बेरोजगार पात्र मुलांना शिक्षण सेवक म्हणून संधी देण्याची मागणी

128

धानोरा- गडचिरोली जिल्ह्यातील तात्पुरत्या शिक्षक भरती पदावर निवृत्त शिक्षकांना न घेता बेरोजगारी पात्र मुलांना शिक्षण सेवक म्हणून संधी देण्याबाबत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार, तहसील कार्यालय धानोरा यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
शालेय शिक्षण विभागाच्या वतीने १५ जुलै २०२४ रोजी आदेश काढून त्यात पेसा क्षेत्रातील रिक्त शिक्षकांच्या पदावर सेवा घेण्याच्या सूचना क्रमांक १ नुसार देण्यात आल्या. गडचिरोली जिल्हा मागास जिल्हा आहे. त्यातच बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढलेले असताना डी एड, बी एड, एम एड, बीपी एड व पी एच डी झालेल्या बेरोजगार तरुणांना रोजगार न देता, कार्यक्षमता कमजोर होते म्हणून ५८ वर्षाच्या कर्मचाऱ्यांना आपण निवृत्त करता आणि आता शिक्षण हे अत्यंत मूलभूत आणि देशाचा भविष्य बनवणारी संस्था असून निवृत्त कर्मचाऱ्यांना परत रिक्त पदावर घेण्याच्या सूचना करता हे सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय नव्हे का ? असा प्रश्न सर्व बेरोजगार शिक्षण पात्र विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य जनतेला पडतो आहे.
सदर बाब सुशिक्षित पात्र बेरोजगार तरुणांवर फारच अन्याय करणारी असून, आपण तातडीने यावर निर्णय घेऊन त्या मागण्या पूर्ण कराव्यात. या संदर्भात सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी मुख्यमंत्री यांना निवेदनातून न्याय मिळवून देणे बाबत तहसीलदार धानोरा यांच्यामार्फत निवेदन दिले आहे.
यावेळी संजय गावडे, तुकेश नरोटे, प्रभाकर हलामी, राजेश परसा, नरेश हारामी, महेश कोवे, निकेश तुलावी, सौरव हलामी, कुमारी शीला आतला, कुमारी इंदू गोवा आदी शिक्षण पात्र विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.