सोशल मिडियावर जंगली प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातही मगर, सरपटणारे प्राणी किंवा अत्यंत वेगवान प्राण्यांनी केलेली शिकार यासारख्या व्हिडिओला तर हजारोच्या संख्येने व्ह्यूज असतात. त्यातही जंगलामधील दोन तोलामोलाचे प्राणी समोर आल्यावर काय होतं हे दाखवणारे व्हिडिओही लाखोच्या संख्येने पाहिले जातात. सोशल मिडियावरही अशा व्हिडिओंची चांगलीच चलती असते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये जंगलातून जाणाऱ्या वाघाच्या रस्त्यात एक भलामोठा अजगर आडवा येताना दिसत आहे.
घनदाट जंगलामध्ये वाघाची सत्ता असते असं म्हटलं जातं. मात्र त्याचप्रमाणे अजगरही त्याच्या प्राणघातक हल्ल्यांसाठी ओळखला जातो. हेच दोन प्राणी आमने सामने आले तर काय होईल असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर भारतीय वन खात्यामध्ये अधिकारी असणाऱ्या सुशात नंदा यांनी आपल्या ट्विटरवरुन दिलं आहे. नंदा यांनी एक ४४ सेकंदांचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये पायवाटेवरुन जाणाऱ्या वाघासमोर अजगर येतो आणि थेट त्याच्याकडे पाहू लागतो असं दृष्य दिसत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना नंदा यांनी, “अजगरासाठी वाघाने आपला रस्ता बदलला” अशी कॅप्शन दिली आहे. हा व्हिडिओ कधी कुठे आणि कोणी काढला आहे यासंदर्भात नंदा यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र व्हिडिओमध्ये काय होतं हे पाहून अनेकांनी तो शेअर केला आहे. २४ तासांमध्ये ५० हजारहून अधिकवेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. तुम्हीही पाहा नक्की काय घडलं जेव्हा वाघ आणि अजगर समोरासमोर आले…
काही महिन्यापूर्वी नंदा यांनी ट्विटवरुन मध्य प्रदेशमधील पेंच अभयारण्यामधील वाघांचाच एक आश्चर्यकारक व्हिडिओ शेअर केला होता. अभयारण्यातील तुरिया गेट परिसरामध्ये काही पर्यटक गाडीमधून जंगल सफारीचा आनंद घेत होते. त्याचवेळी त्यांना तिथे एका काळवीट दिसले. या काळवीटाचा फोटो काढण्यामध्ये पर्यटक व्यस्त असतानाच अचानक एक वाघ त्या काळवीटाचा पाठलाग करु लागला. काळवीट जोरात धावू लागला, तितक्यात समोरील गवतामागून दुसरा वाघ आला आणि तो ही त्या काळवीटाचा पाठलाग करु लागला. हा सर्व थरार पाहून पर्यटक थक्क झाले. कॅमेरामध्ये कैद झालेला हा सर्व घटनाक्रम आयएफएस अधिकारी असणाऱ्या सुशांत नंदा यांनी शेअर केला होता. हा व्हिडिओ तुम्ही येथे क्लिक करुन पाहू शकता.