चीनचा मानवतेवर हल्ला!

    64
    Advertisements

    संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार उच्चायुक्ताच्या आयोगाने नुकताच एक अहवाल जाहीर केला आहे. ४५ पानांच्या या अहवालाचे शिर्षकच मानवतेवरचा हल्ला असे आहे. चीन मधील उयीघर या प्रातांत असणाऱ्या मुस्लिम नागरिकांवर चिनी नागरिक आणि तेथील सरकार कशा प्रकारे अत्याचार करीत आहे याचे पुरावेच या अहवालात देण्यात आले आहेत. ४५ पानांच्या या अहवालात डझनभर उयीघर मुस्लिमांच्या मुलाखती आहेत. या मुलाखतीत मुस्लिमांनी कथन केलेली आपबिती मनाचा थरकाप उडवणाऱ्या आहेत. या अहवालात चीनमध्ये मुस्लिम बांधवांचे कशाप्रकारचे शोषण केले जाते ते सविस्तरपणे मांडले आहे. या मुलाखतीत पीडित मुस्लिम बांधवांनी सांगितले आहे की त्यांना खुर्चीला बांधून काठ्यांनी मारहाण केली जाते. झोप आणि जेवणापासून त्यांना वंचित ठेवले जाते. त्यांना त्यांची बोली भाषा बोलण्यास तसेच धर्मचारण करण्यापासून रोखले जाते. इतकेच नाही उयीघर मधील मुस्लिम महिलांचे लैंगिक शोषण केले जाते.

    यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे उयीघर मधील मुस्लिमांचा जन्मदर कमालीचा घटला आहे कारण या मुस्लिम बांधवांची जबरदस्तीने नसबंदी केली जात आहे. या शोषणाविरुद्ध जे कोणी आवाज उठवतील त्यांना थेट ढगात पाठवले जाते. उयीघर प्रांतात चीनने मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधवांचे नरसंहार केला असल्याची शक्यताही या अहवालात वर्तवण्यात आली आहे. अर्थात उयीघर प्रांतात होणारे हे अत्याचार नवे नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून हे अत्याचार सुरू आहेत. पाच वर्षांपूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनने उयीघर प्रांतात २० लाख मुस्लिमांना जबरदस्तीने डांबून ठेवण्यात आले असून त्यांचे दमन व शोषण सुरू असल्याचे म्हटले होते. या दमन व शोषणाला चीनचा नरसंहार असे अमेरिकेने म्हटले होते. केवळ संयुक्त राष्ट्र संघ आणि अमेरिकाच नव्हे तर विविध सामाजिक आणि मानवतावादी संघटनांनी चीनच्या या अत्याचाराचे वेळोवेळी पुरावे देऊन चीनवर कडक निर्बंध लादण्याची मागणी केली होती. आताही या अहवालानंतर संयुक्त राष्ट्र संघाने चीनला कडक निर्बंधाचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर आपला अत्याचार लपवून ठेवण्यासाठी चीनने १३१ पानांचा अहवाल प्रकाशित करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. चीनने कितीही सारवासारव करण्याचा प्रयत्न केला तरी जग त्यावर विश्वास ठेवणार नाही कारण चीन किती कपटी चालीचा आहे हे संपूर्ण जग जाणून आहे.

    चीनमध्ये मानवतेवर कशा प्रकारे हल्ला होत आहे हे या अहवालातून समोर आले तरी याबाबत एकाही मुस्लीम देशाने चीनचा साधा निषेध केला नाही याचे आश्चर्य वाटते. एरव्ही भारतात एखादी जरी किरकोळ घटना घडली तर भारतात अल्पसंख्याकांवर अत्याचार होतोय असा गळा काढणाऱ्या मुस्लिम राष्ट्रांना उयीघर मधील आपल्या बांधवांचे होणारे दमन शोषण दिसत नाही हे जितके खेदजनक आहे तितकेच ते चिंताजनकही आहे. मुस्लिम राष्ट्रांची ही दुटप्पी भूमिका चीड आणणारी आहे.

    ✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५