कांग्रेस मधे पदाधिकारी नियुक्ती हा मोठा अभ्यासाचा विषय आहे.कशी होते? का होते?याचा शोध कोणालाही लागत नाही.महाराष्ट्रात पदाधिकारींची नियुक्ती पैसे घेऊन केली जाते,अशी तक्रार कांग्रेस जनांनीच केली होती. थेट राहूल गांधींकडे.तशी बातमी हिंदी पेपरला आली होती.
मी जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे.तर याबाबत आम्हाला अनुभव येतोच.म्हणून याची बातमी पेपरला वाचण्याची गरज नाही.व्हि जी पाटील यांच्या नंतर संदिप पाटील यांची जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती का व कशी झाली?कोणती गुणवत्ता काऊंट केली? कदाचित त्यांचे आईवडील कांग्रेस चे आमदार, मंत्री होते.किंवा एक पिढी कांग्रेस मधे होती म्हणूनच.त्यानंतर प्रदिप पवार यांची जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाली.पुन्हा तोच प्रश्न.कोणती गुणवत्ता काऊंट केली असेल? यांच्या दोन पिढ्या कांग्रेस मधे होत्या. असेच पिढीजात कांग्रेस चे पदाधिकारी नियुक्ती होत असल्याने जळगाव जिल्हा कांग्रेस या स्थितीला आली आहे.याबाबत आम्ही कांग्रेस ला मतदान करणारे वरिष्ठांना तक्रार करतो.उत्तर मिळते, वरून नियुक्ती झाली.कशी झाली,मला ही सांगता येणार नाही.असे कसे?जर एखादी व्यक्ती जिल्हा स्तरावर पक्षाची जबाबदारी घेत असेल, जबाबदारी सोपवत असू तर ते उघड झाले पाहिजे.यातील कारणे झाकून दडपून ठेवल्याने रहस्य वाढत जाते.कधी मतदार तक्रार करीत असत.आता तर चक्क कांग्रेस पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली.२३ तारखेला कमेटीच्या मिटींग मधे कांग्रेस पदाधिकाऱ्यांनी उघडपणे प्रश्नोत्तरे केलीत.प्रभारी श्री विनायकराव देशमुख यांचेकडे.आणि जळगाव मधील सर्वच पेपरला बातमी प्रसारित झाली.
” कांग्रेसमधील भाऊबंदकी चव्हाट्यावर आली.” यात भाऊबंदकी हा योग्य शब्द वापरला.त्याऐवजी ” पदाचे वाटणीपत्र ” म्हणणे जास्त योग्य आहे.जसे भाऊ बहिणी बापाची जमीन वाटून घेतात.त्यानुसार तलाठी सातबारावर नोंद करतो.ईश्वर मोरे यांनी श्री विनायकराव देशमुख यांची भेट घेतली.म्हणाले, आम्ही वीस वर्षांपासून कांग्रेसची माणसे आहोत.पण सातबारावर नांव नसल्याने आमचे नाव पदाच्या वाटणी पत्रावर येत नाही.
आम्ही श्री विनायकराव देशमुख यांची भेट घेऊन सांगितले कि, कांग्रेस भवन ला लागलेले जाळे काढायचे असेल तर,आहे ते शेण,गिलाव,पोफडा खरडून काढून फेका.नळे,बोखले बंद करा.उदी,मुंग्याची घरे बंद करा.पुर्ण कमेटी, सदस्य, अध्यक्ष बदला.लंगडत चालणारे,सरपटत चालणारे,टेकत टेकत चालणारे,कंडत कंडत चालणारे यांना थोडा आराम करू द्या.यांच्या पुर्वजांची मेहनत असेल तर पेन्शन द्या.पण यांनी कांग्रेसचा अतिरिक्त लाभ घेतला असेल तर यांचेकडून लगान वसुल करा.शाळा, कॉलेज, पेट्रोल पंप,दवाखाने,कारखाने,दुकाने चालवायला सांगा.पैसे कमवा व कांग्रेस ला आर्थिक योगदान करा.हेच तत्व स्व.इंदिरा गांधींचे होते.सर्व संस्थानिकांचे पेन्शन बंद केले होते.विसरलेत का?
महाआघाडी सरकार मधे कांग्रेस चे अकरा मंत्री होते.एकानेही उल्लेखनीय काम केले नाही.ज्यामुळे ते कांग्रेस चे मंत्री आहेत,असे जनतेला वाटलेच नाही.उलट सेना आणि राष्ट्रवादी ने मात्र याचा पुरेपूर फायदा घेतला.आम्ही स्पष्ट बोलतो,लिहीतो, महसूल मंत्री , बांधकाम मंत्री , ऊर्जामंत्री यांनी असे कोणते काम केले,असे कोणते निर्णय घेतले ,कि जे जनतेला आवडले?हे मंत्री अडीच वर्षांत एकदाही जळगाव ला आले नाहीत.उलट आम्हीच त्यांचा संगमनेर पर्यंत पाठलाग केला.आणि त्यांनी पळ काढला.कोणी म्हणेल. ही ,थोरात आमचे जेष्ठ नेते आहेत.असे बोलू नका.असतीलही जेष्ठ.फक्त वयाने.पण कर्तुत्वाने नाहीत.जे लोकांना अपेक्षित आहे.
जळगाव शहरातील, जिल्ह्यातील काही पदाधिकारी तक्रार करतात कि,हा माणूस कांग्रेस ची बदनामी करतो.मग,काय खुशामत केल्याने कांग्रेस वाढेल काय? माणूस मेला.डॉक्टरला बोलवले.त्यांनी नाडी पाहिली.सांगितले कि,हा मेला आहे.तर याचा अर्थ असा होतो का,कि त्या डॉक्टर ने माणूस मारला? अशी कुंठीत बुद्धी असलेली माणसे बाजूला सारली पाहिजे.ज्यांच्या मेंदूत कोणतीही माहिती शिरायला जागा उरली नाही.कांग्रेसची दरवर्षी अधिवेशन,सम्मेलन, शिबीर होतात.कशासाठी? च्याऊम्याऊं करण्यासाठी का? नाही.तेथे आपले यश अपयश बाबत चर्चा केली जाते.यश कसे मिळाले?अपयश का आले? अपयशाची कारणे काय?कशी दुरूस्ती करता येतील? पण तेथेही मान अपमानाचा रूसवा फुगवा होत असेल तर , कांग्रेस बरबादीकडे जात असल्याचे संकेत मिळतात.
जळगाव शहरात किंवा जिल्ह्यात मागील दहा वर्षात एकदा सभा झाली होती.एरंडोल येथे अशोकराव चव्हाण यांची.बाकी सर्वत्र सामसूम.जिल्हा स्तरावर मिटींग होतात ,त्याही,एकमेकांचे कान धरून.च्याऊ म्याऊं ,पंढरीचे पाणी पिऊ.थो थो थापडी गिलक्याचे पान.धर धर बाबू इसका कान.श्री नाना पटोले प्रदेश अध्यक्ष झाले.वाटले होते,बदल होईल.उत्साह येईल.पण अद्याप त्यांना जळगाव जिल्ह्यातील कोणत्याही मैदानावर उतरवले नाही.तुलनेने सेना,भाजप, राष्ट्रवादी ची मैदाने गाजत आहेत.
ही अशी मरगळ का आली? तर पदाधिकारी सुमार दर्जाची,जातीकुळाची, वाटणी पत्राची, वारसाहक्काने , सातबारावर आलेली आहेत.राजकिय पक्ष म्हणजे शेतजमीन,घर बंगला, कारखाना सारखी खाजगी मालमत्ता समजणारी.याबाबत आम्ही प्रभारी श्री विनायकराव देशमुख यांना प्रत्यक्ष भेटून सांगितले कि,बदल हवा असेल तर गाढवाला घोडा बनवण्याच्या फंदात पडू नका.गाढव विकून घोडा खरेदी करा.मग,बघा, कांग्रेस चा तांगा बसंतीच्या पुढे कसा पळतो?
✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव