अमरावती(प्रतिनिधी):
क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी सामाजिक परिवर्तन करून शैक्षणिक क्रांती आणली बुरसटलेल्या रुढीपरंपरेतून समाजाला मुक्त केले. केवळ त्यांनी परिवर्तनवादी विचारच मांडले नाही तर प्रत्यक्ष कृती करून शुद्र व महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. अशा महामानवांच्या विचारांची आजही नितांत गरज असल्याचे प्रतिपादन २१ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पुरोगामी विचारवंत प्राचार्य सुधीर महाजन ( पोदार इंटरनॅशनल स्कूल, अमरावती) यांनी केले.
ते उपेक्षित समाज महासंघ व वऱ्हाड विकास च्या वतीने २१ वे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन मोर्शी येथील खुले जिल्हा कारागृहाच्या सांस्कृतिक सभागृहात मंगळवार( ता. २८) रोजी म.फुले समतिदिनी थाटात संपन्न झाले,याप्रसंगी सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून विचार व्यक्त करीत होते.
म.फुले सत्यशोधक संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुधीर महाजन (पुरोगामी विचारवंत ) होते,सत्यशोधक विचारपीठावर स्वागताध्यक्ष प्राचार्य रामराव वानखडे, उदघाटक सौ. रजिया सुलताना मार्गदर्शक कारागृह अधिक्षक डी.एच.खरात,मुख्य संयोजक प्र .श्रीकृष्ण बनसोड तर प्रमुख अतिथी माजी कारागृह अधिक्षक कमलाकर धोंगडे,महात्मा फुले बँकेचे संचालक केशवराव कांडलकर,फुले आंबेडकर साहित्याचे अभ्यासक डॉ. बी. एस. चंदनकर,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भाध्यक्ष मा.नयन किसनराव मोंढे, ज्ञानेश्वर घाटोळ, भास्कर कावलकर,अभंगकार प्रा.अरुण बुंदेले, श्रीकृष्णदास माहोरे, उद्योजक विजयराव दशरथराव शिरभाते,कडू महाराज, प्रा. डॉ.सुशीला धाबे विराजमान होत्या.
प्रथम महात्मा जोतीराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून उपस्थितांनी अभिवादन करून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड लिखित विद्रोही महात्मा व कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने सत्यशोधक मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी ” कृांतिसूर्य ” या स्वरचित अभंगाचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.याप्रसंगी सत्यशोधक चळवळ स्वरूप दिशा या लेखक प्रा.सतीश जामोदकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.संमेलनाचे संचालन डॉ.प्रतिभा घाटोळ व डॉ. कल्याणी कावलकर यांनी केले.नाट्यकर्मी अभिनेत्री सौ.अपूर्वा अ.सोनार यांनी ” मी सावित्री बोलते ” या एकपात्री नाट्य प्रयोगाचे सादरीकरण केले.
—–
वैचारिक पिढी निर्माण करण्याची गरज- प्रा.श्रीकृष्ण बनसोड
” सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री-पुरुष समानता निर्माण होऊ शकली.महात्मा फुलेंनी बहुजन समाजाला जागृत करून स्वाभिमानाने उभे राहण्याचे धडे दिले.सध्या स्थितीत वाढती धर्मांधता नष्ट करण्यासाठी महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारांची नव्याने गरज निर्माण झाली आहे.नवा माणूस व त्याची नवी बुद्धिप्रामाण्यवादी मानसिकता घडविण्याचे कार्य हाती घेऊन वैचारिक पिढी निर्माण करण्याची गरज असल्याचे मुख्य आयोजक प्रा. श्रीकृष्ण बनसोड आपल्या बीज भाषणात म्हणाले.
—
कारागृहात निघाली समता दिंडी
वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या मूर्तीला हारार्पण करून अभिवादनाने कारागृहात समता दिंडी काढण्यात आली.महात्मा जोतीराव फुले यांचे समग्र वाङ्मय व भारतीय संविधान या ग्रंथाचे संमेलनाध्यक्ष प्राचार्य सुधीर महाजन,संयोजक प्रा.श्रीकृष्ण बनसोड स्वागताध्यक्ष प्राचार्य रामराव वानखडे,कारागृह अधिक्षक डी.एच.खरात,माजी कारागृह अधिक्षक कमलाकर धोंगडे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पूजन करून ग्रंथ दिंडीत समतेचा जागर करण्यात आला. कारागृहातील बंदीजन भजन मंडळाने महात्मा फुलेंच्या अखंडाचे तसेच राष्ट्रसंतांच्या अभंगाच्या गायनाने कारागृहाच्या परिसरातील वातावरण सत्यशोधकमय झाले होते.
—-
“महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.”
-डॉ.सुशीला धाबे
” सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या माध्यमातून थोर पुरुषांच्या विचारांचे मंथन होत आहे.समाजाला ओहोटी लागली असताना समाजाला दिशा देण्याचे काम महामानवांनी केले आहे.महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.कितीही संकटे आले तरी त्यांनी आपली ध्येयनिष्ठा सोडली नाही.महात्मा फुलेंचे परखड विचार वाचण्यासाठी ‘गुलामगिरी’ ‘शेतकऱ्यांचा आसूड’ त्यांचे काव्य प्रत्येकाने आज वाचावे.”असे प्रतिपादन क्रांतीबा जोतीराव फुले यांच्या सामाजिक क्रांतीमागील प्रेरणा व त्यांच्या विचाराचे सद्यस्थितीत अनिवार्यता ” या विषयावरील परिसंवादात प्रा.डॉ. सुशीला धाबे यांनी केले.
—
” बंदिजनांच्या सुखदुःखाशी समरस होणे आवश्यक – डॉ.रजिया सुलताना
” समाजाला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांमध्ये आहे.आम्ही मानव असल्याचे महात्मा फुलेंचे विचार सांगतात. अनादी काळापासून चालत आलेली रुढीपरंपरांना मुठ माती दिली पाहिजे.साहित्य हे
कोणाचिही मक्तेदारी नसून जे तुम्ही भोगले ते लिहू शकता. बंदीजणांचे साहित्य हा एक वेगळा विषय होऊ शकतो. सत्यशोधक विचाराला कधीही मरण नाही.सत्य हे समान कायदा मूल्याचे संवर्धन शिकवते.महात्मा फुले यांनी शेवटच्या माणसाचा विचार केला आहे.बंदिजनांच्या सुखदुःखाशी समरस होणे आवश्यक आहे .” असे विचार पुरोगामी लेखिका डॉ.रजिया सुलताना यांनी ” महात्मा फुलेंचे सत्यशोधकीय विचार बंदिजन आणि परिवर्तनाच्या दिशा “या विषयावरील परिसंवादात व्यक्त केले.
———-
सत्यशोधक परिवर्तनवादी
कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी परिवर्तनवादी कवी-लेखक- अभंगकार-वक्ते प्रा.अरुण बा.बुंदेले होते तर बहारदार सूत्रसंचालन परिवर्तनवादी गझलकार रोशन गजभिये यांनी केले,कविसंमेलनात शारदा गणोरकर,पुष्पा बोरकर विलास थोरात,नकुल नाईक,प्रवीण कांबळे,माया वासनिक (गेडाम ),नंदकिशोर दामोधरे,
देविलाल रौराळे,सुनिता मेश्राम, विशाल मोहोड,केशवराव गायकवाड यांनी व बंदिजनांनी आपल्या परिवर्तनवादी कविता सादर केल्या.
—–
२१ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनामध्ये समारोपीय सत्रात ९ ठराव मांडण्यात आले.यामध्ये महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले लिखित शेतकऱ्यांचा आसूड व गुलामगिरी या ग्रंथांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा,महात्मा फुले यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी सहायता निधी कोशाची स्थापना करावी आणि स्वामीनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांच्या उत्पन्न खर्चावर आधारित हमीभाव देण्यात यावा,शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा, बारा बलुतेदारांना छोट्या छोट्या उद्योगांसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करण्यात यावा, त्यांच्या पाल्यांना विदेशात शिकण्यासाठी संपूर्ण खर्च शासनाने करावा,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठ स्थापन करण्यात यावे. महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठात महात्मा फुले अध्ययन केंद्र सुरू करण्यात यावे,अमरावतीच्या जिल्हा परिषदेच्या गर्ल्स हायस्कूल शाळेला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले असा नामविस्तार करण्यात यावा, ओबीसी प्रवर्गातील सर्व जातीची जातनिहाय जनगणना व्हावी, सुशिक्षित युवकांना दरमहा २० हजार रुपये बेरोजगारी भत्ता देण्यात यावा इत्यादी ठराव संमत करण्यात आले.