच्छ भारत मिशन विशेष.)

35

 

_अधिकृतपणे दि.१ एप्रिल १९९९पासून भारत सरकारने व्यापक ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाची पुनर्रचना केली आणि संपूर्ण स्वच्छता मोहीम-टीएससी सुरू केली ज्याचे नंतर दि.१ एप्रिल २०१२ रोजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी निर्मल भारत अभियान- एनबीए असे नामकरण केले होते. दि.२४ सप्टेंबर २०१४ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने निर्मल भारत अभियानाची पुनर्रचना स्वच्छ भारत अभियान म्हणून करण्यात आली. माहितीपूर्ण लेख श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींचा अवश्यच वाचा… संपादक._
निर्मल भारत अभियान- संपूर्ण स्वच्छता मोहीम हा भारत सरकारने सुरू केलेला समुदायांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण स्वच्छता- सीएलटीएसच्या तत्त्वांतर्गत एक कार्यक्रम होता. ज्या गावांनी हा दर्जा प्राप्त केला, त्यांना निर्मल ग्राम पुरस्कार नावाच्या कार्यक्रमांतर्गत आर्थिक पुरस्कार आणि उच्च प्रसिद्धी मिळाली.
टाइम्स ऑफ इंडियाने माहिती दिली की मार्च २०१४मध्ये युनिसेफ इंडिया आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांनी १९९९मध्ये भारत सरकारने सुरू केलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून स्वच्छता परिषद आयोजित केल्यानंतर ही कल्पना विकसित करण्यात आली.
नऊ वर्षांपूर्वी सन २०१४मध्ये पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छतेच्या जागृकतेविषयी नारा दिला होता. त्याला प्रतिसाद देत समाजातल्या सर्व स्तरातील नागरिकांनी स्वच्छ भारतासाठी मालकी घेण्यास प्रचंड उत्साह दाखवला होता. परिणामी स्वच्छता हे राष्ट्रीय आचरण बनले आणि स्वच्छ भारत अभियान हे नाव घराघरात पोचले.
गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी देशवासीयांना कृती करण्याचे अनोखे आवाहन केले आहे. मागील वर्षी सन २०२३मध्ये मन की बातच्या १०५व्या भागात पंतप्रधानांनी १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता स्वच्छतेसाठी १ तास श्रमदान करण्याचे आवाहन केले. यावेळी गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला देशातील सर्व नागरिक एकत्रितपणे त्यांना “स्वच्छांजली” अर्पण करतील. स्वच्छता ही सेवा अभियान या विषयावर बोलताना ते म्हणाले होते, १ ऑक्टोबर रोजी म्हणजेच रविवारी सकाळी १० वाजता स्वच्छतेबाबत एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. आपणही वेळ काढून स्वच्छतेच्या या मोहिमेत सहभागी होऊन मदत करावी. यंदाही आपण या स्वच्छता मोहिमेत आपल्या गल्लीत किंवा परिसरात किंवा उद्यान, नदी, तलाव किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी देखील सहभागी होऊ शकतो.
या महास्वच्छता मोहिमेद्वारे यंदा मंगळवार १ ऑक्टोबर २०२४ रोजी सर्व स्तरातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणे जसे की बाजारपेठ, रेल्वे मार्ग, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी स्वच्छतेच्या प्रत्यक्ष उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले जाते. प्रत्येक शहर, ग्रामपंचायत, नागरी विमान वाहतूक, रेल्वे, माहिती आणि तंत्रज्ञान यासारख्या शासनाच्या सर्व विभागांना, सार्वजनिक संस्था नागरिकांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेच्या कार्यक्रमांसाठी सुविधा उपलब्ध करून देतील. सामाजिक संस्था, रहिवासी कल्याण संघटना, खाजगी उपक्रम, स्वच्छता कार्यक्रम आयोजित करण्यास इच्छुक असलेल्या संस्था पोर्टलच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासनाकडे ऑनलाइन अर्ज करू शकतात. स्वच्छता ही सेवा उपक्रमासंबंधी https://swachhatahise.com या खास निर्माण करण्यात आलेल्या संकेतस्थळावर सार्वजनिक माहितीसाठी स्वच्छता कार्यक्रम उपलब्ध असतील. स्वच्छतेच्या ठिकाणी नागरिक फोटो काढू शकतात आणि हे फोटो पोर्टलवर अपलोडही करू शकतात. या पोर्टलमध्ये नागरिकांना, मोहिमेला वाहून घेतलेल्या लोकांना या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आणि स्वच्छतादूत बनून लोकांच्या चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी आमंत्रित करणारा विभाग देखील आहे. १५ सप्टेंबर ते २ ऑक्‍टोबरपर्यंत साजरा होणारा स्वच्छता पंधरवडा हा स्वच्छता ही सेवा २०२४ या उपक्रमाच्या स्वच्छता मोहिमेचा एक भाग आहे. जुन्या इमारतींचे जीर्णोद्धार, जलकुंभ, घाट, भिंती रंगविणे, नुक्कडनाटके स्पर्धा आयोजित करणे अशा विविध स्वच्छता उपक्रमात नागरिक सहभागी होत आहेत. हा पंधरवडा सुरू झाल्यापासून, या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमात आतापर्यंत ५ कोटीहून अधिक नागरिक सहभागी झाले असल्याचे बोलले जात आहे.
स्वच्छ भारत अभियान हा भारताच्या ४ हजारहून अधिक शहरांच्या, रस्त्यांच्या व भारतातील विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी भारत सरकारने सुरू केलेला राष्ट्रीय पातळीवर अभियान आहे. हे अभियान दि.२ ऑक्टोबर २०१४ रोजी राजघाट, नवी दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू झाले. त्यांनी स्वतः रस्त्याला स्वच्छ केले. मोदीजी म्हणाले होते, “महात्मा गांधींना सर्वात मोठे स्मारक म्हणजे २०१९मध्ये त्यांच्या १५०व्या जयंतीला त्यांची स्वच्छ भारताची इच्छा साध्य करणे होय. हे भारताच्या स्वच्छतेसाठी सर्वात मोठे अभियान आहे. यात ३० लक्षाहून अधिक सरकारी कर्मचारी व शाळेतल्या व कॉलेजमधल्या मुलांनी भाग घेतला आहे.” विशेष म्हणजे स्वच्छ भारत अभियान ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात राबविले जात आहे. स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) हे पेयजल व स्वछता मंत्रालयांमार्फत व स्वच्छ भारत अभियान (शहरी) हे शहर विकास मंत्रालयमार्फत राबविले जात आहे. दि.२ ऑक्टोबर २०१४ला ग्रामीण भागासाठी निर्मल भारत अभियानाची पुर्नरचना करून स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) सुरू करण्यात आले. तर शहरी भागात ते संपूर्णपणे नव्याने सुरू करण्यात आले आहे. सन २०११च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागातील ३३ टक्के ग्रामीण कुटूंबांनाच शौचालयाच्या सुविधा होत्या, तर २०१३मधील नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनच्या पाहणीनुसार ग्रामीण भागातील ४१ टक्के ग्रामीण कुटूंबानाच शौचालयाच्या सुविधा होत्या, स्वच्छ भारत अभियानाने २०१९पर्यंत स्वच्छ भारत साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. यासाठी ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या पातळीत सुधारणा करणे व गावे हागणदारीमुक्त करणे हे साधारण उद्दिष्ट ठेवले. यासाठी ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालये, सार्वजनिक स्वच्छतागृहे, सामुदायिक स्वच्छतागृहे, शाळा व अंगणवाड्यामध्ये शौचालये, घन व द्रव कचरा व्यवस्थापन यंत्रणा उभारून कार्यक्रमाच्या प्रभावी अंलबजावणीवर भर देण्यात येत आहे.
निर्मल भारत अभियानात पुढील सुधारणा करून स्वच्छ भारत अभियान कार्यरत आहे-
१) वैयक्तिक शौचालयाची किंमत १०,०००रु. ऐवजी १२,०००रु. ठरविण्यात आली आहे.
२) वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी केंद्र- राज्य वाटा ७५:२५ व ईशान्यपूर्व राज्ये व जम्मू-काश्मीरसाठी ९०:१० असाच आहे.
३) भविष्यात इंदिरा आवास योजना लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठीची मदत इंदिरा आवास योजनेतून मिळेल. सध्या ती स्वच्छ भारत अभियानातून दिली जाते.
४) शाळांमधील शौचालयांच्या उभारण्याची जबाबदारी मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे तर अंगणवाड्यामधील शौचालय उभारणीची जबाबदारी महिला व बालविकास मंत्रालयाकडे देण्यात आली आहे.
५) लोकसहभाग व मागणी वाढावी यासाठी स्वच्छतागृहांचा वापर करणे व लोकांच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल करणे यावर सर्वाधिक भर दिला जात आहे.
६) योजनेचे लक्ष्य निर्मल भारत ऐवजी स्वच्छ भारत, असे झाले आहे व योजनेचे साध्य वर्ष २०२२ ऐवजी २०१९ झाले होते. यंदा सन २०२३ साली भारताचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेबांनी सर्वसामान्य जनतेला हाक दिली आहे, “बंधभगिनींनो, येत्या १ ऑक्टोबर रोजी सर्वजण घरातून बाहेर या आणि रस्ते, सार्वजनिक स्थळे स्वच्छ- लख्ख करण्यासाठी फक्त १ तास श्रमदान करा.”
जलपर्णी मुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई अभियान- स्वच्छ भारत अभियानाला साथ देत मागील वर्षी पिंपरी चिंचवड़ मध्ये पर्यावरण प्रेमिनी पवना नदी स्वछता अभियान जलपर्णी मुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई अभियान सुरू केले. पहिले पर्व २०१७-१८ तब्बल २१५ दिवस चालले. या अभियानामध्ये एकूण १४५५ ट्रक जलपर्णी पवना नदीतून बाहेर काढण्यात आली. जून महिन्यात पावसाळा सुरू होत असल्याने त्यावेळी अभियानाला थांबविण्यात आले होते. पावसाळा संपताच या अभियानाला पुन्हा सुरू करण्यात आले होते.
चला तर, बंधुभगीनींनो या, मा.मोदीजींच्या हाकेला ओय देत केवळ एक तास श्रमदान करून स्वच्छ भारत मोहिम यशस्वी करूया आणि २ ऑक्टोबर रोजी शास्त्रीजी व गांधीजींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करूया!

– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.
रामनगर, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.