ताटीचे अभंगकर्ती: सानुली मुक्ताई!

    46
    Advertisements

    [संतशिरोमणी मुक्ताबाई जयंती विशेष]

    महाराष्ट्रात अनेक संत महात्म्ये होऊन गेले. या संतांमध्येच अनेक स्त्रीसंतही समाविष्ट आहेत. ज्यांनी समाजकार्यात बहुमूल्य वाटा उचलला, ज्यांनी मायमराठीच्या सारस्वतात भक्तीचा मळा फुलवला व मराठी साहित्याचे दालन भावसंपन्न केले, ज्यांना असामान्य बुद्धिमत्ता लाभली, ज्या अलौकिक भावंडांच्या वलयात वाढल्या, भक्तियोग मार्ग यात पारंगत असलेल्या ज्ञानेश्वरांची बहिण म्हणजेच संतशिरोमणी मुक्ताबाई होत. संपूर्ण जग चालवणारी आदिमाया आदिशक्ती ही संत मुक्ताईच्या रुपातील एक स्त्रीशक्तीच होय. त्यांच्याबद्दल पैठणकरांची प्रतिक्रिया होती-

    “हे तिन्ही अवतार तीन देवांचे|
    आदिमाता मुक्ताई मुक्तपणे अवतरली||”

    संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे इ.स.१२७९ साली झाला. तो दिवस मराठी कालगणनेनुसार आश्विन शुद्ध प्रतिपदा- घटस्थापनेचा होता. या महाराष्ट्रातील स्त्रीसंत व कवयित्री होत्या. संत मुक्ताबाई या मुक्ताई नावानेही ओळखल्या जातात. त्यांचा संतवाङ्मयात ब्रह्मचित्कला नावाने देखील सन्मान झाला असल्याचे आढळते. रुक्मिणी व विठ्ठलपंत हे त्यांचे आई वडील होते. संत निवृतीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. खरे तर विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई जन्माला आले. साक्षात दिव्यत्वाची ही चार रूपे रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांचे मातृ-पितृत्व धन्य करणारी! पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करून मातापित्याला जगाचा निरोप घ्यावा लागला. पोरवयातच निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडाना संन्याशाची पोरं म्हणून वाळीत टाकून त्यांची विटंबना केली, परंतु हे सारे भोग सोसत या चारही बहिणभावंडानी ब्रह्मविद्येची अखंड उपासना केली. आपल्यानंतर आपली मुलं सुखी रहावीत, या आशेने विठ्ठलपंत व रुक्मिणी यांनी निर्दय समाजाने दिलेल्या देहांत प्रायःश्चिताचा निर्णय मान्य करून देहत्याग केला. मातापित्याच्या या देहत्यागानंतर या अनन्य साधारण कुटुंबाच्या गृहीणीपदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली. ती तितक्याच समर्थपणे तिने उचलली आणि पेलली. आपल्या भावंडांची जणू त्या माउलीच झाल्या. त्यामुळे खेळण्या बागडण्याच्या वयातच त्या प्रौढ, गंभीर, सोशिक आणि समंजस बनल्या.

    “तात आणि माता गेलीसे येथून| तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा|| निवृत्ती ज्ञानेश्वर कोरान्नाचे अन्न| सांभाळी सोपान मजलागी|| तुझ्या योगे हरी क्रमियेला काळ|…”

    संत मुक्ताबाईच्या हातून विश्व उद्धाराचे कार्य घडले. चौदाशे वर्षे जगलेला योगी चांगदेव एवढा मोठा तपस्वी होता. परंतु त्याने गुरु केला नसल्याने त्याला ईश्वरदर्शन झाले नव्हते. संत मुक्ताबाईंनी त्यांना पासष्टीचा अर्थ उलगडून दाखविला. त्यांच्या अनुग्रहाने चांगदेवांना आत्मरुपाची प्राप्ती झाली. तेव्हा त्यांचे जीवन धन्य झाले. आठ वर्षाची मुक्ताई चौदाशे वर्षाच्या चांगदेवांची अध्यात्मिक गुरु बनली. कृतार्थतेने ते म्हणतात, की मुक्ताई करे लेइले अंजन! संत ज्ञानेश्वरांनी एकदा त्यांना मांडे बनवण्यास सांगितले, तेव्हा त्या मातीचे खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेल्या. विसोबा चाटी हा त्या गावाचा प्रमुख होता, जो या चार भावंडांचा द्वेष करत असे. त्याने यांना कोणीही खापर देऊ नये, अशी गावात ताकीद दिली. त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यांचा हिरमुसलेला चेहरा बघून ज्ञानेश्वरांनी योगबळाने स्वतःची पाठ तापवली. त्यांना ते तेथे भाजण्यास सांगितले. तो चमत्कार पाहून विसोबा त्यांना शरण आले. त्यांनी मुक्ताईने भाजलेले मांडे प्रसाद म्हणून खाण्यासाठी धावतच झडप घातली. त्यावर मुक्ताईने त्यांना खेचर पक्षी असे म्हटले. तेव्हापासून त्यांनी तेच नाव धारण करून ते संत विसोबा खेचर बनले. संत मुक्ताईवर गोरक्षनाथांच्या कृपेचाही वर्षाव झाला होता. त्यानंतर त्यांना अमृत संजीवनीची प्राप्ती झाली. त्यांचा बोधप्रद अभंग-

    “अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार नाही गेला| मान अपमान वाढविसी हेवा,दिवस असता दिवा हाती घेसी||”

    संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेल्या ज्ञानदेवांनी दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे. त्यांनी त्यांना आदिनाथांपासून गहीणीनाथांकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती, ज्ञानदेवाकडे आलेल्या नाथसंप्रदायाची आठवण करून दिली. घराण्याच्या मोठेपणाचे, योगीपणाचे स्मरण करून दिले. जो जनांचे अपराध सहन करतो तो योगी. अवघे विश्व जरी आपल्यावर रागावले तरी जलासारखे थंडपण घेऊन त्या क्रोधाग्निला विझवायचे. लोकांच्या शब्दरूपी शस्त्राने जरी त्रास झाला तरी चांगला उपदेश मान्य करायचा. अशा शब्दात समजावताना मुक्ताईंच्या शब्दांचे अभंग झाले, तेच ताटीचे अभंग होत-

    “योगी पावन मनाचा| साहे अपराध जनांचा|| विश्व रागे झाले वन्ही| संती सुखे व्हावे पाणी|| शब्दशस्त्रे झाले क्लेश| संती मानावा उपदेश|| विश्वपट ब्रह्मदोरा| ताटी उघडा ज्ञानेश्वरा||”

    समजवताना म्हणतात, आपलाच हात आपल्याला लागला तर त्याचे दुःख करू नये. आपली जीभ आपल्या दाताखाली आली म्हणून लगेच काही आपण दात पडून टाकत नाही. ब्रह्मपदाला पोहोचायचे तर लोखंडाचे चणे खावे लागतात, हाल-अपेष्टा सहन कराव्या लागतात. समजवण्याच्या सगळ्या मार्गांनी जाऊनही ज्ञानदादा काही ताटीचे दार उघडेना. तेव्हा हळव्या झालेल्या मुक्ताई म्हणतात-

    “हात आपुला आपणा लागे| त्याचा करू नये खेद|| जीभ दातांनी चाविली| कोणे बत्तीशी पाडिली|| चणे खावे लोखंडाचे| मग ब्रह्मपदी नाचे|| लडिवाळ मुक्ताबाई| जीव मुद्दल ठायीचे ठायी|| तुम्ही तरून विश्व तारा| ताटी उघडा ज्ञानेश्वरा||”

    ज्ञानदेवांनी ताटीचे दार उघडले आणि त्यानंतर आयुष्यात त्यांच्या हातून अलौकिक कार्य घडले. त्यांच्या अलौकिक कार्याला श्रीनिवृत्तीनाथांची कृपा व मुक्ताईंची धेयस्वप्नांची जाणीव होती. समाजाभिमुख आणि अत्यंत अर्थपूर्ण अशी मुक्ताबाईच्या अभंग रचना आहेत. मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग लिहिले त्याचप्रमाणे हरिपाठाचे व गहन अर्थाचे सुद्धा अभंग लिहिलेत-

    “मुंगी उडाली आकाशीं|
    तिनें गिळीलें सूर्याशीं||”

    त्यांचे विचार फार साधे मात्र परखड होते. मराठीतील पहिल्या कवयित्री म्हणून आज देखील त्यांचा नामोल्लेख होतो. त्यांनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले. त्यांत संत निवृतिनाथ व संत मुक्ताबाई यांचा संवाद आलेला आढळतो, त्यावरून ते कळते. संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृतिनाथ मुक्ताबाईंना घेऊन तीर्थयात्रा करण्याकरीता निघाले. ते तापी नदीवर आले असता अचानक वीज कडाडली. दि.१२ मे १२९७ रोजी संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या, असे सांगितले जाते. त्यांची समाधी जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथे आहे.

    !! पुरोगामी न्युज परिवारातर्फे संतशिरोमणी मुक्ताबाईंना पावन जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!

    ✒️अलककार:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी(म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी)गडचिरोली, फक्त व्हॉटसॅप-९४२३७१४८८३