(श्री दत्त जयंती विशेष)
दत्तात्रेय म्हणजेच श्री दत्त हा आद्य देवतांपैकी एक आहे. त्याचा उल्लेख वेदात आहे. रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांतपण त्याचा उल्लेख आहे. ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे एकत्रीकरण करून दत्तात्रेयाचे दैवत झाले असल्याचे मानले जाते. त्रिमूर्ती कल्पनेचे ते आद्य प्रतीक आहे. सर्व देवतांचे गुरू म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जाते. श्रीगुरू दत्तात्रेय आणि भगवान शंकर यांच्या कृपाप्रसादाने व प्रेरणेने मच्छिंद्रापासून नाथसंप्रदायाचा प्रारंभ झाला. दत्तात्रेय हा विष्णूचा सहावा- कदाचित चौथा किंवा सातवा अवतार समजला जातो. श्री दत्त जयंतीनिमित्त श्रीकृष्णदास निरंकारी- बापू यांचा हा अभ्यासपूर्ण लेख…
दत्तात्रेय उपनिषदाची सुरूवात म्हणजे दत्तात्रेय हा विष्णूचा अवतार आहे, असे सांगून होते. तर शेवट ॐ नम: शिवाय या शिवाच्या प्रार्थनेने होते. नाथपंथीय भक्त दत्तात्रेयाला शिवाचा अवतार मानतात. मध्ययुगीन काळातील हरिहर भक्तीचा हा दत्तपंथ आहे. विष्णू आणि शिव या दोन देवतांचा अर्थात वैष्णव आणि शैव पंथांचा समन्वय करण्याचे काम या पंथाने केले. भक्ती आणि योग यांचाही समन्वय या पंथाने केला. इस्लाम प्रभावामुळे समाज सुन्न झाला होता. या नवीन संकटाला प्रतिक्रिया कशी द्यावी, हे त्याला समजत नव्हते. त्या पाश्र्वभूमीवर नृसिंह सरस्वती यांचे कार्य पाहिले पाहिजे. भागवतात नवनारायणाची कल्पना आहे. नारायणाचा अंश असलेले व नारायणाप्रमाणे कार्य करणारे म्हणून त्यांना नवनारायण असेही म्हणतात.
ज्ञानेश्वर- नामदेवांनंतर एकनाथांपर्यंत म्हणजे तेराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते सोळाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जवळजवळ २००-२५० वर्षे कोणीही मराठी संत झालेला दिसत नाही. संत नामदेव ते संत एकनाथांपर्यंत- इ.स.१५५०पर्यंत म्हणजे जवळजवळ दोन शतके महाराष्ट्रात नृसिंह सरस्वतींशिवाय एकही संत झाला नाही. इस्लाम प्रभावामुळे समाज सुन्न झाला होता. या नवीन संकटाला प्रतिक्रिया कशी द्यावी, हे त्याला समजत नव्हते. त्या पाश्र्वभूमीवर नृसिंह सरस्वती यांचे कार्य पाहिले पाहिजे. श्रीपाद वल्लभ व त्यांचे शिष्य नृसिंह सरस्वती या दोन महान व्यक्तींनी केलेले कार्य म्हणूनच अद्वितीय म्हणावे लागेल.
दत्तात्रेय म्हणजेच दत्त हा आद्य देवतांपैकी एक आहे. त्याचा उल्लेख वेदात आहे. रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांतपण त्याचा उल्लेख आहे. ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे एकत्रीकरण करून दत्तात्रेयाचे दैवत झाले असल्याचे मानले जाते. त्रिमूर्ती कल्पनेचे ते आद्य प्रतीक आहे. दत्तात्रेय हा विष्णूचा सहावा- कदाचित चौथा किंवा सातवा अवतार समजला जातो. दत्तात्रेय हा अत्री ऋषी आणि अनुसूया यांचा पुत्र होय. त्याचा जन्म मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला झाला, असे मानतात. त्यांनी आदिनाथांकडून दीक्षा घेतल्याचे नाथपंथ सांगतो, तर भागवत पुराणात त्याला चोवीस गुरू असल्याचे सांगितले आहे. तेथे त्यांच्या शिष्यांत सहस्रार्जुन कार्तवीर्य, परशुराम, यदु, आलार्क, आयु आणि प्रल्हाद हे असल्याची नोंद आहे, तर परंपरेप्रमाणे धुंडिसुत मालू या कवीने लिहिलेल्या नवनाथ सार ग्रंथात त्याने मत्स्येंद्रनाथांसह इतर नाथांना दीक्षा दिल्याचे सांगितले आहे. सर्व देवतांचे गुरू म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जाते. श्रीगुरू दत्तात्रेय आणि भगवान शंकर यांच्या कृपाप्रसादाने व प्रेरणेने मच्छिंद्रापासून नाथसंप्रदायाचा प्रारंभ झाला.
ऋषभदेव हा विष्णूचा कृष्णासमान अंश होता, असे जैनांचे ऋषभदेव ग्रंथात म्हटले आहे. यात त्याच्या शंभर पुत्रांपैकी नऊ जण हे वैराग्यसंपन्न, तेजस्वी, ज्ञानी व परमहंस स्थितीला पोहोचलेले होते. या आर्षभांची- ऋषभपुत्रांची नावे कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविहरेत्र, द्रुमिल, चमक व करभाजन अशी होती. कलियुगात भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने त्यांनी पुन्हा अवतार घेतले. या वेळी ते अनुक्रमे मच्छिंद्र, गोरख, जालंदर, कानीफ, चर्पटी, वटसिद्ध नागनाथ, भर्तरी, रेवण व गहिनी असे नवनाथ झाले. वैष्णव नवनारायणाचे रूपांतर शैव नवनाथात झाले, असे सांगितले जाते.
वेद आणि पुराणानंतर मध्ययुगीन काळात तंत्रानेही हे दैवत स्वीकारल्याचे दिसते. दत्तात्रेय हा औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार कुत्री, दाढी वाढलेल्या नग्न अवस्थेत ध्यानस्थ बसलेला दिसतो. त्याचे चार कुत्री हे वेद मानले जातात. रुद्राक्ष, अंगावर भस्म यांवरून तो तंत्रातील स्मशानात राहणाऱ्या शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते. त्याची जटाजूट आणि नग्न अवस्था ही त्याने जगाशी संबंध तोडल्याचे द्योतक आहे. त्याच्या समोरील अग्निकुंड हे तंत्रातील अग्नीचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे. त्याच्याबरोबर असलेली गाय हे संप्रदायावरील वैदिक परिणाम दर्शविते. एकंदर हे चित्र समाजात निषिद्ध मानलेल्या कृती करणाऱ्या तंत्रातील योग्याचे आहे. तंत्रात दत्तात्रेयांना गुरूचा गुरू मानले आहे. सातव्या शतकात लिहिल्या गेलेल्या मार्कण्डेय पुराणात सतराव्या-अठराव्या अध्यायात तांत्रिक दत्ताची आपल्याला गाठ पडते. त्यातील दोन गोष्टी तंत्राचा प्रभाव लक्षात येण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत-
१.एका सरोवराकाठी आपल्या शिष्यांची नजर चुकवून आणि सर्व बंध तोडून सरोवराच्या तळाशी मुनी दत्तात्रेय जातात. त्यांचे शिष्य काठावर त्यांची वाट पाहात बसतात. मुनीवर येतात तेव्हा ते मद्यधुंद अवस्थेत एका सुंदर स्त्रीसमवेत वीणा वाजवत असलेले दिसतात. शिष्यांना आश्चर्य वाटत नाही. कारण तंत्रातील बंधनाच्या पलीकडे गेलेल्या तांत्रिकांची त्यांना माहिती असते.
२.सहस्रार्जुन कार्तवीर्य अर्जुनाला त्याचे गुरू गर्ग दत्तात्रेयाची उपासना करण्यास सांगतात आणि दत्तात्रेयाची महती सांगतात. देव-दानवांच्या भांडणात देव पराभवाच्या छायेत येतात आणि ते ब्रह्मदेवाकडे मार्गदर्शनासाठी जातात. ब्रह्मदेव त्यांना दत्तात्रेयांकडे पाठवतात. देव दत्तात्रेयाकडे येतात तेव्हा दत्तात्रेय मद्यधुंद अवस्थेत स्त्रीसमवेत गाणे ऐकत असताना दिसतात. असे हे दैवत शत्रूचा कसा बरे नाश करू शकेल? असे देवांना वाटले आणि त्यांनी हा प्रश्न ब्रह्मदेवाला विचारला. तेव्हा ब्रह्मदेवांनी ही स्त्री लक्ष्मी आहे आणि दत्तात्रेय आपल्या नेत्रकटाक्षाने शत्रूचा नि:पात करतील, असे सांगितले आणि पुढे झालेही तसेच! असे अनैतिक आणि समाजनिषिद्ध व्यवहार करणाऱ्या देवतेबद्दल सांगण्याचा उद्देश म्हणजे उघडच तंत्राचे समर्थन करण्याचा आहे. वामाचार हा फक्त दिव्य साधकांसाठी असतो. दिव्य साधक हा जीवनमुक्त असतो. तो चांगले-वाईट, भले-बुरे, ज्ञान-अज्ञान इत्यादी द्वैतांच्या पलीकडे गेलेला असतो. जे कर्म पशू किंवा वीर साधकांना बाधक होऊ शकते, ते दिव्य साधकांना बाधक ठरत नाही, हेच दाखवण्याचा उद्देश त्यात असावा. हा तांत्रिक दत्तपंथ सातव्या- आठव्या शतकातला असावा.
यातील दत्तात्रेय हा वेदात असलेल्या दत्तात्रेयाप्रमाणे मिथॉलॉजिकल नसावा. तो ऐतिहासिक असण्याची शक्यता आहे. त्याच्यासंबंधी आपण पुढे पाहणारच आहोत. तंत्रात श्री दत्ताला अत्रीचा पुत्र न मानता अत्री गोत्रातील व्यक्ती मानलेले आहे. पुराणातील अर्जुन, कार्तवीर्य, परशुराम यांच्याशी मिथकांच्या साहाय्याने जोड घालण्यात आली आहे. त्रिपुरा रहस्य नावाने एक ग्रंथ दत्तात्रेयांशी संबंधित आहे. दत्तसंहिता किंवा दक्षिणामूर्ती संहिता यांचा हा भाग दत्तात्रेयांनी लिहिला असावा. परशुरामाने त्रिपुरा रहस्य नावाने त्याचे संक्षिप्त रूप केले असावे. दत्तात्रेयाने परशुरामाला निरनिराळ्या कथांद्वारे अद्वैत तत्त्वज्ञान सांगितले आहे. मंत्र, यंत्र इत्यादींची माहिती त्यात आहे. त्रिपुरापद्धती हा आणखी एक ग्रंथ श्रीगुरु दत्तात्रेयांच्या नावाने आहे. या तंत्रातील श्री दत्त हा एकमुखी आहे. त्याची मंदिरे आजही भुताखेतादीपासून त्रस्त झालेल्यांसाठी व आजारापासून मुक्त होण्यासाठी वापरली जातात. उदा.गाणगापूर मंदिर हा तंत्राचाच परिणाम दिसतो. यानंतर दत्तपंथातील उत्क्रांतीचा टप्पा हा योगी दत्तात्रेयाचा आहे.
गोरखनाथांनी अकराव्या शतकात आपला संप्रदाय स्थापन केला आणि त्यात अवधूत हे नाव जीवनमुक्त पुरुषाला दिले. अवधूत ही दत्तपंथातील शब्दावली गोरखपंथाने उचललेली दिसते. दत्तात्रेयास गुरूचा गुरू मानून दत्तात्रेयाला महायोगी ठरविलेले आहे. अवधूत गीता हा गोरखनाथ पंथाचा महत्त्वाचा ग्रंथ त्याच्याशी संबंधित आहे. जीवनमुक्त स्थिती आणि अवधूत स्थिती यांचे सविस्तर विवेचन त्यात आहे. हा दत्तात्रेयाच्या शिष्यांपैकी कोणीतरी लिहिला असावा. नाथपंथातून भक्तिपंथात श्री दत्त या देवतेचा प्रवेश बाराव्या शतकात झालेला दिसतो. महानुभवाच्या पंचकृष्णात दत्तात्रेयाचा समावेश आहे. मूळ विष्णूचे रूप असलेला दत्तात्रेय नाथपंथात शिव झाला; परंतु त्यानंतर तो हरि-हर स्वरूपात भक्तिपंथात आल्याचे दिसते. बाराव्या-तेराव्या शतकात निर्माण झालेले पंथ हे हरिहर समन्वयाचे दिसतात. नाथपंथातील गहिनीनाथांनी कृष्णभक्तीची दीक्षा निवृत्तिनाथ-ज्ञानदेव यांना दिली.
स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्यांची जोपासना करण्याचे कार्य दत्त संप्रदायाने केले. दत्त संप्रदाय हा सगुणोपासक राहिला. एकमुखी दत्त आणि त्रिमुखी दत्त अशा दोन रूपांत त्याची पूजा केली जाते. श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती या दोघांनी दत्तपंथाची पुनस्र्थापना केली, असे म्हणावयास हरकत नाही. यांचा मार्ग नाथपंथाप्रमाणे योगप्रधान होता; पण वर्णाश्रम धर्म मानणारा होता. नाथ संप्रदायात जे जातिव्यवस्था न मानण्याचे धोरण होते, त्याच्या विपरीत कदाचित त्याची प्रतिक्रिया म्हणून असेल, हा संप्रदाय अधिक कर्मठतेकडे वळला. स्त्रियांच्या बाबतीतही तो अनुदार राहिला. आचारधर्मावर व अनुष्ठानावर त्यांचा अतिरिक्त भर होता. कदाचित तत्कालीन मुसलमानांच्या प्रभावापासून आपल्या धर्माचे रक्षण करावे म्हणून अशी मूलतत्त्ववादी भूमिका त्यांनी घेतली असावी. हे दोघेही महापुरुष दत्ताचे अवतार समजले जातात आणि त्याच्यातूनच त्यांच्याविषयी भक्तिभावना बाळगणारा भक्तिमार्गी दत्त संप्रदाय सुरू झाला. सरस्वती गंगाधर नावाच्या त्यांच्या शिष्याने गुरुचरित्र नावाचा ग्रंथ लिहिला. सरस्वती गंगाधर विरचित गुरुचरित्र नावाचा हा ग्रंथ या पंथाचा प्रमाणग्रंथ ठरला. म्हणूनच याला गुरुचरित्र परंपरा म्हणतात. त्यात त्यांच्या चरित्राशिवाय तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची माहिती मिळते. गाणगापूर आणि नरसोबाची वाडी ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली. महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि आंध्रात दत्त संप्रदायाचा प्रभाव वाढला व त्याच्या अनेक परंपराही निर्माण झाल्या, हे उल्लेखनीयच!
!! श्री दत्त जयंती निमित्त सर्व भाविक भक्तांना भक्तिवर्धक हार्दिक शुभेच्छा !!
✒️श्रीकृष्णदास निरंकारी:-बापू.श्री गुरुदेव प्रार्थना मंदिराजवळ, रामनगर.गडचिरोली, फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३