गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आज जाणून घेऊ माझे मार्गदर्शक माननीय देवेंद्र भुजबळ यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास व संघर्षमय कहाणी……..
देवेंद्र भुजबळ सर हे मूळचे विदर्भातील अकोल्याचे.वडील हयात असताना चौथी पर्यंत शिक्षण अगदी व्यवस्थित झाले. पण……..पुढे लहान वयातच वडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे आर्थिक स्थिती बिघडली. सातवी पर्यंत शिक्षण कसेबसे पूर्ण झाले. पुढे अनेक अडचणीचा सामना करत दुहेरी कसरत करावी लागली. एकिकडे काम व दुसरीकडे शिक्षण त्यामुळे अभ्यासाला जास्त वेळ न मिळाल्याने शिवाय गणित,विज्ञान या विषयांची आवडही नसल्याने ते दहावी नापास झाले. ही गोष्ट त्यांच्या मनाला खूप लागली . त्यांनी अकोला सोडण्याचा निर्णय घेतला. पुण्यात वडीलबंधु होते म्हणून ते त्यांच्याकडे गेले.
डेक्कन जिमखान्याजवळ ‘ दर्शन फ्रुट ज्युस सेंटर ‘ येथे वेटरचे काम करून पैसे जमवून दहावीची परीक्षा दिली व पास ते झाले.पुढे त्यांनी अकरावीत भारती विद्यापिठात प्रवेश घेतला. शिक्षण व काम असा जीवनक्रम होता.मिळेल ती नोकरी करून अनेक नवीन गोष्टी शिकल्या पुढे बारावी व एफ.वाय. बी.कॉम.ची परीक्षा दिली.
पुढे त्यांचे भाऊ नरेंद्रजी यांची परिस्थिती चांगली होती त्यामुळे सरांना अहमदनगरला जाण्याची संधी मिळाली . तेथे त्यांनी एस.वाय. बी.कॉम.ला प्रवेश घेतला.अत्यंत स्वाभिमानी असल्याने भावाकडे पैसे मागायला त्यांना आवडत नव्हते त्यामुळे नोकरी करत शिक्षण पूर्ण करायचा निर्णय त्यांनी घेतला.प्रचंड इच्छा शक्ती,कष्ठाची तयारी,चिकाटी व जिद्द असल्याने यश मिळत गेले.त्यावेळी नगर जिल्ह्यातील मोठया आइस्क्रीम पार्लर चे मालक श्री.छगनशेठ बोगावत ह्यांच्याकडे अनेकांमधून त्यांची निवड झाली व पी.ए. ची नोकरी त्यांना मिळाली ज्यामुळे त्यांचे आयुष्य पूर्ण बदलून गेले.तेथील दै. समाचार मध्ये पत्रकार म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली.शिक्षण,पी. ए. ची नोकरी आणि उशिरा दै. समाचार मध्ये काम अशी तिहेरी भूमिका पार पाडत होते.
आईचे पदवीधर होण्याचे स्वप्न त्यांना पूर्ण करायचे होते. त्यामुळे, परीक्षेच्या एक महिना आधी असेल ती नोकरी सोडून महिनाभर अभ्यास करणे व पुन्हा मिळेल ती नोकरी करत होते.त्यांना त्यांचा भाऊ नरेंद्रजी व भावजय सौ.सुचित्रा ताई यांची मोलाची साथ लाभली.
अकरावी एका कॉलेजात,बारावी ,एफ वाय दुसऱ्या कॉलेजात तर एस वाय टी वाय तिसऱ्या कॉलेजात अशा रितीने ३ कॉलेज मध्ये शिकून ते पदवीधर झाले.
आई वडील खूप धार्मिक होते त्यांच्या घरी संत महंतांचे येणे जाणे होते.मात्र आयुष्यात लहान वयात अनेक मानसिक आघात झाल्यामुळे त्यांचा देवावरचा विश्वास उडाला व ते नास्तिक झाले.पुढे २५ व्या वर्षी सर्व स्थिरस्थावर झाल्यावर मनःशांती साठी प्रार्थना करू लागले.
बी.कॉम.ची पदवी मिळाल्यानंतर पत्रकारितेची आवड असल्याने त्याचे त्यांनी शिक्षण घेतले.त्या काळी
‘प्रा.ल.ना.गोखले ‘ या शिष्यवृत्ती साठी निवड होणारे ते पहिलेच विद्यार्थी होते.साप्ताहिक ‘ सह्याद्री ‘ चे ते विशेष प्रतिनिधी म्हणून काम करू लागले.सधन गाव असतानाही शनिशिंगणापूरमध्ये दारे – खिडक्या नाही यावर त्यांची ‘ कव्हर स्टोरी ‘ लोकप्रिय साप्ताहिक सह्याद्री मध्ये प्रसिद्ध झाली त्याची दखल मुंबई दूरदर्शन व दिल्लीच्या राष्ट्रीय वाहिनीने घेतली व त्यावर चित्रफीत तयार झाली.
दूरदर्शन मध्ये १९८६ साली नोकरीला लागल्यावर वर्षभरातच अलका ताई ज्या महानगर टेलिफोन निगम,मुंबईत नोकरीला होत्या त्यांच्याशी लग्न झाले.१९९१ साली त्यांची कन्या देवश्रीचा जन्म झाला .तिचा पायगुण खूप लाभदायक ठरला . आज देवश्री ‘ इंग्रजी पत्रकार ‘ म्हणून कार्यरत आहे जी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे.
पुढे भुजबळ सर मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिजम ही पदव्युत्तर पदवी फर्स्ट क्लास फर्स्ट ने पास झाले.पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून ते दूरदर्शन मध्ये परत आले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर माहितीपट निर्माण करण्याची संधी त्यांना मिळाली.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः कसे प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण घेतले व त्यावर समाधान न मानता समाजाला शिक्षित करण्याचे लाख मोलाचे कार्य केले हा पैलू भुजबळ सरांनी जगासमोर आणला व ‘ ज्ञानपुंज डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा माहितीपट तयार झाला देशभरातून व महाराष्ट्रातुनही दूरदर्शनला अनेक पत्र आली ज्यात भुजबळ सरांचे सर्वांनी खूप कौतुक केले त्यांच्या कष्टाची ती पोच पावती होती.त्यांच्या लक्षात आले की जितके पद मोठे तितकी काम करण्याची व आपली कल्पना राबवण्याची संधी अधिक असते.
पुढे खूप मेहनतीने,चिकाटीने स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास करून यशाचे गोड फळ त्यांना लाभले व १९९१ मध्ये वृत्तपत्र व संज्ञापन अधिव्याख्याता,शिवाजी विद्यापीठ,यूपीएससी मार्फत आकाशवाणी व दूरदर्शनचे ‘कार्यक्रम अधिकारी ‘ म्हणून तीन पदांसाठी तसेच भारतीय माहिती सेवेसाठी निवड झाली.तेथे रुजू होण्यापूर्वीच महाराष्ट्र शासनाच्या ‘ जिल्हा माहिती अधिकारी ‘ पदी निवड झाली. ती निवड स्वीकारून ते अलिबाग येथे सेवेत रुजू झाले .
सेवेत रुजू होण्यापूर्वी आईचे आशिर्वाद घेण्यासाठी ते अहमदनगरला गेले तेव्हा आई त्यांना म्हणाली ,’ बाळा,अधिकारी झालास तरी नम्रता सोडू नकोस,माणसाला माणसासारखी वागणूक दे.” ते शब्द सतत कानात आणि मनात ठेऊन त्यांनी तसे आचरण केले.
असे बाळकडू जर प्रत्येक आईने मुलाला दिले तर नक्कीच जगाचे चित्र वेगळे असेल असे मला वाटते.त्या माऊलीचे शब्द भुजबळ सरांनी आजही जपले आहे त्यामुळेच ते जीवनात यशस्वी होऊ शकले व समाजात त्यांना मनाचे स्थान प्राप्त झाले.
जिल्हा माहिती अधिकारी म्हणून दिड वर्षानंतर मुंबईत १९९२-१९९३ च्या दंगलीनंतर त्यांना मननीय मुख्यमंत्री यांच्या दूरदर्शन कव्हरेजची जबाबदारी सोपविण्यात आली. पुढे त्यांची मंत्रालयात वरिष्ठ सहाय्यक संचालक या पदावर बदली झाली.
दूरदर्शनच्या पूर्वानुभवामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या ‘ शिवशाही आपल्या दारी ‘ ,’ माय मराठी ‘ , या मालिकांची निर्मिती – समन्वयाची संधी मिळाली.पुढे पदोन्नती होऊन अनेक ठिकाणी उपसंचालक पदावर कोकण,नाशिक मध्ये बदली झाली व माहिती संचालक म्हणून २०१५ साली पदोन्नती होऊन मंत्रालयात नेमणूक झाली. पुढे २०१८ साली ते निवृत्त झाले.
या सेवाकाळात विविध ठिकाणी भाषण देणे,लेख लिहिणे, आकाशवाणी,दूरदर्शन कार्यक्रमांची निर्मिती करून समाजाच्या विकासासाठी योगदान देण्याचे प्रयत्न ते सतत करत राहिले.
भुजबळ सरांना अनेक मानसन्मान व विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यांची अनेक प्रेरणादायी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. जसे की ‘ भावलेली व्यक्तिमत्वे ‘ विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या प्रेरक कथांवर आधारित ‘ गगनभरारी , ‘ सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता ‘ विविध तरुणांच्या,पुरुषांच्या प्रेरक कथा असलेले ‘ प्रेरणेचे प्रवासी ‘ ही त्यांची अतिशय वाचनीय व सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी पुस्तक आहेत ज्यामुळे जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच आशादायी असेल.
भुजबळ सर एक सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व आहेत.ते एवढे प्रसिद्ध व प्रतिष्ठित असून अतिशय नम्र व सर्वांना सहकार्य करून त्यांच्या कलागुणांना वाव देतात.सतत कामात व्यस्त असणारे भुजबळ सर रिटायर झाले तरी स्वतःच्या वेबपोर्टलसाठी ह्या वयातही दिवसांतून १० ते १२ तास काम करतात व अलका ताई ह्या देखील सह संपादकाचे काम करतात.हे वेब पोर्टल आज देश विदेशात लोकप्रिय आहे कारण त्यातील विविधता.
देवेंद्रजी भुजबळ सरांचा हा अतिशय खडतर जीवन प्रवास वाचल्यावर हे लक्षात येते की त्यांनी बिकट परिस्थितीचा सामना धीराने, धैर्याने व निर्भीडपणे केला त्यामुळेच ते यशाचे शिखर गाठू शकले.त्यांच्या स्वभावातील चिकाटी,कष्टाळु वृत्ती,जिद्ध,धाडस व स्वाभिमान याचे दर्शन घडवते.त्यांच्यातील नम्रपणा, माणुसकी व सर्वांना मदत करण्याची प्रामाणिक भावना असल्याने ते आज ही सर्वांशी जोडून आहेत.त्यांच्या कार्याला सलाम.
मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते की असे गुरू मला लाभले.त्यांना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करते.??
आपणांपैकी कुणालाही काही मार्गदर्शन हवे असल्यास त्यांचा मोबाईल क्रमांक आहे: 9869484800.
✒️लेखन : रश्मी हेडे