✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)
मो:-8308862587
सेनगाव(दि.23ऑगस्ट):-हिंगोली जिल्ह्यातील मुग काढण्यास येऊन पंधरवडा उलटला आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे मूग काढता आला नाही. काढणी झालेल्या शेकडो हेक्टरवरील मुगांना पावसामुळे झाडावरच मोड फुटले आहेत. मोड फुटून नासधूस झालेल्या मुगाची कवडीमोल भावात विक्री होत असल्यामुळे शेतकरी बांधवांना अतोनात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सोबतच उडीद, सोयाबीन,कापूस व तूर पिकाचेही नुकसान होत आहे.
यासंदर्भात शेतकरी बांधवांना तात्काळ नुकसान भरपाई मिळण्यात यावी यासाठी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देण्यात येणार आहे. काल हिंगोली लोकसभेचे खासदार श्री हेमंत पाटील यांनी औंढा नागनाथ येथे शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापारांची भेट घेऊन मोड आलेल्या मुगाची पाहणी केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख जी.डि.मुळे, औंढा तालुका प्रमुख साहेबराव देशमुख, शहर प्रमुख अनिल देव, अनिल देशमुख, श्रीराम राठी, द्वारकादास सारडा, महेश खुळखुळे, प्रमोद देव, सचिन बिहाळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व इतर नागरिक उपस्थित होते.