मराठी भाषेला समृद्ध करणारे साहित्यिक-डॉ नागनाथ कोत्तापल्ले

    62
    Advertisements

    मराठीतील जेष्ठ साहित्यिक, विचारवंत नागनाथ कोत्तापल्ले सर यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. नागनाथ कोत्तापल्ले सर गेली काही दिवस आजारी होते. बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाची मोठी हानी झाली आहे. मराठी साहित्य विश्वातील प्रथितयश साहित्यिक म्हणून ओळखले जाणारे नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च १९४८ रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी झाली. नागनाथ कोत्तापल्ले यांचे शालेय शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. १९६९ साली कोत्तापल्ले सरांनी देगलूर येथून बी ए ची पदवी मिळवली. बी ए ची पदवी मिळवताना ते मराठवाड्यात तिसरे तर मराठी विषयात पहिले आले होते. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी एम ए पूर्ण केले आणि १९८१ साली यु. म. पठाण सरांच्या मार्गदर्शनाखाली शंकरराव पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर पिचडी मिळवली. १९७१ ते १९७७ या काळात त्यांनी बीड येथील महाविद्यालयात अध्यापन केले. अध्यापक म्हणून विद्या दानाचे पवित्र कार्य करताना त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले.

    नागनाथ कोत्तापल्ले १९७७ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनतर ते पुणे विद्यापिठाच्या मराठी विभागाचे प्रमुख बनले. २००५ पासून २०१० पर्यंत कोत्तापल्ले सर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते. डॉ नागनाथ कोत्तापल्ले सरांनी १९७० पासून लेखनास सुरवात केली. मुड्स हा त्यांचा कविता संग्रह १९७६ साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर कर्फ्यु आणि इतर कथा व संदर्भ हे दोन कथा संग्रह प्रकाशित झाले. कवीची गोष्ट आणि सावित्रीच्या लेकी या त्यांनी लिहिलेल्या दीर्घ कथा त्या काळात खूप गाजल्या. या दरम्यान त्यांच्या गांधारीचे डोळे आणि मध्यरात्र या कादंबऱ्या आणि इतर बरेच ललित साहित्य प्रकाशित झाले. नागनाथ कोत्तापल्ले सरांनी कथा, कादंबरी, ललित लेख सोबतच समीक्षा लेखनही केले. साहित्याचा अन्वयार्थ, आधुनिक मराठी कविता, नवकथाकार शंकर पाटील, ग्रामिण साहित्य : स्वरूप आणि बोध हे त्यांचे समीक्षात्मक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. निवडक बी रघुनाथ आणि स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे संपादनही त्यांनी केले.

    डॉ नागनाथ कोत्तापल्ले सरांनी अनेक महत्वाच्या पदावर अध्यक्ष म्हणून काम केले. नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बाल पुरस्कार समिती आणि एच एस सी बोर्डाचे मराठी अभ्यास मंडळ अशा महत्वाच्या संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. यावशिवाय मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाहकपदही त्यांनी सांभाळले. डॉ नागनाथ कोत्तापल्ले सर काही नियतकालिकांचे संपादकही होते. २०१२ साली चिपळूण येथे झालेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. जवळपास पाच दशके आपल्या समर्थ लेखणीने मराठी भाषेला समृद्ध करून डॉ नागनाथ कोत्तापल्ले सर आपल्यातून निघून गेले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वात मोठी पोकळी झाली आहे. डॉ नागनाथ कोत्तापल्ले सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!

    ✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५