देशाची राजधानी असलेली दिल्ली आता प्रदूषणाचीही राजधानी बनली आहे. दिल्लीतील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. राजधानी दिल्लीतील हवेचा दर्जा निर्देशांक ( ए क्यू आय ) ४१५ वरून ४६० वर घसरला आहे त्यामुळे दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर बनले आहे. अर्थात ही काय भूषणावह बाब नाही उलट यामुळे देशाची मान खाली झुकली आहे अर्थात त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही दिल्लीतील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाय करा असा अनेक सामाजिक व सेवाभावी संघटनेने सरकारला इशारा दिला होता मात्र सर कारने त्याकडे दुर्लक्ष केले. मार्च महिन्यातच स्विस संस्था आयक्युएअरने जागतिक प्रदूषणावर एक अहवाल प्रसिद्ध केला होत. हा अहवाल भारतासाठी धक्कादायक होता कारण या अहवालात भारत जगातील आठव्या क्रमांकाचा प्रदूषित देश असून दिल्ली जगातील चौथ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर असल्याचे नमूद करण्यात आले होते व त्याच अहवालात प्रदूषित शहरांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेली दिल्ली लवकरच पहिल्या क्रमांकावर पोहचेल असा इशाराही दिला होता.
अवघ्या सात महिन्यात त्यांचा इशारा खरा ठरला. स्विस संस्थेने तयार केलेल्या या अहवालाच्या निर्मितीसाठी वातावरणातील प्रदूषणकारी घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएम – २.५ कणांचे प्रमाण बारकाईने तपासण्यात आले होते. जगातील १३१ देशांमध्ये बसविण्यात आलेल्या ३० हजार ग्राउंड मॉनिटरच्या माध्यमातून ७३०० शहरांची माहिती संकलित करण्यात आली होती. या अहवालातील निष्कर्ष पाहिल्यानंतर भारतातील प्रदूषणाची समस्या किती गंभीर आहे हे लक्षात येईल. विशेष म्हणजे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई यासारख्या मोठ्या आणि महत्वाच्या शहरांचा समावेश आहे. या शहरात वातावरणातील प्रदूषणकारी घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएम – २.५ कणांचे प्रमाण ५३.३ मायक्रोग्राम क्यूबिक मीटर या पातळीवर आले असून ते आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या सुरक्षेच्या पातळीपेक्षा दहापटीने अधिक असल्याचे दिसून आले आहे.
आज देशातील सर्वच महत्वाची शहरे प्रदूषणाने गुदमरत आहेत. त्या शहरात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. एकीकडे २१ व्या शतकातील सुखासीन जीवनाचे मनोहरी चित्र उभे केले जात आहे. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवले जात आहे तर दुसरीकडे याच शहरांची फुफ्फुसे प्रदूषणाने निकामी होत आहेत. प्रदूषणामुळे या शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणामुळे या शहरातील नागरिकांना फुफ्फुसाचे, हृदयाचे, रक्ताभिसरणाचे आजार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. न्यूमोनिया, पक्षघात, हृदयविकार, फुफ्फुसाचा कर्करोग यासारखे मोठे आजार प्रदूषित हवेमुळेच होत आहेत. प्रदूषणामुळे दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीची किती वाईट अवस्था झाली आहे हे आपण पाहत आहोतच. प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळा कॉलेजसना सुट्टी देण्याची वेळ प्रशासनावर आली आली आहे. तीन वर्षांपूर्वी दिल्लीत इंग्लंड आणि भारत यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात खेळाडू चक्क मास्क लावून मैदानात उतरले होते. नंतर हा सामना देखील प्रदूषणामुळे रद्द करावा होता त्यामुळे भारताची जगात नाचक्की झाली होती. जे दिल्लीत आहे तेच मुंबईत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई प्रदूषणाच्या बाबतीत देशाच्या राजधानीची बरोबरी करू लागली आहे.
मुंबईचे प्रदूषणही उच्चतम पातळीवर पोहचले आहे. प्रदूषणामुळे लोकांना शुद्ध हवा मिळणे दुरापास्त झाले आहे. शुद्ध हवेसाठी लोकांना पैसे मोजावे लागत आहे. मुंबई – दिल्लीसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात ऑक्सिजन बार सुरू करण्यात आले आहेत. एका तासाला २०० ते ५०० रुपये मोजून नागरिक ऑक्सिजन विकत घेत आहेत. इतके होऊनही आपण त्यातून बोध घेत नाही. या मोठ्या शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरात लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या अधिक आहे. वाढत्या वाहनांमुळे प्रदूषणात भर पडत आहे. वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरात प्रदूषणाचे प्रमाण खूप असते. धूळ, कारखान्यातून निघणारा धूर, बांधकामातून पसरणारे कण, वृक्षतोड, पृथ्वीचे वाढते तापमान, प्लास्टिकचा भस्मासुर अशा अनेक कारणांमुळे प्रदूषणाचा आलेख उंचावत आहे. स्विस संस्थेने जाहीर केलेला अहवाल म्हणजे धोक्याची घंटा आहे.
वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी वेळीच ठोस उपाय करायला हवेत. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरातून प्रदूषणकारी घटक कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. दगड खाणींवर नियंत्रण आणायला हवे. वाहनांची संख्याही कमी करायला हवी. प्रसंगी सम – विषम सारखे कठोर निर्णय घ्यायला हवेत. युरोपीय देशात प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात याचा अभ्यास करायला हवा. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. याशिवाय कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि विल्हेवाट तसेच सौरऊर्जेच्या वापरावर भर द्यायला हवा. वृक्षारोपण करुन ते वृक्ष जगवले पाहिजेत. शासन, प्रशासन आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच प्रदूषणाचा हा भस्मासुर रोखता येईल.
✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५