जिल्ह्यात वाढले 51393 नवीन मतदार-जिल्हाधिकारी विनय गौडा

15

 

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, मो. नं. ८६०५५९२८३०

चंद्रपूर, दि. 15 : मतदानाच्या हक्कापासून कोणीही वंचित राहू नये, मतदारांची नावे योग्यरीत्या मतदार यादीत समाविष्ट व्हावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच याबाबत जनजागृती सुद्धा करण्यात आली. त्याची फलश्रुती म्हणून जिल्ह्यात 51393 नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिली
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वीप अंतर्गत विविध उपक्रम सुरू केले आहेत. यात युवा मतदारांमध्ये जनजागृती, प्रत्येक आठवड्यात स्पर्धा, लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षीस स्पर्धा, प्रभात फेरी, विविध रॅलींचे आयोजन तसेच शाळा – महाविद्यालयामध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहे.
*जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या* : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ असून यात 70- राजुरा, 71 –चंद्रपूर, 72 –बल्लारपूर, 73 –ब्रह्मपुरी, 74 -चिमूर आणि 75 वरोरा या मतदारसंघाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 18 लक्ष 43 हजार 540 मतदार असून यात पुरुष मतदार 9 लक्ष 36 हजार 418, स्त्री मतदार 9 लक्ष 7 हजार 74, इतर मतदार 48 यांचा समावेश आहे. राजूरा विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 167427, स्त्री मतदार – 156780, एकूण – 324209), चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 188140, स्त्री मतदार – 184280, एकूण – 372455), बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 158071, स्त्री मतदार – 153017, एकूण – 311094), ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 137589, स्त्री मतदार – 137632 एकूण – 275221), चिमूर विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 140670, स्त्री मतदार – 138911, एकूण – 279581), आणि वरोरा विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 144521, स्त्री मतदार – 136454, एकूण – 280980)
*जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्र तसेच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची संख्या* : राजूरा विधानसभा मतदार केंद्रात 344 अधिक 1 मतदान केंद्र, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 390, बल्लारपूर 366, ब्रम्हपुरी 319, चिमूर 314 आणि वरोरा विधानसभा मतदारसंघात 343 असे एकूण संपूर्ण जिल्ह्यात 2076 अधिक 1 मतदान केंद्र आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण 4636 बॅलेट युनीट, 2620 कंट्रोल युनीट आणि 2787 व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत.
*नामनिर्देशन* : विधानसभा सार्वत्रिक निवडणूककरिता इच्छुक उमेदवारास नाम निर्देशन पत्र (नमुना ब) व त्यासोबत शपथपत्र (नमुना 26) परिपूर्ण भरून देणे अनिवार्य आहे. एका उमेदवारास जास्तीत जास्त चार नामनिर्देशन पत्र सादर करता येईल. तसेच उमेदवारास एका वेळेस जास्तीत जास्त दोन मतदारसंघातून निवडणूक लढवता येऊ शकेल. सर्वसाधारण उमेदवारास नामनिर्देशन पत्रासोबत 10 हजार रुपये रोख आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारास 5 हजार रुपये रोख जमा करणे बंधनकारक आहे.
*उमेदवारास खर्चाची मर्यादा* : उमेदवारास निवडणूक कालावधीत जास्तीत जास्त 40 लक्ष रुपये खर्चाची मर्यादा राखणे बंधनकारक आहे. निवडणूक कालावधीत दैनंदिन झालेल्या खर्चाचा हिशोब दररोज देणे आवश्यक असून निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत संपूर्ण खर्चाचा हिशोब शपथपत्रासह सादर करणे बंधनकारक आहे.
*जिल्ह्यात विविध कक्ष कार्यान्वित* : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर तसेच सर्व विधानसभा मतदारसंघ स्तरावर तक्रार निवारण /मतदार मदत केंद्र, एक खिडकी कक्ष, नियंत्रण कक्ष, आदर्श आचारसंहिता कक्ष तसेच मतदार हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आले आहे.
*सी-व्हीजीलचा उपयोग करण्याचे आवाहन* : निवडणूक प्रक्रियादरम्यान आचारसंहिता उल्लंघन संबंधाने कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवायची झाल्यास त्याकरिता नागरिकास सी-व्हीजील या ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदविता येऊ शकेल. अशा तक्रारी प्राप्त झाल्यापासून 100 मिनिटांच्या आत निकाली काढण्यात येईल. तसेच चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत विविध पथकांकडून /यंत्रणांकडून जप्त करण्यात येणाऱ्या अवैध रोख रक्कम, मद्य, मादक पदार्थ, फ्रीबीज इत्यादीसाठी ऑनलाईन ई. एस. एम. एस. या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.