‘ ट्रान्सजेंडर ‘ व्यक्तींच्या प्रश्नांवर सामाजिक भान निर्माण व्हावे – बहिणाबाई विद्यापीठातील कार्यशाळेत मान्यवरांचा सूर

18

 

 

जळगाव :- ट्रांसजेंडर व्यक्तीकडे माणूस म्हणून बघण्याचे , त्यांच्या अस्तित्वाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे सामाजिक भान निर्माण करण्याची आज काळाची गरज आहे असा सुर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र विभागा तर्फे आयोजित कार्यशाळेत मान्यवरांनी व्यक्त केला .
माध्यम प्रशाळा , नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स , मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट , नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ३० रोजी ‘ ट्रान्सजेंडर आणि सामाजिक भूमिका ‘ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली .
प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ . एस. टी . इंगळे अध्यक्षस्थानी होते त्यांनी ट्रान्सजेंडर लोकांची संख्या जगात केवळ एक टक्का आहे त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडविणे ही सहज शक्य गोष्ट आहे , या लोकांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोण आजही सकारात्मक नाही , त्यांना आपण मानवतेच्या भूमिकेतून वागविले , त्यांच्या शिक्षण , आरोग्य , रोजगार यावर आपण लक्ष केंद्रित केले तर ते सामाजिक प्रवाहात येतील असे मत मांडले .
उप जिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी सांगितले की ट्रान्सजेंडर समूह हा एकलकोंडे जीवन जगतो , त्यांच्या जवळ उत्पादनाचे साधन नसते , भिक मागून ते आपला उदर निर्वाह करतात मात्र आपल्या संविधानाने त्यानाही समानतेने जगण्याचा अधिकार प्रदान केला आहे . तेंव्हा समाजाने या लोकांचे प्रश्न मानवतेच्या भूमिकेतून समजून घेतले व त्यांना आपल्यात सामावून घेतले तर हा समाज मुख्य प्रवाहात येऊ शकतो .
साहित्यिक जयसिंग वाघ यांनी ट्रान्सजेंडर समूहाशी केवळ सहानुभूतीने वागून चालणार नाही तर त्यांना सामाजिक , शैक्षणिक व एकूणच राष्ट्रीय प्रवाहात आणण्याची गरज आहे , विद्यापीठ अश्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देवून , या विषयाचे साहित्य अभ्यासक्रमात लावून , अश्या विद्यार्थ्यांच्या साहित्यास प्रकाशित करण्या करिता पुढाकार घेवून या समूहास शैक्षणिक प्रवाहात आणु शकते . या समूहाची शैक्षणिक प्रगती झाली की इतर प्रश्न सहज सोडविता येतील , राजकीय पक्षांनी ट्रान्सजेंडर सेल काढून यांना राजकीय प्रवाहात आणावे असे विचार व्यक्त केले .
प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते डॉ. भरत अमळकर यांनी संत साहित्यात , अध्यात्म शास्त्रात या लोकांना मर्यादे पलीकडे महत्व दिलेले नाही , या लोकांच्या संदर्भाने आजही अनेक गैरसमज आहेत असे मत मांडून नटराज हे ट्रान्सजेंडर होते मात्र रंगकर्मी आजही त्यांची पूजा करून त्यांचा सन्मान करतात हा आदर्श आपण घ्यावा असे आवाहन केले .
प्रसिध्द रंगकर्मी शंभू पाटील यांनी रामायण , महाभारत , पुरातन काळातील काही संदर्भ देत हे लोक त्या काळी कसे जीवन जगत होते याबद्दल माहिती दिली . ट्रान्सजेंडर ही समस्या नसून त्यांच्याकडं पाहण्याचा आपला दूषित दृष्टिकोण हीच खरी समस्या आहे असे सांगितले .
जेष्ठ समाजसेविका वासंती दिघे यांनी अश्या व्यक्तीची त्याच्या कुटुंबा कडूनच हत्या होते त्यामुळे यांना जगण्या करिता मोठा संघर्ष करावा लागतो , पुरुषसत्ताक समाज व्यवस्था व लिंग सापेक्ष प्रतिष्ठा देण्याची आपली मानसिकता यामुळे या लोकांचे प्रश्न अधिक वाढत आहेत असे विचार मांडले .
समारोप परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ . योगेश पाटील यांच्या भाषणाने झाला . त्यांनी अश्या उपक्रमांत ट्रान्सजेंडर लोकांना बोलावून त्यांना बोलते केले , त्यांचे प्रश्न त्यांच्या कडून समजून घेतले तर सामाजिक दृष्टिकोण बदलविण्यास अधिक मदत होईल असे मत मांडले .
कार्यक्रमाच्या सुरवातीस सावित्रीबाई फुले , बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमांना सर्व मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले . दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
प्रास्ताविक संयोजक प्रा. डॉ. सुधीर भटकर , सूत्रसंचालन प्रा. डॉ. गोपी सोरडे यांनी तर आभार प्रदर्शन ऍड. सूर्यकांत देशमुख यांनी केले. अमोल पाटील , वैभव भोंबे , रंजना चौधरी , प्रल्हाद लोहार , मंगेश बाविसाने , पंकज शिंपी , धनंजय देशमुख यांनी परिश्रम घेतले . कार्यशाळेत विद्यार्थी , प्राध्यापक मोठ्यासंख्येने हजर होते.