शाळेत सोडण्याच्या बहाण्याने 11 वर्षाच्या विद्यार्थिनीवर अत्याचार

    250
    Advertisements

    ✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

    उमरखेड(दि. 12 ऑक्टोंबर) शाळेत सोडतो असा बहाणा करून दुचाकीवर बसवून नेत 11 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला.ही संतापजनक घटना दिनांक 10 ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी 11:30 च्या दरम्यान तालुक्यातील करोडी शेतशिवारात घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

    सविस्तर वृत्त असे की, दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सकाळी शाळेत जातो म्हणून मुलगी घरून गेली.गावाच्या फाट्यावर वाहनाची वाट पाहत असताना एक अनोळखी व्यक्ती शाळेत सोडून देतो..!बस म्हणत तिला आपल्या दुचाकीवर बसविले व उमरखेड शिवारात आल्यानंतर एका पांदन मार्गे नेऊन तिच्यावर दुष्कृत्य केले.

    अशा आशयाची फिर्याद पीडित मुलीने व तिच्या कुटुंबीयांनी पोफाळी पोलीस स्टेशनला दिली. पोलीस प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून आपली तपास चक्रे तत्काळ सुरू केली.आरोपीला शोधण्यात 50 ते 60 पोलीस कर्मचारी कामाला लागले असून एलसीबी पथक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पथक नेमणूक करून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

    अशी माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोत्ते, उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ, पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक ढोमणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश खेडेकर उपस्थित होते.

    आरोपी संदर्भात महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे आणि लवकरात लवकर आरोपीला अटक करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी पियुष जगताप यांनी दिली.पीडित मुलीची प्रकृती ठीक असून तिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असेही यावेळी जगताप यांनी सांगितले.

    अज्ञात आरोपी विरुद्ध पोफाळी पोलीस स्टेशन मध्ये कलम 363, 307, 376 ए बी, पोक्सो कायदा 4,6,8 यासह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.एवढ्या लहान मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे तालुक्यात खळबळ तर माजलीच आहे शिवाय मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.