शेतकऱ्यांकरिता एनईएमएल पोर्टलवर बँक मॉडिफिकेशन सुविधा उपलब्ध

159

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
चंद्रपूर, दि. 30 : हंगाम 2023-24 मधील आधारभुत किंमत खरेदी योजनेअतंर्गत जिल्ह्यात धान व भरडधान्य खरेदी करण्यात आले आहे. धान व भरडधान्य खरेदी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे चुकारे ऑनलाईन पध्दतीने एनईएमएल पोर्टल वरून पीएफएमएस प्रणालीद्वारे अदा करण्यात येतात.

तसेच एनईएमएल पोर्टलवर शेतकरी नोंदणी करताना धान खरेदीदार सब एजेंट संस्थाकडून शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड व इतर योग्य ती माहिती न घेतल्यामुळे शेतकरी चुकारे अदा करताना अडचणी निर्माण होत आहेत. अशा अडचणीमुळे शेतकऱ्यांना चुकारे अदा करताना विलंब होत आहे. खरेदी केलेल्या धान व भरडधान्याचे काही शेतकऱ्यांचे खरेदी कालावधीमध्ये तसेच खरेदीनंतर काही बँकेचे आयएफएससी कोडमध्ये बदल झालेला असल्यामुळे शेतकरी चुकारे परत येत आहेत.

तसेच ज्या शेतकऱ्यांचे चुकारे अदा करताना चुकीचे बँक खाते क्र., चुकीचे आयएफएससी कोड, डुप्लीकेट एन्ट्री, पेमेंट होल्ड रजिस्ट्रेशन न होणे, फ्रीझ खाते व संयुक्त खाते तसेच बँकेच्या काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी चुकारे हे शेतकऱ्यांचे खात्यात जमा झालेले नाहीत. त्या कारणास्तव शासनाकडून 14 ऑगस्ट 2024 पर्यंत एनईएमएल पोर्टलवर बँक मॉडिफीकेशन करीता कालावधी देण्यात आलेला आहे. तरी मुदतीमध्ये ज्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली आहे, त्याच खरेदी केंद्रावर जाऊन बँक मॉडिफीकेशन तात्काळ करून घ्यावे, जेणेकरून शेतकरी चुकारे करणे सोईचे होईल, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही.एस. तिवाडे यांनी कळविले आहे.