भाजपच्या आरोपी आमदाराचा हॉस्पिटलमध्ये बसून निवडणुकीचा प्रचार-८ महिन्यानंतरही ४ आरोपींसह आमदाराचा आरोपी मुलगा फरारच

34

 

 

जगदीश का. काशिकर, (विशेष प्रतिनिधी मो. ९७६८४२५७५७)

 

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे भायखळा विधानसभा तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यानंतर आमदार बाबा सिद्धीकी यांची नुकतीच निर्घृणरित्या हत्या करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचा जणू बिहार झालेला आहे. एकीकडे मारेकऱ्यांना पकडण्याच्या वल्गना सरकार करीत आहे, मात्र दुसरीकडे पोलीस स्टेशनमधील सिनिअर पीआयच्या कॅबिनमध्ये अंधाधुंद फायरिंग करणारा भाजपचा आमदार मात्र सध्या जेजे हॉस्पिटलमध्ये बसून निवडणुकीची तयारी करत आहे, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (एसआयटी) हाती आलेली आहे.*

महाराष्ट्रातील कल्याण (पूर्व) येथील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याणचे  शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्थानकातच गोळीबार केला. ही घटना २ जानेवारी २०२४ रोजी झाली. आजमितीला या घटनेला आठ महिने उलटून गेले आहे. तरीही या प्रकरणातील ४ आरोपी अद्यापही फरारच आहेत. विशेष म्हणजे या आरोपींमध्ये गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याचाही समावेश आहे.

याप्रकरणी गायकवाड हे तळोजा येथील तुरुंगात होते. मागील आठवड्यात त्यांनी आजारी असल्याचा बहाणा केला, व ठरल्याप्रमाणे त्यांना जेजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. या हॉस्पिटलमध्ये बसून गायकवाड हे निवडणुकीची तयारी करत आहे. त्यासाठी त्यांना सर्वप्रकारच्या सुविधा पुरविल्या जात आहे, अशी खात्रीलायक माहितीही ‘स्प्राऊट्स’च्या सूत्रांच्या हाती आलेली आहे.

गायकवाड यांना मणक्याचा त्रास आहे, मात्र त्यासाठी जेलमध्ये उपचाराची सुविधाही आहे. असे असतानाही गंभीर आजाराचे निमित्त करून गायकवाड हे हॉस्पिटलमध्ये पंचतारांकित सुविधांचा लाभ घेत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आमदाराच्या पत्नीला (सुलभा गायकवाड) भाजप पक्षाकडून तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे, त्यासाठी या हॉस्पिटलमध्ये बसून गायकवाड प्रचार करीत आहे. दररोज कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

पोलिसांनी वेळीस हस्तक्षेप केला नसता तर महेश गायवाड व त्यांचे सहकारी राहुल पाटील यांची हत्या झाली असती. (वास्तविक ही घटना पोलीस स्थानकातच घडलेली आहे, तरीही पोलिसांनी ३५३ कलम – सरकारी कामात अडथळा अद्याप लावले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.) गायकवाड यांच्यावर यापूर्वीही असंख्य गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे, त्यामुळे त्याच्याकडून खुनासारखे कृत्य घडण्याची शक्यता आहे.

*भाजपची प्रतिमा डागाळली*

गणपत गायकवाड यांची बॅकग्राऊंड गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्यांच्यावर यापूर्वीही विविध पोलीस स्थानकात गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे भाजपची स्थानिक पातळीवर प्रतिमा डागाळत आहे, याची दखल घेऊन त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही युवा सेनेचे दीपेश म्हात्रे व इतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली होती, मात्र त्याची दखल अद्यापही घेतलेली नाही.

सहकार्य:*उन्मेष गुजराथी*
*स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी*