?वाशी येथे कविता, कथा व पुस्तकांचे प्रकाशन
✒️डॉ सुरेश राठोड(कोल्हापूर प्रतिनिधी)
कोल्हापूर(दि.8ऑक्टोबर):- सामाजिक जीवनाचे नाते अधिक घट्ट करण्याचे काम कथासंग्रह आणि कवितासंग्रहाच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे पुस्तके आपल्या आयुष्यात दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शक ठरतात. ती चांगल्या गोष्टींची जाणीव करून देत, जीवन प्रकाशमान करतात. प्रत्येकाच्या जीवनात पुस्तकाचा परिस्पर्श झाला तर त्यांचे जीवनमान उंचावते. म्हणूनच पुस्तके जीवन परिवर्तनाचे काम करीत असतात. आता इंटरनेटचा ऑनलाइन जमाना असला तरी पुस्तकाचे महत्व त्यापेक्षाही अधिक पटीने जास्तच आहे. असा सूर वाशी येथील रत्नदीप मंगल कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी घुमला. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो, पूर्वी पुस्तक दिसत होते, पुस्तक हेच उत्तम मार्गदर्शक आहे. ते आपल्या जीवनात गुरु प्रमाणे दिशा देत असते म्हणून आजही पुस्तकाला तोड नाही, अशा प्रतिक्रिया याप्रसंगी उपस्थित असलेल्या अनेक वाचकांनी व्यक्त केल्या. त्यामुळे हा सोहळा लक्षवेधी ठरला. या भागात असा प्रथमच कार्यक्रम झाल्यामुळे सर्वत्र तो कौतुकाचा विषय ठरला.
आई महालक्ष्मीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या करवीर नगरीतील वाशी येथील रत्नदीप मंगल कार्यालय मध्ये बी.ए.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कै.रंगराव पाटील (रेंदाळकर) वास्तववादी, नाती व निसर्गावर आधारित कविता संग्रह व पांडुरंग सुभान कांबळे (नंदवालकर) लिखित आजच्या वास्तविक तरुणांच्या जीवनावर आधारित, आजची तरुणाई कथासंग्रह, विश्व प्रेमाचे कवितासंग्रह अशा पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे दैनिक पुढारी चे कार्यकारी संपादक श्रीराम पचिंद्रे, प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ जे.के.पवार, उदयसिंह पाटील (कौलकर), कार्यक्रमाचे अध्यक्ष गोकुळ सहकारी दूध संस्थेचे अध्यक्ष विश्वासराव पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रजनन व साहित्य प्रकाशन करण्यात आले.
यावेळी दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक श्रीराम पचिंद्रे म्हणाले, साहित्य हा समाज परिवर्तनाचा आरसा आहे, तो मानवी मनावर नियंत्रण ठेवतो. यानंतर प्राचार्य डॉ. जे.के. पवार यांनी पुस्तकांबद्दल माहिती दिली. यानंतर गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, आजच्या काळात साहित्य संस्कृतीला बळ देण्याची गरज आहे. राम मोहिते व उदयसिंह पाटील कौलकर यांनी मनोगत व्यक्त केले.यानंतर संयोजक राजवीर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका व्ही.एस. सरनोबत, एस.बी.बर्गे, एम एस पाटील यांचा पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. निवेदन बी एस कांबळे सर यांनी केले.