लेखक कवीला काळाच्या पुढचे दिसत असते त्यांनी आपल्या साहित्यातून समाजाला नवी दृष्टी दिली पाहिजे आणि संकटापासून वाचविले पाहिजे. त्यासाठी त्यांनी कायम जागल्याच्या भूमिकेत असले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मंत्रालयाचे सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी केले.
बुलढाणा येथे रवींद्र साळवे यांनी लिहिलेल्या ‘आश्वासक’ आणि ‘समकालीन साहित्याचा अन्वय’ यात दोन पुस्तकाचे स्थानिक जिजामाता महाविद्यालयात प्रकाशन झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धार्थ खरात व मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर तर अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर होते.
सिद्धार्थ खरात यांनी याप्रसंगी रवींद्र साळवे यांच्या लेखन कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, आज समाजामध्ये समन्वय साधणाऱ्या साहित्याची गरज आहे. माणसे जोडण्याची गरज आहे. माणसे जोडल्याशिवाय चळवळ गतिमान होणार नाही. संत साहित्याने हेच काम केले आहे अशीही त्यांनी यावेळी आठवण करून दिली.
पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्यांच्या भाषणात वर्तमानाचे आभाळ फाटलेले आहे, ते एक वेळ आपल्याला शिवता आले नाही तरी चालेल परंतु किमान यापुढे अधिक फाटू न देणे ही प्रत्येक परिवर्तनवादी कार्यकर्त्याची जबाबदारी आहे असे म्हटले. ते म्हणाले की, नोकरी लागल्यावर पोट भरले की बऱ्याचदा निर्मिती प्रक्रिया व समाजकार्य थांबते. स्व- कोषात लोक रममान होतात. इथे मात्र ‘आश्वासक’ लिहिणारा रवींद्र साळवे हा स्वतः चळवळीच्या दृष्टीने एक आश्वासक चेहरा आहे. त्याची पुस्तके आणि परिवर्तन साहित्य पुरस्कार याची साक्ष आहे. त्याने असेच लिहीत राहावे असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात रमेश इंगळे उत्रादकर म्हणाले की, कुठल्याही निर्मितीसाठी साधना आवश्यक असते साहित्याचे सुद्धा तसेच आहे अंतकरणातून केलेली कोणतीही निर्मिती अधिक सुंदर होते. ते म्हणाले की, स्वयंपाक करताना गृहिणीने मन ओतले की स्वयंपाक जसा रुचकर होतो तसेच साहित्याचे सुद्धा आहे. अस्सल निर्मितीसाठी कळा द्याव्या लागत नाहीत फक्त साधना आवश्यक असते ती केली की तिला बहर येतो.
रवींद्र साळवे यांनी आपल्या निर्मिती विषयी प्रस्ताविकातून उपस्थितांना माहिती दिली. ते म्हणाले की, झोप येत नाही म्हणून मी लिहीत नाही वा अक्षर सुंदर करण्याच्या बहाण्याने माझे लेखन नाही तर वर्तमानाच्या वास्तवाने माझी झोप उडाली आहे. त्यामुळे जग बदलण्यासाठी मी लिहीत आहे.या पुस्तकाने एक व्यक्ती बदलली तरी बरे, माझे लेखण त्यासाठीच आहे असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. साळवे यांनी त्यांच्या दोन्ही पुस्तकाची माहिती व परिवर्तन साहित्य पुरस्कारामागील भूमिका यावेळी स्पष्ट केली.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्मृतीशेष कवी दिनकर साळवे स्मृती समाजकार्य विशेष पुरस्कार दिव्या फाउंडेशनचे संस्थापक अशोक काकडे (बुलढाणा) परिवर्तन साहित्य पुरस्कार स्मृतीशेष दादू मांद्रेकर परिवर्तन साहित्य पुरस्कार (वैचारिक) ‘गोपाळबाबा वलंगकर: आंबेडकरी चळवळीचे आधारवड’ डॉ. प्रेम हनवते (उमरखेड, जि. यवतमाळ), स्मृतीशेष सूर्यभान साळवे परिवर्तन साहित्य पुरस्कार (कथासंग्रह) ‘भोंगळा पाऊस’ जयदीप विघ्ने (देऊळगाव राजा जि. बुलडाणा) व स्मृतीशेष सरुबाई साळवे परिवर्तन साहित्य पुरस्कार (काव्यसंग्रह) ‘अधांतरी’ माधुरी वसंतशोभा (दिघोरी जि. नागपूर) यांना वितरित करण्यात आला.
या कार्यक्रमास बारोमासकर प्रा. डॉ. सदानंद देशमुख, प्राचार्य डॉ. एस. एम. कानडजे, रवींद्र इंगळे चावरेकर, प्रा. डॉ. सुनील पवार, प्रा. मधुकर जाधव, प्रा. दिलीप सानप, डॉ. गोविंद गायकी, डॉ. भगवान गरुडे, डॉ. गणेश आंधळे, प्रा. कि. वा. वाघ, डॉ. विजयाताई काकडे, शाहीनाताई पठाण, डॉ. साधना भवटे, डॉ. मंजू जाधव, डॉ. लता बाहेकर, सुरेश साबळे, पंजाबराव गायकवाड, कवी दीपक ढोले, अर्जुनराव बोर्डे, उत्तम साळवे, ऍड. जयसिंगराव देशमुख, पत्रकार रणजीतसिंह राजपूत, राजेंद्र काळे, सुभाष लहाने, सिद्धार्थ आराख, पुरुषोत्तम बोर्डे, विनोद खरे, प्रमोद टाले, प्रज्ञा लांजेवार, प्रा. विनोद देशमुख, अरविंद टाकळकर, संजय भारती, रविकिरण टाकळकर, सुरेश सरकटे, दिलीप आंधळे, रमेश आराख, अमरचंद कोठारी, संदीप राऊत, किशोर खरात, इंद्रजित सोनपसारे, कल्पना माने, सुरेश इंगळे, दिलीप खरात, मांगीलाल राठोड, सुदाम खरे, नंदू आंधळे, संदीप गवई श्रुती तायडे, अथर्व साळवे, नीता साळवे, शारदा साळवे, हर्षल साळवे इ. अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन वैशाली तायडे यांनी तर आभार प्रदर्शन सुरेश साबळे यांनी केले.