[आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन]
१२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून पाळला जातो. इ.स.१८५४साली क्रिमियन युद्ध झाले होते. त्यातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका – नर्स फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. त्यांना आधुनिक शुश्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते. जगप्रसिद्ध परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांची आज २०१वी जयंती आहे आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये परिचारिकांचे योगदान बघता आजचा दिवस हा सर्व परिचारिकांसाठी खूप अभिमानाचा आहे. सर्व परिचारिकांना कोरोनाबरोबर लढण्यासाठी एक युद्धच उभे राहिले व ते आपल्या सिस्टर्स खूप उत्तमरित्या पार पाडत आहेत, विजयी ठरत आहेत. त्यामुळे सन २०२१ हे वर्ष त्यांना सेवाभाव समर्पित करण्यास योग्यच आहे. घरापासून दूर राहून या कोरोनायोद्धा खूप जीवानिशी हे युद्ध लढत आहेत. आश्चर्यास्पद आहे कि काही नर्सेस भगिनी आपल्या चिमुकल्यांना घरीच सोडून प्राणांतक युद्धात उतरल्या आहेत. अंतःकरणातून सॅल्यूट आहे या सर्व आपल्या कोरोना योद्धांना!
रुग्णांची सेवा कोण करतंय? असा प्रश्न केल्यानंतर डॉक्टरआधी नाव येईल ते परिचारिकेचे! रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे काम या भगिनी करतात. त्यांना तमा नसते वेळेची, त्यांना पर्वा नसते स्वतःच्या सुख-दुःखाची! वैयक्तिक हाल-अपेष्टांकडे दुर्लक्ष करत अहोरात्र त्या रुग्णसेवेत गुंतलेल्या असतात. स्वतःच्या आयुष्यातील काळोख विसरून रुग्णांच्या जीवनात आनंदाचे दीप प्रज्वलित करण्याचा त्यांचा ध्यास सुरु असतो. तो ध्यास दि.१२ मे १८२० रोजी उच्चकुलीन व श्रीमंत इंग्रज – ब्रिटीश घराण्यात जन्म झालेल्या फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्यामुळे. १८व्या शतकात परिचारिका क्षेत्राला विशेष मानले गेले नाही. त्याही काळात फ्लॉरेन्स नाईटिंगेल सिस्टर या अतिशय धनवान व राजघराण्यातील असूनही त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन हे रुग्णसेवेसाठी समर्पित करणार आहे, असे जाहीर केले.
घरातून प्रचंड विरोध झाला. कठोर विरोध झुगारूनही इ.स.१८४४ साली त्यांनी रुग्णसेवेचा व समाजसेवेचा स्वतंत्र निर्णय घेतला. याच काळात त्यांनी नर्सिंग विषयाचे अधिकृत शिक्षणही पूर्ण केलेले होते. आयुष्यात प्रतिष्ठेच्या दृष्टीने अतिशय अडचणी असताना, परिस्थितीला संधी मानून त्याचे त्यांनी सोने केले. सन १८५४ रोजी झालेल्या क्रिमियन युद्धाच्या काळात फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांनी ३८ परिचारिकांना हाताशी घेऊन त्यांचे कर्तुत्व सिद्ध केले. प्रशिक्षित परीचारीकांच्या मदतीने त्यांनी जखमी सैनिकांवर उपचार करत मृत्त्यू दर झपाट्याने कमी केला होता. त्यावेळी जखमी सैनिकांची काळजी घेण्यासाठी त्या रात्री हातात कंदील घेऊन नाईट राउंड घेत असत. म्हणून त्यांना ‘लेडी विद लॅम्प’ असेही संबोधतात. त्यांनी सुरू केलेल्या नर्सिंग स्कूलमुळेच आज जगभरात परिचारिकांना महत्व प्राप्त झाले आहे. असेच खूप सारे संशोधन, लेखन व समाजसेवा करत दि.१३ ऑगस्ट १९१० रोजी वयाच्या ९०व्या वर्षी पृथ्वीवरील एक अनमोल-अमृततुल्य काम संपवून त्या अनंतात विलीन झाल्या. फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशानेच १२ मे हा ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो.
परिचारिका हा आरोग्य यंत्रणेतील मोठा समूह, मजबूत कणा समजला जातो. परंतु समाजात अजूनही एक प्रशिक्षित परिचारिका म्हणजे काय? हा अजूनही एक प्रश्नच आहे. तुमची शुश्रूषा करणारी परिचारिका ही राज्य परिचारिका परीषदेत नोंदणी केलेलीच असावी लागते. तीन महिन्याचा कोणताही अर्थहीन कोर्स करून स्वतःला नर्स म्हणवून घेणे, हे खूपच संतापजनक आहे. अशा खूप काही गोष्टी बदलत चालल्या आहेत. अजूनही आपल्या समाजात परिचारिका किंवा नर्स ही संज्ञा खूपच अस्पष्ट आहे. बदल्यात अाधुनिकीकरणामध्ये परिचारिका ही संज्ञा संपूर्णतः बदलली आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर डिप्लोमा पासून ते पी.एच.डी तेही पोस्ट फेलोशीपपर्यंत नर्सिंगचा अभ्यासक्रम जाऊन पोहचला आहे. नर्सिंग हे क्षेत्र मर्यादित न राहता बालरोग परिचारिका शास्त्र, स्त्रीरोग परिचारिका शास्त्र, मानसिक आरोग्य परिचारिका शास्त्र, वैद्य शल्य चिकीत्सा शास्त्र ज्यात प्रत्येक संस्थेसाठी विशेषीकरण उपलब्ध आहे, असे वेगवेगळे अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. नर्सिंग मधील डिप्लोमा कोर्स बंद होऊन आता त्या जागी चार वर्षाचा अभ्यासक्रम चालू होत आहे.
परिचारिका क्षेत्रातील उच्च व्यवस्थापन पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही लक्षकेंद्रित केले पाहिजे. खासगी रुग्णालयांमध्ये अजून किमान वेतन कायदा लागू नसल्याने तुटपुंज्या पगारात नर्सेसना काम करावे लागत आहे. नुकतेच सरकारने परीचारिकांसाठीही संरक्षण नियम अमलात आणल्याने थोडी सहानुभूती मिळाली आहे.करोनाच्या जीवघेण्या महामारीत इतर देशांच्या तुलनेने आपल्या देशातील आरोग्य सेवा इतकी काही बळकट नाही. तरीही डॉक्टरांबरोबर सेवाभावी भगिनींचे योगदान हे अनमोल आहेत. कोरोनाच्या थैमानात जीवाच्या भीतीने जनमानस सुन्न झाले आहे. लोक घरात स्वतःला कोंडून घेत आहेत. मात्र परिचारिका या रणरागिणी बनून रात्रंदिवस कोरानाग्रस्त रुग्णसेवेत तल्लीन आहेत. या योगदानाबद्दल समाज कधीही परिचारिकांना विसरणार नाही आणि त्यांचा समाजाला नेहमी आदरच राहील, हे नक्की!
!! या संवर्गातील भगिनींना पुरोगामी संदेश परिवारातर्फे जागतिक परिचारिका दिनी लवून मानाचा मुजरा !!
✒️संकलन व शब्दांकन:-श्री कृ. गो. निकोडे गुरूजी.
मु. पिसेवडधा, तह. आरमोरी. जि. गडचिरोली(७७७५०४१०८६).