✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नागपूर(दि.21फेब्रुवारी):-नागपूर येथील भूमापन विभागात सध्या भोंगळ कारभार सुरू आहे. पक्षकारांनी अर्ज केल्यानंतर चार ते पाच महिने कामच होत नसल्याचे दिसून येते. झिरो पेंडन्सी ऐवजी फाइलींचा ढीग वाढत आहे. अर्ज करणाऱ्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याने रोष दिसून येत आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांना याचे सोयरसुतक नाही.
नागपूर येथील इमारत क्रमांक एक मध्ये भूमापन विभागाचे कार्यालय असून भूखंडाचे मोजमाप आणि वारसाच्या फेरफार करण्याच्या नोंदी येथे घेतल्या जातात. भूमापन अधिकारी क्रमांक-२ मध्ये सध्या स्थितीमध्ये २ हजार पेक्षा अधिक फेरफारची प्रकरणे प्रलंबित असून अधिकारी मात्र, साइटवर गेल्याचे सांगून कामाला हातच लावीत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे फेरफार अर्जाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून सिटी सर्व्हेचे कार्यालयात आता डोकेदुखी ठरू पाहात आहे.
नवीन मालमत्ता घेतल्यानंतर त्याचा रीतसर फेरफार भूमापन कार्यालयातून करावा लागतो. याकरिता रीतसर अर्ज केल्यानंतर २५ दिवसांच्या आत फेरफार होणे अपेक्षित आहे. अर्जदार काही त्रुटी नसतील तर फेरफार कमी-कमी वेळेत होण्याची आवश्यकता आहे. मात्र कोणतेही त्रुटी नसताना फेरफार प्रलंबित ठेवण्याचा धक्कादायक प्रकार येथे होताना दिसून येत आहेत. पक्षकारांना ‘तारीख पे तारीख’ मिळत आहे. या प्रकारामुळे पक्षकारामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. याकडे कार्यालयात अधिकारी लक्ष देण्यास तयार नाही. कार्यालय राजकारणाचा शिरकाव झाला असून मर्जीतील अधिकाऱ्यांना मलईचा विभाग दिला जातो. तर चांगले काम करणाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार येथे सुरू आहे.
*२ हजार ५०० फेरफार प्रलंबित*
भूमापन कार्यालय क्रमांक-२ मध्ये २ हजार ५०० पेक्षा अधिक फेरफार प्रकरणे प्रलंबित असून याकडे अधिकारीही लक्ष देत नाही. कोणतीही त्रुटी नसताना २५ दिवसांच्या हात फेरफार प्रकरणाचा निपटारा होणे आवश्यक असते. येथे मात्र, सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागत आहे. येथील अधिकारी कार्यालयात दिसून येत नाही. पक्षकार विचारण्यास आल्यानंतर साहेब बाहेर गेले आहेत, असे सांगितल्या जाते.
*भूमापन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष*
येथील भूमापन अधिकाऱ्याचे दुर्लक्ष होत आहे. २ हजार ५०० पेक्षा अधिक फेरफार प्रकरणे प्रलंबित असताना त्याचा आढावा घेण्याचे सौजन्य अधिकारी दाखवीत नाही. त्यामुळे कामचुकार अधिकाऱ्यांना ते पाठबळ देत असल्याचे यातून दिसून येते. भूमापन अधिकारी आश्विनकुमार नलावडे यांचा अधिकाऱ्यांवर वचक नसल्याचा आरोपही होत आहे.
*कलम-१५५ ही पायदळी*
फेरफार करताना प्रकरणामध्ये काही त्रुटी राहिल्यास नागरिकांच्या कलम-१५५ अनुसार त्या दुरुस्ती तातडीने करणे आवश्यक आहे. अशा प्रकरणालाही ६ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागत असल्याचे दिसून येत आहे. याच जाबसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी विचारीत नाही. महत्त्वाचे म्हणजे एवढी प्रकरणे प्रलंबित असताना त्याचा आढावाही घेतला जात नाही.
*कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन करू ः राजानंद कावळे*
नागपूर येथील भूमापन कार्यालयात २ हजारांवर प्रकरणे प्रलंबित असताना वरिष्ठ अधिकारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यावर कोणतीच कार्यवाही करीत नाही. नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार येथे होत असून याविरोधात नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरू,असा इशारा शेतकरी व कामगार सुरक्षाच्या संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजानंद कावळे यांनी दिला आहे.