नागपूर- राज्यातील भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या असून या समस्यांकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन त्या सोडवाव्यात, अशी मागणी भूमी अभिलेख उपसंचालकांना दिलेल्या निवेदनात विदर्भ भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेने केला आहे.
राज्यातील भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत विदर्भ भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेच्या नागपूर जिल्हा शाखेतर्फे नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध समस्या व मांगण्यावर चर्चा करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष दिलीप गर्जे, सरचिटणीस श्रीराम खिरे यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली. प्रकल्प राबविताना त्या-त्या विभागातील भौगोलिक परिस्थिती तालुक्यातील कार्यालयातील मनुष्यबळ, कार्यालयात उपलब्ध साधन सामग्री यांचा अभाव आहे. नियोजनशून्य व्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांवर ताण येतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. मात्र, असे होत नाही. अचानक वरिष्ठ कार्यालयाकडून तातडीने योजना राबवून अमलात आणण्याबाबत आदेश होतात. यामुळे कर्मचाऱ्यांवर दबाव येतो. वरिष्ठ अधिकारी हे कर्मचाऱ्यांना दबावात ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्यांचे कौटुंबिक वातावरण खराब होते.
जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयात कर्मचाऱ्याला नियमित कामकाज किंवा फक्त योजनेचेच काम देण्यात यावे. एकाच वेळेस अनेक काम देण्यात येऊ नये. त्यामुळे एकही काम परिपूर्ण होत नाही. परिणामी चुका होतात व त्यामुळे कार्यवाहीच्या धमक्या दिल्या जातात, असाही आरोप याप्रसंगी करण्यात आला. मोजणी प्रकरणांची विभागणी करून भूमापकाला मोजणी प्रकरणे, निमतानदाराला कोर्ट कमिशन कोर्ट वाटप, परिरक्षण भूमापकाला नगर भूमापनकडील मोजणी कामे देण्यात यावे, ज्या कर्मचाऱ्याला रोव्हर येत नाही किंवा प्रशिक्षण झालेले नाही, त्या कर्मचाऱ्याला रोव्हर व ऑटोकॅड प्रशिक्षण दिल्याशिवाय मोजणी काम देण्यात येऊ नये.कार्यालयात जेवढे मोजणी कर्मचारी आहेत, तेवढे रोव्हर उपलब्ध करुन देण्यात यावे. भूमापकांना १५ मोजणी प्रकरणांच्यावर मोजणी प्रकरणे देण्यात येऊन व्हर्जन-२ मध्ये १५ प्रकरणाचा कोटा पूर्ण झाल्यानंतर त्या भूमापकाचे लॉगिनला लॉक सिस्टम करण्यात यावे, तसेच सुटीच्या दिवशीही कर्मचाऱ्यांना बोलविण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची बदली रजा देण्यात यावी. वर्ग २ च्या अधिकाऱ्यांप्रमाणे कर्मचाऱ्यांची बदली सुद्धा दर ३ वर्षांनी करण्यात यावी. जिल्हा अधिकारी कार्यालय नागपूर येथे सेतूमध्ये खासगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. त्याप्रमाणे नगर भूमापन कार्यालय १, २, ३ नागपूर या कार्यालयात कामाचा व्याप जास्त असल्याने खासगी कर्मचारी भरण्यात यावे. नियुक्ती करण्यात यावी, अशी विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष दिलीप गर्जे, गौरव रोकडे, प्रदीप मिश्रा, राजेश होले, गणेश चांभारे, सतीश साकोरे, प्रकाश श्रीरामे, मनोज तवले, श्रीमती सीमा पॉल उपस्थित होते. बैठकीला कार्यालय अधीक्षक श्रीमती गवई, श्री. बोर्डे उपस्थित होते.
*जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी*
भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली. राज्य सरकारने यासंदर्भात ठोस पावले उचलून कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा,असेही निवेदनात नमूद करण्यात आले. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी घेतलेल्या सकारात्मक कार्यवाहीचे संघटनेने स्वागत केले आणि संघटनेच्या वतीने उपसंचालकांचे शाल आणि भगवद्गीता देऊन सत्कार केला,अशी माहिती गौरव रोकडे यांनी दिली.