उत्सव हे चांगल्या कार्याचा ओनामा-नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना

    49
    Advertisements

    उत्सव हे चांगल़्या कार्याची सुरुवात करण्याचे निमित्त असते. त्या मुहूर्तावर चांगल्या सवयी लावून घ्याव्या, चांगल्या कार्याचा शुभारंभ करावा, चांगल्या कामासाठी योगदान देता यावे, हा शुद्ध हेतू असतो. परंतु अलीकडे विचार लक्षात न घेता केवळ ट्रेंड म्हणून अनेक गोष्टी केल्या जातात. कुणी विचारले, तर त्यामागचे कारणही सांगता येत नाही. त्यामुळे व्यक्तीचे हसे होतेच, परंतु धर्म संस्कृतीवर देखील प्रश्नचिन्ह उभे केले जाते. म्हणून एखाद्या गोष्टीचे अनुसरण करायचे असेल, तर आधी त्याची संपूर्ण माहिती करून घ्यावी आणि मगच त्यानुसार कृती करावी.

    नवरात्राचे दिवस म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे दिवस. जगामध्ये कोणतीही नैतिक मूल्ये केवळ चांगल्या आहेत म्हणून टिकत नाहीत, तर त्यांचे अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या पाठीमागे समर्थ लोकांच्या तपश्चर्येचे पाठबळ असणे आवश्यक असते. जगात तपश्चर्येला यश मिळते. ही गोष्ट सत्याच्या उपासकांनी विसरता कामा नये. तपश्चर्येच्या बळाने जगात पुष्कळ वेळा असत्य मूल्ये देखील विजयी झाली आहेत, ही गोष्ट आपल्याला उपरोक्त सत्याची अंधुक कल्पना देते. दुर्बळ लोकांचे सत्य, संस्कार किंवा संस्कृती यांची कोणी पूजा करत नाही.

    अश्विन महिन्यात येणा-या या नवरात्र उत्सवाबाबत पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. महिषासुर नावाचा एक राक्षस अतिशय प्रभावी बनला होता. त्याने स्वत:च्या सामर्थ्याच्या बळावर सर्वच देवांना व मनुष्यांना ‘त्राहि माम्’ करून सोडले होते. दैवी विचारांची प्रभा अस्पष्ट बनली होती व दैवी लोक भयग्रस्त झाले होते.

    धैर्य घालवून बसलेल्या देवांनी ब्रह्मा, विष्णु, महेश यांची आराधना केली. देवांच्या प्रार्थनेने प्रसन्न झालेल्या आद्य देवांना महिषासुराचा राग आला. त्यांच्या पुण्यप्रकोपातून एक दैवीशक्ती निर्माण झाली. सर्व देवांनी जयजयकार करून ती साभाळली, तिचे पूजन केले. तिला स्वत:च्या दिव्य आयुधांनी मंडित केले. या दैवी शक्तीने नऊ दिवस अविरत युद्ध करून महिषासुराला मारले. आसुरी वृत्तीला दाबून, दैवी शक्तीची पुन्हा स्थापना करून देवाला अभय दिले. दैवी शक्ती तीच आपली जगदंबा!

    या दिवसात आईजवळ शक्ती मागायची व आसुरीवृत्तीवर विजय मिळवायचा. आजही महिषासुर प्रत्येकाच्या ह्रदयात स्वत:चे स्थान जमवून बसला आहे आणि आत असलेल्या दैवी वृत्तीना गुदमरवून सोडले आहे. या महिषासुराच्या मायेला ओळखले पाहिजे. तिच्या आसुरी जुलमांपासून मुक्त होण्यासाठी दैवी शक्तीच्या आराधनेची आवश्यकता आहे. नऊ दिवस अखंड दीप तेवत ठेवून आई जगदंबेची पूजा करून तिच्यापासून शक्ती प्राप्त करण्याचे दिवस म्हणजेच नवरात्रीचे दिवस!

    आपली चुकीची समजूत आहे, असुर म्हणजे मोठ्या दाताचे, मोठ्या नखांचे, लांब केसांचे, मोठे डोळे असलेले कोणी भयंकर राक्षस! खरे पाहता असुर म्हणजे ‘असुषु रमन्ते इति असुर:’ प्राणातच रममाण होणारे, भोगातच रममाण होणारे! तसेच महिष म्हणजे रेडा. त्या दृष्टीने पाहता रेड्याची वृत्ती बाळगणारा तो महिषासुर. रेडा नेहमी स्वत:चेच सुख पाहतो. समाजात ही रेड्याची वृत्ती पसरत चालली आहे. परिणामत: संपूर्ण समाज स्वार्थी, प्रेमविरहित व भावशून्य बनला आहे. समाजात आज व्यक्तिवाद स्वार्थैकपरायणता अमर्याद बनून महिषासुर रूपात नाचत आहे. या महिषासुराच्या नाकात वेसण घालण्यासाठी आईजवळ सामर्थ्य मागण्याचे दिवस म्हणजे नवरात्राचे दिवस!

    आपल्या वेदानीही शक्तीच्या उपासनेला फारच महत्त्व दिले आहे. महाभारताचे पानन् पान बलोपासना व शौर्यपूजा यांनी भरलेले आहे. व्यास, भीष्म व कृष्ण यांची सर्वच भाषणे तेज, ओज, शौर्य, पौरुष व पराक्रम यांनी भरलेली आहेत. महर्षी व्यासांनी पांडवांना शक्ती उपासनेचे महत्त्व समजावले आहे. त्यांनी पांडवांना उपदेश केला की, तुम्हाला जर धर्माची मूल्ये टिकवायची असतील तर हात जोडून, बसून चालणार नाही. शक्तीची उपासना करावी लागेल. अर्जुनाला दिव्य अस्त्र प्राप्त करण्यासाठी व्यासांनी स्वर्गात जाण्याची सूचना केली होती.

    अनादी कालापासून आसुरीवृत्ती सद्विचार, दैवी विचारावर मात करत आलेली आहे आणि दैवी विचार अडचणीत येताच देवांनी भगवंताजवळ शक्ती मागितली आहे. सामर्थ्य मागितले आहे आणि आसुरीवृत्तीचा पराभव केला आहे. केवळ सद्विचार आहेत तेवढे पुरत नाहीत. त्यांचे रक्षण होणेदेखील आवश्यक आहे आणि त्यासाठी शक्तीची उपासना आवश्यक आहे.

    आपणही आळस झटकून, क्षणिक प्रमादाना दूर सारत पुन्हा शक्तीची उपासना सुरू केली पाहिजे. ‘संघे शक्ति: कलौ युगे’ ही गोष्ट ध्यानात ठेवून नवरात्राच्या दिवसात दैवी विचारांच्या लोकांची संघटना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या संघटनेत प्रामुख्याने जगदंबा असेल आणि तिच्या भक्तीनेच आपल्यात शक्ती प्रगट होईल हे सुचवण्यासाठी नवरात्राच्या दिवसात गरबा किंवा रास यांच्या रुपात देवीच्या भोवती फिरायचे असते. देवीच्या सभोवती फिरता फिरता सांगितले पाहिजे की, ‘माते, तू आम्हाला सद्बुद्धी दे, आम्हाला संघबळ दे. आमच्या संघबळाच्या आड आमचा अहंकार येतो, आमची महिषवृत्ती जागृत होते, आमचे द्वेष उफाळून येतात, त्यांना तू खाऊन टाक.’

    आई जगदंबेची आपली ही उपासना नवरात्रात सुरू होते. पण ती केवळ नऊ दिवसांपुरती सीमित राहू नये, हे ध्यानात ठेवण्याची गरज आहे. क्षणाक्षणाची शक्ती उपासना आपल्याला जडवादी जगात उभे राहायची शक्ती प्रदान करेल. नवरात्राचे दिवस म्हणजे शक्तीच्या उपासनेचे दिवस, आईच्या पूजेचे दिवस. ‘खा, प्या, मजा करा’ अशा आसुरी विचारश्रेणीवर विजय मिळवण्याचा दिवस. संघशक्तीचे महत्त्व व भक्तीची महत्ता समजवण्याचे दिवस. तसेच तपश्चर्येचा महिमा व एकता यांचे महत्त्व समजवणारे दिवस. या दिवसात घुमत असलेला साधनेचा सूर पकडून जीवन समर्पणाच्या संगीताने भरून टाकायला पाहिजे.

    ✒️शब्दस्पर्शी:-सुनील शिरपुरे(कमळवेल्ली,यवतमाळ)मो:-७०५७१८५४७९