?दहा दिवसाचा अल्टिमेटम – बांधकाम सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.20फेब्रुवारी):-जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथे वैनगंगा नदी तीरावर हजारो वर्षांपूर्वीचे पुरातन काळातील मार्कंडेय ऋषी स्थापित शिवमंदिर आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनाकरिता येतात. मात्र गेल्या नऊ – दहा वर्षांपूर्वी मंदिराच्या पुनर्बांधणीच्या नावावर श्रेय लाटण्या हेतू गाजावाजा करून स्थानिक लोकप्रतिनिधी व मंत्र्यांनी मंदिराचे दगड उकलून अडगळीत ठेवण्याचे काम केले.
एकीकडे धार्मिक उन्माद करायचा आणि दुसरीकडे मंदिरे उध्वस्त करून भाविकांच्या भावना दुखवायच्या हे आपण कदापिही सहन करणार नसून येत्या दहा दिवसाच्या आत मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सुरू न झाल्यास मोठे आंदोलन करणार व त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन, प्रशासन व पुरातत्व विभागाची राहील असा सज्जड इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
देशाची दुसरी काशी म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थानाची सर्वदूर ओळख आहे. ज्याप्रमाणे काशी येथे गंगा नदी उत्तर वाहिनी होते. अगदी त्याचप्रमाणे मार्कंडा येथे वैनगंगा नदी उत्तर वाहिनी होते. या वैनगंगेच्या तीरावर गेल्या हजारो वर्षांपूर्वी शिवभक्त मार्कंडेय ऋषी यांनी शिव मंदिराची स्थापना केली. या पावनस्थळी दर वर्षी महाशिवरात्री निमित्ताने मोठी यात्रा भरते. तर दर्शनाकरिता लाखोंच्या संख्येने दरवर्षी भावीक येतात. गेल्या दहा वर्षांपूर्वी स्थानिक भाजपाचे लोकप्रतिनिधी व सध्याचे चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री यांनी सदर मंदिराची पुरातत्व विभागाकडून पुनर्बांधणी करण्याचा पुढाकार घेऊन मोठा गाजावाजा केला.
आज याला संपूर्ण एक दशकाचा काळ लोटला असून मंदिराची पुनर्बांधणी तर झालीच नाही मात्र मंदिराच्या अनेक दगडांची उकल करून अडगळीत पाडून ठेवण्याचे काम स्थानिक लोकप्रतिनिधी व चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री ह्या धार्मिक उन्माद घालणाऱ्या नेत्यांनी केले. तसेच विकासाच्या व पुनर्जीवनाच्या नावाखाली आपली राजकीय पोळी शेकून स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी या पवित्र श्रद्धास्थानाचाही उपयोग करणाऱ्या नेत्यांनी लाखो भाविकांच्या भावना दुखविण्याचे काम केले आहे.
हे आपण कदापिही सहन करणार नसून लाखो श्रद्धाळूंच्या भावना व आस्था लक्षात घेता येत्या दहा दिवसाचे आत सदर मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सुरू न केल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा व ओढवणारा परिस्थितीस प्रशासन व पुरातत्त्व विभाग सर्वस्वी जबाबदार असणार असा सज्जड इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार, प्रशासन व पुरातत्त्व विभाग यांना दिला आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जमातीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी जिल्हाध्यक्ष हसन गिलानी, प्रभाकर वासेकर, अतुल मल्लेलवार, व बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.