संविधानामुळेचं देशाची एकात्मता अन् सार्वभौमत्व अबाधित!

    68
    Advertisements

    आधुनिक अखंड भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपल्या भारत देशाला संविधान अर्पण केले अन् २६ जानेवारी १९५० पासून, पुर्वीची सर्व व्यवस्था संपुष्टात येऊन भारतात संविधानिक लोकसत्ताक कार्यप्रणाली अस्तित्त्वात आली. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व धर्मनिरपेक्षता या संविधानिक तत्वांवर देशाची एकता,अखंडता अन् राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे महान, अनमोल कार्य केले, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा सन्मानपूर्वक मुलभूत अधिकार दिला. त्या संविधानाबद्दल आपण खरचं कृतज्ञ आहोत का ? संविधानामुळे आपला भारत देश अखंड, सार्वभौमत्व आहे याचा भारतीय म्हणून आपल्याला सार्थ अभिमान असायलाचं पाहिजे. बाबासाहेबांनी ‘मी प्रथम भारतीय आहे, अन् अंततःही भारतीय आहे’ अशी व्यापक राष्ट्रवादाची अन् राष्ट्र प्रेमाची भूमिका मांडली. घटनेत सर्वचं समाजातील घटकांसाठी ठोस तरतुद करुन ठेवली. या महापुरुषांने अस्पृश्यांनाचं नव्हे तर, स्पृश्यांनाही पुनीत केले.

    त्याचं संविधानिक लोकशाहीव्दारे आपण गेली ७२ वर्षे अनेक क्षेत्रात दमदार वाटचाल करीत आहोत,जागतिक स्पर्धेत आहोत. पाकिस्तान १४ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य झाला असून,त्याची आज काय अवस्था आहे हे लक्षात असू द्या. संविधानाच्या माध्यमातून भारतीयांवर केलेल्या अनंत उपकारांमुळेचं, भारतीय संविधानाला जगात वेगळाचं आयाम मिळाला आहे. तरी सुध्दा काही जातीवादी बेगडी देशभक्त,बिनडोक बांडगुळे संविधान विरोधात सातत्याने गरळ ओकतात,त्याचे अवमुल्यन करतात, सोयीचं भावनिक राजकारण करतात हा घटनाद्रोह नाही का?. सत्ता ही संविधानानुसार चालली नाही तर, त्या देशाची परवड काय होते त्याचे अफगानिस्तान हे जीवंत उदाहरण आहे. लोकशाहीत एका विरोधी पक्षाची भूमिका ही सत्ताधारी पक्षा इतकीच जबाबदारीची व महत्वाची असते हे त्याचवेळी बाबासाहेबांनी सांगितले आहे.

    त्यामुळे जातीय, धार्मिक संकुचित भावनेतून संविधानाविषयी व्देष नाही तर, आदरचं बाळगला पाहिजे.नुकतीच एका चर्चेत भाऊ तोरसेकरांनी बाबासाहेबांविषयी गरळ ओकली. कारण काय तर,संविधान.. अरे, भारतात अनेक जाती, धर्म, रुढी, परंपरा, पंथ, वर्ण व्यवस्था अशी विभिन्न परिस्थिती असतांना संविधानांने भारताचे अखंडत्व राखले असून,तुमच्यासारखे लोक जातीय धर्मांध मानसिकतेतून देशांतर्गत सामाजिक सलोखा बिघडविण्यासाठी उचापती घडवतांना दिसून येतात. म्हणजे संविधानाची मुलभूत तत्वे तुम्हांला मान्य नाहीत का ? पण, संविधानाला धक्का लागला तर बाबासाहेबांनी महत् प्रयासाने उभारलेला लोकशाहीचा हा डोलारा उध्वस्त होऊन देशात विषमता, हुकूमशाही, धर्मसत्ताक प्रणाली निर्माण होऊन अराजकता माजेल अन् राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येईल. संविधान हा लोकशाहीचा प्राण आहे. राष्ट्रभक्तीपोटी जातीय मानसिकतेतून संविधान नाकारण्याची देश विरोधी कृती हि अक्षम्य गुन्हा असून,जाती धर्माच्या नावाखाली जी विचारधारा निर्माण होत आहे ती देशाला घातक आहे. संविधान नाकारण्यामागे चातुर्वण्य, विषमतावादी, मनुवादी व्यवस्था अभिप्रेत, अपेक्षित असल्याचे दिसून येत असून त्यांना समतावादी, मानवतावादी, जाती निर्मुंलन ही उद्दिष्टे मानणारी घटना मान्य नाही हे स्पष्ट होते.

    विषमता,जातीयता,निर्दयता,उचनिचता, अन्याय अशा अनेक भ्रामक गोष्टींचे प्रतिक असलेल्या मनुस्मृती ग्रंथाच्या आधारावर भारतीय राज्य घटना निर्माण झाली तर, अनेक जाती, धर्म, रुढी, परंपरा, पंथ, वर्ण व्यवस्था असलेल्या भारत देशाची अवस्था अफगानिस्तान, पाकिस्तानपेक्षाही भयानक अन् भयावह होईल. कारण, संविधान असतांना जातीय धर्मांध मानसिकतेतून आज ज्या काही घटना अन् विचारधारा निर्माण होत आहे त्यात,संविधान अस्तित्त्वात नसेल तर काय परिस्थिती ओढवलं?. मग,जाती धर्माच्या नावाखाली राजकारण करायला रानचं मोकळे होईल. अरे, संविधान निर्मिती करतांना संविधान सभेत प्रत्येक मुद्द्यांवर सखोल, अभ्यासपुर्ण चर्चा करुन, एकेक मुद्दा तपासूनचं संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे स्वातंत्र्य, समता,बंधुता,न्याय व धर्मनिरपेक्षता या संविधानिक तत्वांवर देशाची एकता,अखंडता अन् राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहिली पाहिजे.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना उभ्या आयुष्यात अनेकदा जातीयतेचे चटके,विरोधाभास सहन करावा लागला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी तर, ‘आम्ही कोणत्याही परिस्थितीत डॉ.आंबेडकर घटना समितीत येणार नाहीत याची पुर्ण काळजी घेतली आहे’ असे जाहिर वक्तव्ये केले होते. पण,बाबासाहेबांनी घटना निर्मिती करतांना त्याचा कुठे लवलेशही जाणवू दिला नाही.महिलांसाठी हिंदू कोड बिल संसदेत मंजूर झाले नाही म्हणून आपल्या मंत्री पदाचाही राजीनामा दिला होता.’लिंगायत,मुसलमान,मराठे व अस्पृश्य हे सर्वचं मागासलेले आहेत. या समदुःखी माणसांनी सहकार्य करुन एकजूटीने वागण्यास काय हरकत आहे’ असे वक्तव्य त्यांनी २५ डिसेंबर १९३९ रोजी बेळगांव येथे जाहिर सभेत केले होते. देशाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांच अनमोल योगदान आहे. या देशाचा सर्वांगीण विकास आराखडा बाबासाहेबांच्या नावांवर आहे असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही एवढे त्यांचे या देशावर अनंत उपकार आहेत. देशहितासाठी बाबासाहेबांनी सर्व काही केलं असतांनाही संविधान अन् बाबासाहेबांबद्दल एवढा पराकोटीचा पोटशुळ का दिसून येतो ?.

    कायदे,संविधानाला दोष देण्यापेक्षा त्यांच्या अंमलबजावणीसाठी आग्रह का धरला जातं नाही ?. तुमच्या घरातील उंदिर मारण्यासाठी तुम्ही तुमच्या घरालाचं आग लावणार आहात का ? कपड्यात, राहणीमानात बदल झाला असला तरी तुमच्या जातीय धर्मांध मानसिकतेत बदल,परिवर्तन कधी होणार आहे ?

    संविधानाच्या प्रास्ताविकेत न्याय,व्यक्ती,स्वातंत्र्य,समानता,व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता,बंधुता या मानवी मुल्यांचा घटनाकारांनी उल्लेख,पुरस्कार केला आहे. ही घटना आम्ही स्विकारली,ही किती अभिमानास्पद बाब आहे. म्हणून,फक्त गरजेपुरते अन् सोयीच्या राजकारणासाठी संविधानावर अन् बाबासाहेबांवर स्तुतीसुमने न उधळता, नतमस्तक होण्याचा दिखाऊपणा न करता, संविधानाचा प्रामाणिक अन् सन्मानपूर्वक गौरव करुन, संविधानाची काटेकोरपणे कशी अंमलबजावणी होईल यासाठी सर्वांनी प्रयत्नशील अन् जागृत राहून त्याला लोकाभिमुख केलं पाहिजे. कारण जाती,धर्म,प्रांतापेक्षा स्वातंत्र्य, समता,बंधुता,न्याय तसेच देशाची एकात्मता,अखंडता,धर्मनिरपेक्षता व आम्ही भारतीय, आम्ही भारताचे लोक हिच आपली ओळख अन् राष्ट्रीयत्व निर्माण झाले पाहिजे. देशातील सामाजिक सलोखा,देशाची एकता एकात्मता जोपासली जाऊन,धर्मनिरपेक्षता हि आपली जागतिक ओळख जपली गेली पाहिजे.

    ✒️मिलिंद कांबळे(चिंचवलकर)विरार,मुंबई(मो:-9892485349)

    श्रद्धा के गिद्ध-भोज के लिए जुटान

    बोलीचा नाद : डंके की चोट पर