✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006
गेल्या साठ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी तळ ठोकून आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांना रद्द करा अशी मागणी घेवून हे आंदोलन चालू आहे. पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश या राज्यातील हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत. केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात शेतकरी ताकदीने एकवटले आहेत. सरकारने या आंदोलक शेतक-यांना देशद्रोही, खलिस्तानी ठरवण्याचे कारस्थान चालवले आहे. सगळा देश या आंदोलनाच्या निमित्ताने अस्वस्थ आहे पण महाराष्ट्रात ज्या पध्दतीने केंद्र सरकारच्या या नालायकीविरूध्द असंतोष निर्माण व्हायला हवा होता तसा तो झालेला नाही. केंद्र सरकारने आणलेले कायदे शेतक-यांपेक्षा अदानी-अंबानीच्या जास्त हिताचे आहेत. त्यांचेच हित डोळ्यासमोर ठेवून हे कायदे केलेत हे लक्षात आल्याशिवाय रहात नाही.
सरकारच्या या मस्तवालपणाविरूध्द, हुकूमशाही प्रवृत्तीविरूध्द पंजाबी, हरियानवी शेतक-यांनी शड्डू ठोकून आव्हान दिले आहे. गेल्या सहा वर्षात सर्वांनाच भारी ठरलेल्या मोदी आणि त्यांच्या कारस्थानी टिमला पहिल्यांदाच कुणीतर इतके कडवे आव्हान दिले आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र थंड आहे. महाराष्ट्रातला शेतकरी आणि शेतक-यांची चळवळ निपचित पडल्यासारखी वाटते आहे. माजी खासदार राजू शेट्टी, मंत्री बच्चू कडू, बाबा आढाव यांच्या टिमने अंबानीच्या घरावर काढेला मोर्चा, सर्वपक्षिय मोर्चा तसेच मंत्री बच्चू कडूंनी दोन चाकीवरून काढलेली दिल्ली रँली, या प्रतिक्रीया वगळता शेतकरी आंदोलनाची तीव्रता महराष्ट्रात दिसली नाही. महाराष्ट्र खवळलेला व पेटलेला दिसला नाही. महाराष्ट्र राज्याला चळवळीचा आणि क्रांतीचा धगधगता वारसा आहे. आचार्य अत्रे नेहमी म्हणायचे की, या देशात सगळ्या राज्यांना भुगोल आहे पण महाराष्ट्र व पंजाब अशी दोनच राज्ये आहेत की ज्यांना इतिहास आणि भूगोलही आहे. देशाचा इतिहास पाहता आचार्य अत्रेंची ही वाक्ये सत्य असल्याचे लक्षात येते.
आज घडीला महाराष्ट्र आपला गौरवशाली इतिहास विसरला की काय ? महाराष्ट्र आपला लढाऊ बाणा विसरला की काय ? स्वत:चा स्वाभिमान व आत्मसन्मान जपणा-या महाराष्ट्राला लाचारीचा रोग जडलाय की काय ? असे प्रश्न पडावे इतपत वाईट स्थिती आहे. आज आम्ही कर्तबगारीच्या बाबतीत भणंग झालोय. केवळ पुर्वजांच्या इतिहासात रमतण्यात आमचा जास्त वेळ जातो. आपले वारसदार आभाळाच्या उंचीचे होते, पराक्रमी, शूर-वीर होते पण आपण खुरटे, नपुंसक, लाचार व निष्क्रीय होत चाललोय त्याचे काय ? तसे नसते तर दिल्लीतल्या झुंडशाहीविरूध्द महाराष्ट्र पेटून उठला असता. दिल्लीश्वरांना ईव्हीएमच्या जोरावर चढलेली मस्ती महाराष्ट्राने उतरवली असती. पण महाराष्ट्र का थंड पडलाय ? मराठी मुलूखातले अनेक नेते सत्तेसाठी स्वत:चा विवेक का हरवून बसले आहेत ? स्वराज्याची वाट सोडून मनसबदारी आणि शिपाईगिरीत का रमले आहेत ?
महाराष्ट्रातल्या बहूतेक सगळ्या चळवळी विस्कटल्या आहेत, नेस्तनाबूत झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनात स्वत्वाची रग व धग जीवंत राहिलेली दिसत नाही. राजकारणात पक्षीय आणि नेते केंद्रीत लाचारी जाम वाढली आहे. पुरोगामी म्हणवणा-या महाराष्ट्रात जात व जमातवादाचे विष गतीने फोफावताना दिसते आहे. बाकी चळवळींचा आत्मा केव्हाच हरवला आहे. शेतकरी चळवळीची थोडीफार वळवळ होती पण अलिकडे शेतकरी चळवळ गतप्राण झाली की काय ? असा प्रश्न पडावा इतपत वाईट अवस्था झाली आहे. शेतकरी चळवळीतल्या नेत्यांना शेतक-यांच्या प्रश्नापेक्षा सत्तेची गोरीगोमटी मांडी जास्त प्रिय वाटू लागली आहे. सत्तेतले पक्ष या नेत्यांना मांडी दाखवतात आणि कायमचे बाद करतात.
सदाशिव खोत याच मांडीच्या नादाने बरबाद झाले. खोत शेतक-यांचे खुप लाडके होते पण आज तेच खोत बाप असलेल्या शेतक-यांना खलिस्तानवादी म्हणतायत. आमदारकीच्या बिस्कुटासाठी खाल्ल्या ताटात हागण्याचा नादानपणा त्यांनी चालवला आहे. राज्यमंत्री पद मिळाले आणि गड्याची भाषाच बदलली. सत्तेच्या मांडीला भुलून बापाला बाप म्हणायची अक्कल उरत नसेल तर या प्रवृत्तींना काय म्हणावे ? राज्यातले बहूतेक शेतकरी नेते निस्तेज झाले आहेत. सत्तेच्या प्रभावाने व अभिलाषेने त्यांचे आवाज दबले आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांचीही अवस्था वाईट झाली आहे. प्रारंभी ते ही कमळाबाईच्या नादी लागले होते.
त्यानंतर राष्ट्रवादीच्या नादाला लागून जयंत पाटलांसोबत सायकलसफारी करत बारामतीकरांशी घरोबा जुळवला. यात राजू शेट्टींच्या चळवळीची विश्वासाहर्ता कमी झाली आहे. कमळाबाईने शेट्टींना डोळे मारले, त्यांच्याशी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या आणि सदाशिव खोतांसोबत “लिव्ह इन रिलेशीनशीप” मध्ये राहिली. यामुळे शेट्टी व खोतांच्यात जुंपली नसती तर नवलच. कमळीच्या नादात सदाशिव खोतांचा देवदास आणि राजू शेट्टींचा बाजीगर झालाय. आता बच्चू कडूंचे काय होणार ? हा ही प्रश्न लोकांना पडला आहे. कारण हे प्रस्थापित पक्ष आणि नेते अशा लढाऊ नेत्यांना जवळ घेवून बाद करतात. सत्तेत भागिदार करून घेतात पण त्यांना देत काहिच नाहीत. “राजा उदार झाला आणि ओसाड माळ दान दिला !” अशी प्रवृत्ती आहे प्रस्थापित लोकांची. त्यामुळे चळवळीतल्या नेत्यांची ताकद खच्ची होते. एकदा त्यांनी तडजोड केली की त्यांच्या लढाईत त्राण उरत नाही. सदाशिव खोत, राजू शेट्टी व महादेव जानकरांचे तेच झाले आहे. फडणवीसांनी या गड्यांना बरोबर घेवून बाद केले.
आता जनमाणसात मोठा प्रभाव असणारे बच्चू कडू महा आघाडी सरकारने सत्तेत घेतलेत. प्रस्थापित पक्ष व नेत्यांचे कारस्थानी मेंदू बच्चू कडूंचे काय करतात ? हे येणारा काळच सांगेल. तुर्तास विरोधी पक्षात असताना शेतकरी प्रश्नावर कडाडणारी बच्चू कडूंची बुलंद तोफ विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना तेवढी प्रभावी वाटत नाही. चळवळीतील नेत्यांच्या सत्तासंधीत शेतकरी चळवळ विखुरलीय आणि कमजोर झालीय याची खंत वाटते. बेजबाबदार जनताही या नेत्यांना पुर्ण ताकद देत नाही. चिमुटभर ताकद देणार आणि डोंगरभर अपेक्षा ठेवणार अशी या नेत्यांची स्थिती आहे.