आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे-जिल्हाधिकारी शेखर सिंह

    45
    Advertisements

    ✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मोबा.9075686100

    सातारा(दि.11मे):-जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी तिच्या व्यवस्थापनासाठी सर्वच यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवत सज्ज रहावे. तसेच संबंधित विभागानी आपत्ती नियंत्रण कक्ष 1 जून पासून कार्यान्वीत करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.
    नैसर्गिक आपत्ती बाबत मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डे बुजवून घ्यावे तसेच पावसाळ्यात दूषीत पाण्याचा पुरवठा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. प्रत्येक विभागाने नोडल ऑफीसरची नियुक्ती करुन त्यांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला द्यावी. ज्या गावांचा संपर्क पावसाळयात तुटतो अशा गावांसाठी पुरेशा जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा अधिच करावा. अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांकांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच अन्य यंत्रणांना द्यावीत, नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीतील नालासफाई, गटारी यांची साफसफाई करुन घ्यावी. आरोग्य विभागाने आवश्यक तो औषध साठा, रुग्णवाहिका यंत्रणा सज्ज ठेवावी त्याचबरोबर वीजवाहक तारांना अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात.

    नदी काटी अतिक्रमण केलेल्या कुटुंबाला मान्सूनपूर्वी नोटीस देवून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. तसेच तालुका व गावपातळीवर 20 मेपर्यंत मान्सूनपूर्वतयारीबाबत आढावा बैठक घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शेवटी केल्या.गावागावातील सर्व नाल्यांची साफसफाई करावी, पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्यांची दुरस्ती करावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी बैठकीत केल्या.