आरक्षणासाठी आ.डॉ.गुट्टेंचे मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन

    59
    Advertisements

    ?मुंबई येथे सर्वपक्षीय बैठकीत मांडली भूमिका : केली विनंती

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

    गंगाखेड(दि.1नोव्हेंबर):-राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळला आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील टप्प्या टप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने सकारात्मक मार्ग काढला पाहिजे. वेळप्रसंगी केंद्राची मदत घेतली पाहिजे. तेव्हाच मराठा व धनगर आरक्षणाचा तिढा सुटेल. त्यामुळे सकारात्मक भूमिका घेवून हा प्रश्न सोडवा, अशी मागणी गंगाखेडचे रासप आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

    मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात संपन्न झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत आ.डॉ.गुट्टे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेवून लेखी निवेदन दिले. तसेच मराठा व धनगर आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडून लवकर प्रश्न मार्गी लावण्याची राज्य शासनास विनंती केली.

    मराठा आरक्षणाची लढाई गेल्या ४३ वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे संघर्ष तीव्र झाला असून राज्यभर गंभीर परिस्थिती आहे. तर दुसरीकडे धनगर आरक्षणाचाही मुद्दा पुढे आला आहे. अनुसूचित जमातीत समावेश करा, हि त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यामुळे सामाजिक असंतोष वाढत आहे. परिणामी, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शासनाने योग्य ती पाऊले उचलून तोडगा काढला पाहिजे, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी निवेदनात म्हटले आहे.

    या बैठकीत मराठा आरक्षण विषय मुद्देनिहाय सविस्तर चर्चा झाली.‌ तसेच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विविध शक्यताचा आढावा घेतला गेला. राज्यात शांतता आणि सुव्यवस्थेसाठी सर्वपक्षीयांचे सहकार्य आवश्यक आहे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे विविध नेते उपस्थित होते.

    दरम्यान, आ.डॉ.गुट्टे यांनी नेहमी मराठा व धनगर आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. नुकतेच त्यांनी शेकडो पदधिकारी व कार्यकर्त्यांसह एकदिवसीय अन्नत्याग उपोषण करून मराठा व धनगर आरक्षणाचे समर्थन केले आहे.