ने. हि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

455
Advertisements

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
ब्रम्हपुरी:- नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी द्वारा संचालित ने. हि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, ब्रम्हपुरी हे जिल्ह्यात आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध असून विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

विद्यालयात नवीन शैक्षणिक सत्राचे प्रारंभी ‘स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम प्राचार्य जी. एन. रणदिवे यांचे अध्यक्षतेखाली तथा उपप्राचार्य के. एम. नाईक, पर्यवेक्षक ए. डब्ल्यू. नाकाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या ब्रम्हपुरीच्या सुकन्या डॉ. सोनिया रविंद्र नाकाडे उप मुख्य कार्यकारी अधिकारी,नाशिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना, “विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून स्वावलंबीपणाचा मंत्र जपतांना गुरुजनांच्या मार्गदर्शनात नियमितपणे अभ्यास करून शालेय परीक्षेत उत्तम यश प्राप्त करावे आणि आपल्या अथक प्रयत्नाने भविष्यात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करावी. इंग्रजी ही एक भाषा आहे , ज्ञान नाही. विद्यार्थ्यांनी इंग्रजीला न घाबरता शालेय जीवनापासून इंग्रजीमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न करावा यामुळे त्यांची इंग्रजी बद्दलची भीती नाहिसी होऊन भविष्यात विद्यार्थी उत्तम इंग्रजी बोलू शकतील. विद्यार्थ्यांनी आई-वडील, गुरुजन तसेच कुटुंब व समाजातील वडीलधारी व्यक्तींचा सदा आदर करावा. मोबाईलचा उपयोग हा अभ्यासासाठी व योग्य कार्यासाठी करावा” असे मत प्रतिपादन केले. डॉ. सोनिया नाकाडे यांनी आपल्या मार्गदर्शनात त्यांचे शालेय शिक्षण ते स्पर्धा परीक्षेतील यश या प्रवासावर प्रकाश टाकतांना जीवनात अभ्यासाविषयीचा प्रामाणिकपणा किती महत्वाचा आहे हे समजावून सांगितले.
प्राचार्य जी.एन. रणदिवे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात,” विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करणे अत्यंत महत्त्वाचे असून शालेय जीवनापासून त्याची सुरुवात करावी व डॉ. सोनिया मॅडम यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा” असे मत विशद केले. उपप्राचार्य के.एम.नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना, कार्यक्रम घेण्यामागची विद्यालयाची भूमिका मांडली, तर पर्यवेक्षक ए. डब्लू .नाकाडे यांनी कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. सोनिया रविंद्र नाकाडे यांचा परिचय करून दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती माया कापगते व आभार प्रदर्शन कु.पल्लवी देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.प्रकाश जिभकाटे, डॉ. पंकज बेंदेवार, विनोद वदनलवार, विजय धांडे, अतुल कानझोडे ,अनुराग देशमुख आदी शिक्षकवृंदांचे व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंदांचे सहकार्य लाभले.