✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.2नोव्हेंबर):-दिवाळी दान महोत्सव अंतर्गत मिळणारा दिवाळी फराळा सोबत ज्ञानाची शिदोरी म्हणून अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्र तर्फे दिवाळी अंकांचा वाचन फराळ देण्यात येत आहे.दिवाळी फराळ काही दिवसात संपेल परंतू वाचन शिदोरी तुमच्या सदैव सोबत राहील जी तुम्हाला यशाच्या प्रकाशाची वाट दाखवेल असे प्रतिपादन डॉ. पवन चांडक यांनी केले. 13 वर्षा पासून एचआयव्ही बाधित, अनाथ व वंचित व एकल पालक बालकांची दिवाळी आनंदात जावी यासाठी एचएआरसी संस्थे तर्फे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून या वंचित मुलांना मदत केली जाते.
यंदाही होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) या संस्थे तर्फे दिवाळी दान महोत्सव 2023 या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत आज गंगाखेड तालुक्यातील वाचन उपक्रमात सहभागी असलेल्या निवडक शाळेतील अनाथ किंवा एकलपालक 29 विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ, वाचन फराळ व जीवनाशक वस्तूंचे किट देण्यात आले.या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील साडेतीनशे विद्यार्थ्यांना या किटचे वाटप होणार आहे.
आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी गट साधन केंद्र गंगाखेड येथे 29 अनाथ व निराधार मुला मुलींना दिवाळी किट चे वाटप गटशिक्षणाधिकारी नारायण ठूले, डॉ.पवन चांडक, डॉ.शैलेश कदम, विस्तार अधिकारी गणपत लटपटे, गोविंद काळे, रुपेश नायक,केंद्रप्रमुख नारायण आरसाले सर तसेच तालुक्यातील शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या दिवाळी किट मध्ये ५ प्रकारचे फराळ – फरसाण, शंकरपाळे, बाकरवडी, चकली, बालुशाई, मोती साबण, सुगंधी हेअर ऑइल, उटणे, टूथपेस्ट, टूथब्रश, कंगवा, ब्लॅंकेट, शेंगदाणे चिक्की, राजगिरा लाडू, पॉड्स पॉवडर, शॅम्पु, आदी साहित्य चा समावेश असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक यांनी दिली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविकिरण सालमोटे, सूत्रसंचालन इंदुमती कदम व आभार प्रदर्शन जयश्री अवताडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार राठोड, मनीषा जोशी , प्रधान मद्दे, अरुण केंद्रे, रणवीर यांनी प्रयत्न केले.