?राष्ट्रीय बंजारा विकास मिशन व स्वप्नपूर्ती फाउंडेशनची मागणी
✒️औरंगाबाद(पुरोगामी संदेशनेटवर्क)
औरंगाबाद(दि.13एप्रिल):-येथे बँकेच्या परीक्षेसाठी आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील हरीचा तांडा येथील दिव्यांग उच्चशिक्षित परीक्षार्थी विकास चव्हाण ची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. सदर प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करून सर्वच्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा राष्ट्रीय बंजारा विकास मिशन व स्वप्नपूर्ती फाउंडेशन ,औरंगाबाद राज्यभर आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रीय बंजारा विकास मिशन व स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे वतीने
जिल्हा अधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालय येथे सादर केलेल्या निवेदनांतून दिला आहे.औरंगाबाद येथील महानगर पालिकेनजीक असलेल्या चिताखाना कब्रस्थानात या परीक्षार्थीचा उजवा हात कापलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.
विकास देवीचंद चव्हाण हा गोर बंजारा समाजातील अत्यंत गरीब ऊस तोड कामगार असलेल्या कुटुंबातील दिव्यांग उच्चशिक्षित विद्यार्थी होता.पाथर्डी तालुक्यातील हरिचा तांडा येथे ऊसतोड कामगारांची वस्ती आहे. या वस्तीवरील दिव्यांग उच्चशिक्षीत विद्यार्थी म्हणून विकासची ओळख होती. त्याचे वडील देवीचंद आणि थोरला भाऊ मच्छिंद्र हे दोघेही ऊसतोड कामगार आहेत. त्याची आई गेल्या पंधरा वर्षांपासून अंथरुणावर आहे. अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना विकासने त्याचे एम.ए(इतिहास) पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले होते. सध्या तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. मध्यतंरी रिझर्व बँक आॅफ इंडियाने जाहिरात प्रकाशित केली होती. विकासने देखील परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यात औरंगाबादेतील चिकलठाणा परिसरातील एका केंदावर त्याची शुक्रवारी परीक्षा होती. त्यासाठी विकास गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पाथर्डीहून एसटीने औरंगाबादच्या दिशेने निघाला होता.
रात्री साडेदहाच्या सुमारास विकास मध्यवर्ती बसस्थानकावर पोहोचला. औरंगाबादला कोणीही नातेवाईक नसल्याने तो बसस्थानकावरच मुक्काम करण्याचे त्याने ठरवले होते. त्यामुळे तो बसस्थानकावरच थांबलेला होता. मात्र, पहाटे अचानक तो बसस्थानकातून गायब झाला. शेवटी सकाळी कब्रस्थानाजवळ त्याचा मृतदेह आढळला महापालिकानजीक असलेल्या चिताखाना कब्रस्थानात सफाईसाठी आलेल्या एकाला सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास विकासचा हात तुटलेल्या व रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह दिसून आला.
या भयानक घटनेमुळे समाजात हळ हळ व्यक्त केली जात आसून मा. साहेबांना विनंती करण्यात येत आहे की निष्पाप विद्यार्थ्याच्या खूण प्रकरणात सामील असलेल्या सर्व मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, मृत विकासच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करून त्याच्या कुटूंबाला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा राष्ट्रीय बंजारा विकास मिशन राज्यभर, व स्वप्नपूर्ती फाउंडेशन औरंगाबाद, आंदोलन छेडेल, याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.निवेदन सादर करताना भारती राठोड, सविता चव्हाण, ललिता राठोड, वर्षा कुरुडे, सपना वानखेडे, शितल मोरे उपस्थित होते.