?पावसाळा?

    106
    Advertisements

    ‘येरे येरे पावसा तुला देतो पैसा
    पैसा झाला खोटा पाऊस आला
    मोठा’
    मे महिन्याचा उन्हाचा ताप कधी संपतो, नि गारगार करणारा पावसाळा कधी सुरू होतो याची सर्वजण वाट पाहत असतात. उन्हाने हैराण झालेले पशु,पक्षी,माणसे,मुले, पावसाने तृप्त होतात. म्हणून मुलेही पावसात आनंदाने नाचू लागतात.शाळेची सुरुवात, नवा वर्ग, नवे मित्र यांचे स्वागतदेखील पावसाच्या सुखद शिडकाव्यांनीच होते.अचानक एके दिवशी पावसाचे थेंब टपकू लागतात आणि सर्वांच्या तोंडून आनंदोद्गगार बाहेर पडतात आला, पाऊस आला! आणि या पावसाचे स्वागत करण्यासाठी लहानथोर सर्वच जण या पावसात चिंब भिजतात.जणू काही वर्षाराणीचे आगमन म्हणजे सुखाची पर्वणीच असते. ओकेबोके डोंगरही हिरवा साज चढवितात. रस्त्यावर निरनिराळ्या छत्र्यांची गर्दी दिसू लागते.शेती खूप महिन्यांनी तहान भागवीत तृप्त होतात.
    खूप पाऊस आला की शाळेला सुट्टी असते.आई गरमगरम वडे तळते. सर्व रस्ते,मैदाने,पाण्याने भरून जातात.नद्यानाले तुडुंब भरून वाहू लागतात.अंगणातील तळ्यात मुले कागदी नावा सोडतात, बेडूक डराव, डराव करतात.
    पावसाळ्यात मातीचा सुगंध मनाला मोहवतो.झाडांची पाने टवटवीत दिसू लागतात. सारे वातावरण ताजे टवटवीत होते.सर्व तरुण मुले धबधब्यांच्या खाली मनसोक्त डुंबून घेतात. सहलींना उधाण येते. आकाशात विजांचा कडकडात झाला की लहान बाळे आईला पकडून बसतात. पावसाळ्यात मैदाने हिरवेगार शालींचे पांघरूण घेतल्या प्रमाणे दिसतात.जसे काही नववधू आपल्या हरितशालूने सजली आहे. आणि नवा साज पांघरून बसली आहे.
    श्रावणात तरी ऊनपाऊस लपंडाव खेळत असतात. ‘आला पाऊस गेला पाऊस मुले लागली नाचू’.पावसाळ्यात सर्वजण रेनकोट, छत्र्या, गमबूट या वेशात निराळेच दिसतात.पाऊस गरीब श्रीमंतांना सारखाच आनंद देतो. शेतकरी, कामकरी यांना तो वरदानच वाटतो.

    सौ.भारती सावंत
    मुंबई
    मो:-9653445835

    निसर्ग कविता

     

    निळंशार आभाळ हे
    माझ्या दारात फाटलं
    लेक निघाली सासरी
    आसू नयनात दाटलं

    श्रावणाच्या चिंबसरी
    ओघळती पागोळ्या
    रंगसांगातीनं न्हाल्या
    अंगणातील रांगोळ्या

    करूनि मुक्त बरसात
    पडलेय लख्ख ऊन
    श्रावणसरींना झेलून
    धूके पसार ते पिऊन

    काळ्या मेघांनी साऱ्या
    केली आकाशात दाटी
    सौदामिनी कडाडली
    पाखरे शहारली घरटी

    काळ्या मेघांच्या रेघा
    ओघळल्यात धरेवरी
    पाखरेही झाली चिंब
    पंखांची फडफड करी

    पावसाची ओली गाणी
    ओठी पाखरांच्या आली
    वृक्षलतिका आणि वेली
    भिजूनिया चिंब झाली

    सौ.भारती सावंत
    मुंबई
    9653445835