?प्रासंगिक लघु लेख?
अनेक शहरात नागरिक रस्त्यावर येऊन एकूणच कॊरॊना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेले लाॅकडाउन आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॊकप्रतिनीधींचे हॊत असलेले दुर्लक्ष याविषयी अॊरड करताना दिसतात. अगदी ग्रामपंचायतच्या निवडणूकीपासून नगरसेवक,आमदार खासदारकीच्या निवडणुकीत हजारो लिटर इंधन जाळून दिवस रात्र मतदार संघात भोंगे लावून मतांची भीक मागत, नव्हे, मतदारांची झोप उडवत, प्रदुषण नियंत्रणाचे सर्व सीमा ओलांडून हुंदडत राहणारे लोकप्रतिनिधी कोरोना विषाणुच्या रणधुमाळीत कुठे भूमीगत झाले आहेत कुणास ठाऊक ? नाही तरी,तसे ते मतदान झाले की पाच वर्षासाठी भूमीगत होतातच. जनतेलाही ते आता चांगलेच अंगवळणी पडलं आहे.
परंतु आजची परिस्थिती केवळ तोंडाला रूमाल बांधून फिरण्याएवढी त्यांना सोपी का वाटावी हेच कळत नाही. ‘करोना विषाणूंमुळे विनाशकारी परिस्थितीला घाबरून भारताच्या मानाने तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात अनेक पटीने प्रगत असणारी राष्ट्रे अवसान गळून बसले आहेत.तरिही स्वत:बरोबर इतरांनाही वाचविण्याचे त्यांचे शर्तीचे प्रयत्न अहोरात्र सुरू असताना, कोण जाणे हे पुढारी कुठल्या बिळात लपून बसले आहेत? एकाही लोकप्रतिनिधीला आता कोरोना बद्दल जनजागृती करण्याचे गांभीर्य वाटत नाही ही वस्तुस्थिती आहे.
शहरी लोकांपर्यंत समाज माध्यमांद्वारे खबरदारीच्या सूचना आणि काही प्रमाणात मदतीची केंद्र तरी माहीत होतात.परंतु ग्रामीण भागातील लोकांकडे कुणी पहायचं ?
आज गेले चार महिन्यांपासून लॉकडाऊन असल्यामुळे हाताला काम नाही पर्यायाने दाणा आणायला घरात दाम नाही अशी दयनीय अवस्थेत असलेल्या गरिब जनतेला हवशे-गवशे-नवशे यांनी सोडलेल्या पुड्यांद्वारे त्यांच्या मनात बसलेली भीती घालवून खरी-खुरी माहिती आणि उपाय सांगून त्यांना जागृत करणे गरजेचे आहे.
पत्र्याच्या खोलीतून पार बंगल्यात आणि महामंडळाच्या गाडीतून थेट स्कॉर्पियो, फॉरच्यूनर मधे बूड टेकविण्यासाठी योगदान दिलेल्या आपल्या मायबाप मतदाराला आणि त्याच्या परिवाराला अशा जीवघेण्या प्रसंगापासून वाचविण्यासाठी किमान नाका तोंडाला बांधण्यासाठी मास्क द्यावे, हॅन्डवाॅश द्यावे,लॉकडाऊन असल्यामुळे किमान कुटु़ंबाला पुरेल एवढे जीवनावश्यक व्रयोग सुरूच असतात की.मग अशावेळी हे आशास्थान, स्फूर्तीस्थान जग हादरवून सोडणा-या कठीण प्रसंगी मतदार संघाचे ‘कबरस्थान’ जनसुनावणीहोण्याची वाट का बघत आहेत ? कणाने का होईना मतदारांचे ऋण व्यक्त करण्याची बुद्धी यांना का सुचू नये ?वेळ आणीबाणीची आहे.
लोकप्रतिनिधी मतदार संघात पाच वर्षात एखाद्या वेळी मतदारांना दृष्टीस पडतात हे आता रूढ झाले आहे.अशावेळी पूर्ण सुरक्षा सहीत त्यांनी मतदार संघात फिरले पाहिजे म्हणजे एखाद्या दुर्मिळ गोष्टीचे जसे महत्व पटते लोक तसे त्यांना पाहून लोकांना ही परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येईल अजूनही वेळ गेलेली नाही.
लोकप्रतिनिधींकडन निवडणुकीवेळी जसे बाहेर गावी असणा-या मतदारांना खास गाड्या करून मतदानासाठी मनधरणी करून आणण्यात येते. हॉटेल, दारूची, जेवणाची व्यवस्था करून त्यांची सरबराई करण्यात येते.
अगदी तशीच नव्हे,तर निदान अशा कठीण परिस्थितीत त्यांची विचारपूस तरी करायला हवी.तपासणी अहवाल पॉझीटीव आलेल्या , विलगीकरणात असलेल्या कालावधी आणि नंतर त्यांच्या कुटुंबीयांची राहण्याची, जेवणाची सोय केली पाहिजे.वेळ वाईट आहे. कोरोना आज ना उद्या नष्ट होईल पण पुढा-यानो तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून मिरवायला आणि खो-याने पैसे ओढायला याच लोकांची मदत घ्यावी लागणार आहे आणि कठीण परिस्थितीत केलेली मदत एखाद्या वेळी कुणी विसरू शकेल परंतु अशावेळी झालेला अपमान आणि बेईमानी डोक्यात बसलेली असते हे सदैव ध्यानी असावे.
सर्व लोकप्रतिनिधींनी एवढं करावेच.जनतेची सेवा करण्याची ही नामी संधी मिळाली आहे
ग्रामीण भागातील जनतेला विशेष सावध करून त्यांना जपलं पाहिजे.कारण शेतक-याला साथ देणारे ग्रामस्थच असतात. आणि शेतकरी तर जगलाच पाहिजे…वेळीच सावध,सजग आणि सूज्ञ होणे गरजेचे आहे.कारण या ‘करोना विषाणू’ने अखिल मानव जातीच्या अस्तित्वालाच आव्हान दिलेले आहे.
✒️विठ्ठलराव वठारे
अध्यक्ष सॊलापुर जिल्हा वृत्तपत्र
लेखक मंच, सोलापूर