?मांजरपाडा (देवसाने) धरणाचे काम पूर्ण; यंदा पूर्ण क्षमतेने पाणी डोंगरगाव पर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट – छगन भुजबळ
✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)
नाशिक(दि.१५जुलै):-मांजरपाडा (देवसाने) धरणाच्या भिंतीचे काम पूर्ण झाले असून येवला तालुक्यातील अनकुटे परिसरातील रेल्वे क्रॉसिंगचे व इतर सर्व प्रकल्पाची कामे महिनाभरात पूर्ण होऊन यंदा डोंगरगाव पर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी पोहचविण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज पुणेगाव- दरसवाडी- डोंगरगाव कालव्यावरील येवला तालुक्यातील अनकुटे शिवारात असलेल्या रेल्वे क्रॉसिंगच्या कामाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी,तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई,येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार,जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप,अरुण थोरात,मोहन शेलार,दीपक लोणारी,मकरंद सोनवणे,बाळासाहेब गुंड,नवनाथ काळे, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, ज्ञानेश्वर शेवाळे, साहेबराव आहेर, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मांजरपाडा देवसाने प्रकल्पाचे असलेले आव्हानात्मक असे काम लवकरच पूर्ण होत आहे. यामध्ये एक एक काम अतिशय कठीण काम होते. यासाठी सातत्याने पाठपुरावा करून काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रकल्पातील रेल्वे क्रॉसिंगचे काम गेल्या दोन वर्षांपासून हे काम प्रलंबित होते. रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून यासाठी परवानगी मिळविण्यात आली. आज या क्रॉसिंगचे काम सुरू असून क्रॉसिंगसह राहिलेली किरकोळ कामे या महिनाभरात पूर्ण होणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी या प्रकल्पाचे पाणी पूर्ण क्षमतेने डोंगरगाव पर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट असून तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ते म्हणाले की, मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असल्याने यंदाच्या वर्षी पूर्ण क्षमतेने पाणी येणार येवल्याच्या दिशेने येणार आहे. प्रकल्प नवीन असल्याने पहिल्या वर्षी अडचणी येतील मात्र त्या सोडविल्या जातील असे त्यांनी यावेळी उपस्थितांना आश्वस्त केले. तसेच लवकरच येवल्याच्या दिशेने पाणी आल्यानंतर पुन्हा एकदा या कामाची आपण लवकरच पाहणी करून जलपूजन करू असे त्यांनी यावेळी सांगितले.