गृहपाठ म्हणजे घरचा अभ्यास. वर्गात शिकवलेल्या गोष्टींची घरी जाऊन केलेली उजळणी. आपल्यापैकी प्रत्येकानेच शाळेत असताना गृहपाठ केलेला असतो. कितीतरी वेळा मनात नसताना शिक्षकांच्या धाकापायी आपल्याला हा अभ्यास करावा लागे मात्र आता हे चित्र बदलू शकते कारण आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गाचा गृहपाठ अर्थात घरचा अभ्यास बंद करण्याचा विचार असल्याची माहिती महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. शिक्षण मंत्र्यांच्या या घोषणेनंतर शिक्षक, पालक आणि शिक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. पहिली ते चौथीच्या वर्गाचा गृहपाठ बंद करावा की करू नये याबाबत राज्यभर विविध मतप्रवाह आहेत. मुलांवर अभ्यासाचे ओझे लादू नये. अभ्यासाच्या ओझ्यामुळे मुले दबू नयेत हे मान्यच मात्र त्यासाठी गृहपाठच बंद करणे हे योग्य नाही. गृहपाठ हा बोझा नसून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील महत्वाचा भाग आहे.
गृहपाठ बंदीचा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने योग्य नाही. विद्यार्थ्यांना गृहपाठ हवाच. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम योग्य पध्दतीने शिकवण्याचा शिक्षकांचा प्रयत्न असतो पण त्याचे कितपत आकलन झाले याचे मोजमाप गृहपाठाद्वारेच होते. गृहपाठ जर बंद केला तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. शहरी भागातील विद्यार्थी शाळा सुटल्यावर ट्युशनला जातात तिथे त्यांची उजळणी घेतली जाते तिथे हा निर्णय योग्य ठरू शकतो मात्र ग्रामीम आणि दुर्गम भागात जिथे पालक निरक्षर असतात तिथे गृहपाठ दिला नाही तर मुले अभ्यासाकडे डुंकूनही पाहणार नाही त्यामुळे शिकवलेल्या घटकांची उजळणी होणार नाही. ग्रामीण भागातील पालकांचा तर विद्यार्थ्यांना गृहपाठ द्या असा आग्रहच असतो. विद्यार्थीही घरचा अभ्यास द्या असे शिक्षकांना म्हणतात आणि तो आवडीने पूर्ण करतात. दुसऱ्या दिवशी आपण केलेला गृहपाठ बरोबर आहे का नाही हे जाणून घेण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांना असते.
शिक्षक गृहपाठ तपासून विद्यार्थ्यांना शाबासकी देतात तेंव्हा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद अवर्णनीय असतो. शिक्षकांनी दिलेला गृहपाठ विद्यार्थ्यांनी पूर्ण केला तर शिक्षकांना दुसऱ्या दिवशी शिकवणे सुलभ जाते. गृहपाठ दिल्यामुळे विद्यार्थी घरी अभ्यास तरी करतात सरसकट गृहपाठ बंद केला तर विद्यार्थ्यांचा अभ्यासच थांबेल. गृहपाठ नसल्याने मिळणाऱ्या वेळेचा विद्यार्थी सदुपयोगच करतील असेही नाही. गृहपाठ बंद झाल्याने मिळालेला वेळ विद्यार्थ्यांनी टीव्ही पाहण्यात किंवा मोबाईलवर गेम खेळण्यात वाया घातला तर त्याचा दुष्परिणामच होईल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आणि शैक्षणिक विकासासाठी गृहपाठ हवाच त्यामुळे गृहपाठ बंद करण्याचा निर्णय सरकारने घेऊ नये. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने घातक ठरेल.
✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५