भुसावळ — येथील शासकीय आयटीआय कॉलेजमध्ये सुरू असलेल्या निवासी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात दुपारच्या बौद्धिक सत्रात संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी महापुरुषांची विचारधारा या विषयावर वैचारिक प्रबोधन केले.
तत्पूर्वी सर्पमित्र दुर्गेश आंबिकर यांनी वन्यजीव जनजागृती या विषयांतर्गत विविध वन्यजीव व मानव यांचा सहसंबंध स्पष्ट केला तसेच साप हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगून सापाबाबत असलेले समज गैरसमज याबाबत देखील सविस्तर मार्गदर्शन केले. तद्नंतर औपचारिक स्वागत व परिचय कार्यक्रम झाल्यानंतर लक्ष्मणराव पाटील यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरवात केली. महापुरुषांचे जीवनचरित्र समतेच्या विचारांसाठी प्रेरक असल्याचे सांगितले. तत्कालीन परिस्थितीत सोशल मीडियावर घुटमळणारा युवक, बेरोजगारी, स्पर्धात्मक युग तसेच आई वडील हेच आपले आद्य दैवत असं सांगून परिवर्तनाचे महत्व पटवून दिले. समाज किंवा राष्ट्र बदलण्याची जर तुमची मानसिकता असेल तर स्वतःचा विकास साधा राष्ट्राचा विकास आपोआपच होईल. शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर म्हणजेच स्वातंत्र्य – समता – न्याय – बंधुता हे तत्व ज्याला कळले तो यशस्वी माणूस होतो असे मत, लक्ष्मणराव पाटील यांनी मांडले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून गटनिदेशक आय.आर.मोरे, एम.पी. सूर्यवंशी, एच.ई.पाणे, जे.जी. कोळी, ए.बी. ढोले, NSS कार्यक्रम अधिकारी डी.एस.कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला शासकीय आयटीआय येथील NSS चे स्वयंसेवक, इतर सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन एच.ई.पाणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृंद तथा NSS स्वयंसेवक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भुसावळ, शासकीय तांत्रिक विद्यालय, मेस्को कर्मचारी व तासिका गेस्ट लेक्चरर आदींनी परिश्रम घेतले.