काँग्रेस पक्ष माथाडी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल !: नाना पटोले

    48
    Advertisements

    ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    मुंबई(दि.8जुलै):-केंद्रातील मोदी सरकारने नवीन कायदे करून शेतकरी, कष्टकरी, कामगारांना देशोधडीला लावण्याचे पाप केले असून कामगारांना भांडलदारांच्या दावणीला बांधण्याचे काम केले आहे. कामगार हा महत्वाचा घटक असून त्यांचा सन्मान झालाच पाहिजे. काँग्रेस पक्ष नेहमीच कष्टकरी, कामगार वर्गाच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे आणि भविष्यातही कामगारांच्या हितासाठी उभा राहिल अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.टिळक भवन येथे आज माथाडी कामगार नेते राजन म्हात्रे, छगन पाटील यांच्या नेतृत्वात असंख्य माथाडी कामगारांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, उपाध्यक्ष हुसेन दलवाई, उपाध्यक्ष भाई नगराळे, किसान काँग्रेसचे शाम पांडे, बद्रुद्दीन जमा, आदी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, कामगार, शेतकरी ही देशाची खरी ताकद आहे हे पंडित नेहरुंनी ओळखले होते. त्यांच्या ताकदीवरच स्वातंत्र्यानंतर देशाला एक सक्षम, बलशाली राष्ट्र म्हणून उभे केले. कामगारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाने अनेक कायदे केले आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. परंतु केंद्रातील भाजपा सरकारने या कामगारांच्या अस्तित्वावरच घाला घातला आहे. काँग्रेस पक्ष माथाडी कामगारांच्या अधिकारांसाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल, त्यांना न्याय देईल, आपले प्रश्न सरकार दरबारी मांडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन असा विश्वास पटोले यांनी यावेळी दिला आणि काँग्रेस प्रणित माथाडी कामगार संघटना सर्वात मोठी संघटना करा असे आवाहन केले.
    टिळक भवन येथील कार्यक्रमात लोकनेते नानाभाऊ पटोले सोशल फोरम काँग्रेस पक्षात समाविष्ठ करण्यात आला. कष्टकरी शेतकरी संघटना, श्रमीक मुक्ती आंदोलन व महाराष्ट्र आदिवासी मंचच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर भाजपाच्या भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रोहिदास दत्तु चव्हाण शिवसेना प्रणित न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.