भारताचे पहिले उपपंतप्रधान, पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज ७२ वि पुण्यतिथी. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी आणंद या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील झव्हेरिभाई यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. त्यामुळे लहानपणीच त्यांना देशभक्तीचे बाळकडू मिळाले. त्यांच्या संपुर्ण कुटुंबावर स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव होता. सरदार पटेल हे हुशार विद्यार्थी होते. त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण करून बोरसाड येथे वकिली सुरू केली. एक अभ्यासू वकील म्हणून त्यांचे नाव सर्वदूर पोहचले पुढे ते बॅरिस्टर झाले. बॅरिस्टर झाल्यावर अहमदाबाद येथे त्यांनी वकिली सुरू केली. अल्पावधीतच एक निष्णात वकील म्हणून त्यांची कीर्ती देशभर पसरली. विकिलीसोबत त्यांना राजकारणाचीही आवड होती त्यामुळे त्यांनी अहमदाबाद पालिकेची निवडणूक लढवली त्यांनी ती निवडणूक सहज जिंकली. राजकारणात आल्यावर त्यांना जनतेचे मूलभूत प्रश्न समजू लागले. १९१७ साली खेडा जिल्ह्यात प्रचंड पाऊस झाला त्यामुळे खरिपाचे पीक वाया गेले.
पुढे उंदराचा सुळसुळाट आणि किटकांमुळे रब्बीचे पीकही गेले त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. त्यातच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती २५ टक्क्यांपेक्षाही कमी उत्पादन येईल अशी परिस्थिती निर्माण झाली. नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शेतसाऱ्यात सूट मिळावी, शेतसाऱ्याची वसुली पुढे ढकलावी यासाठी त्यांनी १८ हजार शेतकऱ्यांच्या सह्या असलेले निवेदन सरकारकडे दिले पण सरकारने त्याची दखल न घेता शेतसारा वसुलीसाठी शेतकऱ्यांवर जप्तीचे आदेश दिले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. महात्मा गांधी यांनी सक्तीच्या शेतसारा वसुली विरोधात खेडा येथे सत्याग्रह चळवळ सुरू केली. या चळवळीचे नेतृत्व त्यांनी सरदार पटेल यांच्याकडे सोपवले. शेतकऱ्यांचे हे आंदोलन त्यांनी अत्यंत निर्धाराने यशस्वी केले. या आंदोलनात त्यांनी केलेल्या नेतृत्वाने महात्मा गांधी भारावून गेले. पुढे महात्मा गांधी यांच्या प्रत्येक चळवळीत त्यांनी हिरीरीने भाग घेतला.
नेतृत्वाप्रमाणेच त्यांचे वक्तृत्वही प्रभावी होते. आपल्या वक्तृत्वाने जनसामान्यांना प्रभावित करणाऱ्या सरदार पटेलांनी १९२८ साली सायमन कमिशन विरोधात पुकारलेल्या बारडोली सत्याग्रहादरम्यान लोकांना आपल्या महान विचारांनी प्रभावित केले त्यामुळे इंग्रजांनी अवाजवी वाढवलेल्या करांना न भरण्यावर जनता सहमत झाली त्यामुळे ब्रिटिश व्हाइसरॉयला पराभव पत्करावा लागला. या आंदोलनात आपल्या सशक्त नेतृत्वाने वल्लभभाई पटेल जनतेत चांगलेच प्रसिद्ध झाले आणि बारडोलीतील लोक त्यांना सरदार म्हणू लागले त्यामुळे त्यांच्या नावापुढे सरदार जोडले जाऊ लागले. १९३० साली सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना इंग्रजांनी अटक केली. त्यांना पाच वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. १९४२ च्या चले जाव आंदोलनातही त्यांनी भाग घेतला त्यावेळीही त्यांना अटक झाली. १९४६ झाली स्थापन झालेल्या हंगामी सरकारमध्ये ते गृहमंत्री होते. गृहमंत्री या नात्याने त्यांनी भारत पाक फाळणीच्या चर्चेमध्ये निर्णायक भूमिका बजावली.
देश स्वातंत्र्य झाल्यानंतर पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात ते उपपंतप्रधान बनले. त्यांच्याकडे गृहखाते, माहिती आणि नभोवाणी, संस्थांनचा प्रश्न व निर्वासितांचा प्रश्न व निर्वासितांचे प्रश्न सारखे महत्वाचे खाते देण्यात आले. स्वातंत्र्य भारताचे गृहमंत्री झाल्यावर सरदार पटेल यांनी सर्वात आधी भारतातील वेगवेगळ्या संस्थानातील राजांना आपल्या दूरदर्शीपणाचा आणि बुद्धिमत्तेचा वापर करून भारतात विलीन होण्याची सूचना केली. बहुतांश संस्थानांनी याला सहमती दर्शवून भारतात विलीन झाले पण जुनागड, हैदराबादचा निजाम, जम्मू काश्मीर च्या राजांनी भारतात विलीन होण्यास नकार दिला. सरदार पटेलांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर सैन्याचा वापर करीत या तिन्ही संस्थानांना भारतात विलीन केले. सरदार पटेल यांनी तत्कालीन ५६५ संस्थाने भारतात विलीन करून एकसंध भारत निर्माण केला त्यांची ही कामगिरी ऐतिहासिक अशीच होती. त्यांच्या याच कामगिरीने त्यांना लोहपुरुष ही पदवी देण्यात आली. १९५० साली त्यांचे स्वास्थ्य बिघडू लागले. २ नोव्हेंबर १९५० ला त्यांचे स्वास्थ्य इतके बिघडले की ते अंथरुणावरुन उठण्यास देखील असमर्थ होते. पुढे १५ डिसेंबर १९५० रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. सरदार पटेल यांना विनम्र अभिवादन!
✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५