काँग्रेसची इंधन, महागाई विरोधात आंदोलनाची मालिका- शहर जिल्हा काँग्रेस कमिटी करणार विविध आंदोलने

    47
    Advertisements

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    चंद्रपूर(दि.7जुलै):- केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे. महागाईमुळे जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या जीवघेण्या महागाई विरोधात प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयाने विविध आंदोलने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध आंदोलने करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिली आहे.

    पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनात शुक्रवार ९ जुलैला सकाळी ११ वाजता शहर महिला काँग्रेसच्या वतीने महागाईविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. शनिवार १० जुलैला चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सायकल यात्रा काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.

    तसेच रविवार ११ जुलै ते १५ जुलै या कालावधीत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. युवक काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल, इंटक, सर्व डिपार्टमेन्ट व सेल यांच्या पुढाकारातून पेट्रोल पंप परिसरात ही मोहीम राबविली जाणार आहे. या सर्व कार्यक्रमांना काँग्रेसच्या सर्व फ्रंटल व\आर्गनायझेशनच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन केंद्र सरकारचा निषेध नोंदवावा, असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.