चुकीच्या मार्गदर्शनामुळे चुकीचे निर्णय होऊ शकतात- ज्ञानेश्वर मोगरकर

    47
    Advertisements

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    तुमसर(दि.22मे):-आजच्या कोरोना काळात बोर्डांच्या परीक्षांचे वेळापत्रक खोळंबलेले असले तरी दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांनी सतत अभ्यासात मग्न राहणे अत्यंत गरजेचे असून योग्य दृष्टिकोन ठेवून चांगल्या प्रकारे परीक्षा पास केल्या तर भविष्यात त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना हा सोयीस्कर होईल तसेच पुढील वर्षात विज्ञान, कला ,वाणिज्य , किमान कौशल्य तथा व्यवसाय हे सर्व क्षेत्र महत्त्वाचे असून त्या प्रकारे आपली मानसिकता तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तेव्हा योग्य मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन घ्यावे अन्यथा चुकीच्या मार्गदर्शनामुळे चुकीचे निर्णय होऊ शकतात. असे प्रतिपादन पुणे येथील मनपा शिक्षक श्री.ज्ञानेश्वर मोगरकर यांनी केले.

    स्थानिक न. प . नेहरू कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभागाने आयोजित दहावीनंतर पुढे काय??? तथा तयारी स्पर्धा परीक्षांची या मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत निव्वळ गुणांचा फुगवटा करण्यापेक्षा या वयोगटात स्वतःला पूर्ण तयारीनिशी पुढील अभ्यासक्रमासाठी मनाची तयारी करून ठेवावी जेणेकरून पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमात योग्य शाखा निवडणे सोपे होईल. तसेच या काळात विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त मनसोक्त खेळणे, मनोरंजन करणे तसेच एकमेकांशी सुसंवाद साधणे इत्यादी गोष्टींवर भर द्यावा. एवढेच नाही तर आपला शैक्षणिक ,भावनिक शारीरिक, मानसिक ,सामाजिक गोष्टींचा विकास कसा होईल याकडेही प्राधान्याने लक्ष द्यावे असेही श्री. ज्ञानेश्वर मोगरकर यांनी मत व्यक्त केले.

    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री. भारत थोटे प्रा. संजय लेनगुरे श्री. रमेश बोंद्रे यांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रा. संजय लेनगुरे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्याला लाभलेले मार्गदर्शक यांचे अनुकरण आत्मसात करावे तसेच जर समजा बोर्डाच्या परीक्षा होत असतील तर विद्यार्थ्यांनी गाफील राहू नये कारण बोर्डाच्या परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणे हे विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रम निवडण्याच्या दृष्टीने धोरणात्मक नाही.असे स्पष्ट केले.

    मार्गदर्शन कार्यक्रमाला विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कुणाल बांडेबुचे याने तर आभार कु. शुभांगी किरपाने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश बडवाईक, सुधीर चन्ने. विद्यार्थी- मंथन बडवाईक,गुलशन गोपाले, युगेश बारागौणे, विनय नागपुरे, सुरज कडू, सुहानी पवारे सुरभी बघेले, स्वेजल चौधरी, त्रिशा कांबळे, मानसी नागदेवे, हिमांशी साठवणे, भूमिका तुरकणे, शुभांगी पटले, महक बनसोड, निकिता नागफासे, शर्वरी गाळवे, श्रेया डोळस, ईशांत लांजेवार, दामिनी पटले वैशाली वाघमारे योगिता जिभकाटे यांनी अथक परिश्रम घेतले.